Just another WordPress site

World Ozone Day 2021 । जागतिक ओझोन दिन का साजरा केला जातो, काय आहे ओझोन थराचं महत्त्व?

मानवी जीवनात पर्यावरणाला प्रचंड महत्व आहे. मात्र, जागतिक पातळीवर वाढलेल्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होते. प्रदूषणामुळे वातावरणातील ओझोनचा थर विरळ होऊन सूर्याची अतिनील किरणे सरळ पृथ्वीवर येत असल्यामुळे त्याचा सजीव सृष्टीवर विपरित परिणाम होतो. परिणामी, ग्लोबल वॉर्मिंगमुळे संपूर्ण जग बेजार झाले. त्यामुळे भविष्यात आपल्याला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओझोनबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने १६ सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात येतो. या दिवसाची सुरूवात नेमकी कशी झाली, या दिवसाचा इतिहास काय आहे? हा दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? भविष्यात ओझोन थराचं जतन करण्यासाठी आपण काय करायलं हवं? या विषयी जाणून घेऊ.

ओझोन म्हणजे काय?

ओझोन हा फिक्कट निळ्या रंगाचा वायू असून त्याला एक तीव्र वास येतो. ओझोनचे रेणूसूत्र O3 आहे. पृथ्वीपासून १६ ते ५० किमीच्या पट्ट्यात ओझोनचा थर आढळतो. हा थर निर्माण होण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू असते. ओझोन वायूचा थर सूर्यकिरणांमधील सजीव आणि पृथ्वीसाठी हानिकारक अतिनील किरण आणि इतर तीव्र किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो. यामुळे पृथ्वीवरील जीवन जपण्यास मदत होते. 


जागतिक ओझोन दिवसाचा इतिहास 

दिवसेंदिवस विरळ होत चाललेल्या ओझोन आवरणाविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि ओझोनच्या थराचे जतन करण्यासाठी शक्य ते उपाय शोधण्यासाठी ‘जागतिक ओझोन दिन’ दरवर्षी १६ सप्टेंबरला साजरा होतो. ओझोन थर कमी होत असल्याच्या बाबीला वैज्ञानिक आधार मिळाल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाला ओझोन थराच्या संरक्षणासाठी यंत्रणा तयार करणे भाग पडले. व्हिएन्ना परिषदेत ओझोन आवरणाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याचा औपचारिक निर्णय झाला. याला २८ देशांनी मान्यता दिली आणि २२ मार्च १९८५ ला यासंबंधीच्या करारावर या सर्वांनी स्वाक्षऱ्या केल्या. १६ सप्टेंबर  १९८७ मध्ये ओझोन लेअर कमी करणार्‍या पदार्थांवर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल तयार झाला. तेव्हापासून १९ डिसेंबर १९९४ रोजी १६ सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA)ओझोन आवरणाच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून जाहीर केला.  १६ सप्टेंबर १९९५ रोजी जागतिक ओझोन दिन प्रथमच साजरा करण्यात आला.


यंदाची जागतिक ओझोन दिनाची थीम काय?

दरवर्षी  जागतिक ओझोन दिन साजरा करण्याची थीम ठरली जाते. ‘ओझोन फॉर लाइफ’ हा जागतिक ओझोन दिन २०२० ची घोषणा आहे. तर यंदाची थीम ‘Montreal Protocol Keeping us, our food, and vaccines cool.’ अशी आहे.


ओझोनचा थर विरळ होण्याची कारणे काय? 

पर्यावरणातील ओझोन वायूचा थर सातत्याने कमी होण्यासाठी क्लोरीन किंवा ब्रोमिन असलेली मानवी निर्मित रसायने प्रमुख कारणे आहेत, असे वैज्ञानिकांच्या अभ्यासावरून सिद्ध झाले. ही रसायने ओडीएस म्हणून ओळखली जातात. आणि त्यांचे आयुष्य सुमारे १०० वर्षे असते.  ध्रुवीय प्रदेशांत ओझोनचा थर विरळ झाल्याचे समोर आले आहे. मुख्यत: ओझोन थराला हानी पोहोचवणार्‍या पदार्थांमध्ये क्लोरोफ्लुरोकार्बन म्हणजे, सीएफसी., कार्बन टेट्राक्लोराईड, हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बन म्हणजे एचसीएफसी आणि मिथाइल क्लोरोफॉर्म यांचा समावेश आहे. 

ओझोनचे छिद्र!

अंटार्क्टिकजवळ ओझोनच्या थराला छिद्र आहे. याचा आकार हा रशिया आणि कॅनडा या देशांचे क्षेत्रफळ एकत्र केल्यानंतरदेखील २९० लाख चौकिमी इतकं मोठं आहे. मागच्या शतकात ऐंशीच्या दशकात वातावरणातल्या ओझोन थराला अंटार्क्‍टिका खंडाच्या वर भलं मोठं खिंडार पडल्याचं दिसून आलं. 


ओझोन थराचे संरक्षण

ओझोन थर सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून आपले रक्षण करतो आणि वातावरणात संतुलन राखतो. मात्र, मानवनिर्मित प्रदूषणामुळे ओझोनचा थर दिवसेंदिवस कमी होत आहे. जर सूर्यावरील अल्ट्रा व्हायलेट किरण थेट पृथ्वीवर पडले तर मानवाशिवाय झाडे आणि प्राणी आणि इतर जीव यांच्यावर याचा अत्यंत धोकादायक आणि प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत ओझोन थराचे जतन करण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचं आहे. 

१. पर्यावरणपूरक वस्तु वापरा. 

२. क्लोरोफ्लुरोकार्बन उत्सर्जित करणारे रेफ्रिजरेटर आणि एसी सारखी उपकरणे टाळा.  

३. वाहनांच्या धुरामुळे ओझोनची हानी होते. त्यामुळे शक्य तेवढा वाहनांचा प्रवास टाळावा. 

४. रासायनिक किटकनाशकांचा वापर थांबवायला हवा.  

५. वृक्ष लागवड करण्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे. 

६. वस्तूंचा आणि स्रोतांचा पुनर्वापर करावा

ओझोन वायूचा थर सूर्यकिरणांमधील सजीव आणि पृथ्वीसाठी हानिकारक अतिनील किरण आणि इतर तीव्र किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो. यामुळे पृथ्वीवरील जीवन जपण्यास मदत होते. त्यामुळे ओझोन थराचे जतन करणे महत्वाचे आहे. तरच, ओझोन थर आपल्यासह भविष्यातील इतर पिढ्यांचेही संरक्षण करू शकेल. अन्यथा येत्या काही वर्षात, पृथ्वीवर सजीव तग धरू शकणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!