Just another WordPress site

World Earth Day : पृथ्वीचा ऱ्हास थांबवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील?

यावर्षी पृथ्वी दिनाला ५१ वर्ष पूर्ण होत आहेत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी जगभरात दरवर्षी पृथ्वी दिवस अर्थात अर्थ डे साजरा केला जातो. पृथ्वी आणि पर्यावरण संरक्षणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने अर्थ डे साजरा करण्यात येतो. या दिवसाची सुरूवात नेमकी कशी झाली, या दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? भविष्यात पृथ्वीचं संवर्धन करण्यासाठी आपण काय उपाययोजना करायलं पाहीजेत? याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.आपल्या विकासाच्या अजब कल्पनाच पृथ्वीच्या मुळावर उठल्या आहेत. विकास या शब्दाच्या गोंडस नावाखाली भरमसाठ वृक्षतोड सुरु असून सगळीकडं सिमेंट काँक्रीटचं जंगलं उभे राहताहेत. माणवानं विकासाच्या नावाखाली चुकीच्या कल्पना राबवून पृथ्वीची परिस्थिती इतकी वाईट करून ठेवलीय की, येत्या काही वर्षात, पृथ्वीवर सजीव तग धरू शकणार नाही, अशी भीती पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केली. माणसाने आपल्या स्वार्थासाठी आज हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित करून ठेवलं आहे. ओझनचा थर कमी होत चालल्यानं तापमानात दिवसेंदिवस वाढ होते. अजून काही वर्ष जर तापमानात अशीच वाढ सुरू राहीली तर पुढं काय होईल याचा विचार न केलेलाच बरा! हे सगळं थांबवण्यासाठी आपल्याला नेमकं काय करता येईल ते पाहूया.

सुरूवातीला पाहूयात जागतिक पृथ्वी दिनाचा इतिहास.


जागतिक पृथ्वी दिनाचा इतिहास काय?

आज जगभरात २२ एप्रिल हा दिवस जागतिक पृथ्वी दिन म्हणून साजरा केला जातो. १९६९ मध्ये सांता बारबरा, कॅलिफोर्निया मध्ये ३० लाख गॅलेन तेलाच्या गळतीमुळे सुमारे १०,००० समुद्री पक्षी, डॉल्फिन मासे, सील आणि अन्य समुद्री जीवांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळं संपूर्ण जग हादरून गेलं होतं. त्यांनंतर  अमेरिकेचे सीनेटर गेलॉर्ड नेल्सन यांनी पर्यावरणासाठी काहीतरी करण्याचा निश्चय केला. आणि या तेलगळती विरोधात त्यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी २२ एप्रिल १९७० या दिवशी २ कोटीपेक्षा जास्त अमेरिकन विद्यार्थी, प्राध्यापकांना सोबत घेऊन मोठं आंदोलन केलं. प्रदूषण आणि वन्यजीवांचा –हास या मुद्यावर तेथील समाजाच्या सर्व थरांतील लोकांनी आवाज उठवला होता. हवा, पाणी, वनं-वन्यजीव आणि निसर्ग यांच्या संरक्षणासाठी तेथे मोठा राजकीय दबाव निर्माण झाला होता. आणि त्यामुळेच २२ एप्रिल हा दिन पुढं जगभरात हा ‘अर्थ डे’ म्हणजेच जागतिक पृथ्वी दिन म्हणून ओळखला जाऊ लागला.


पृथ्वी दिनाचं हे कितवं वर्षे?

याआधी पृथ्वी दिवस दोन वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जायचा. २१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस तर २२ एप्रिलला हा दिवस फक्त पृथ्वी दिवस साजरा केला जात होता. संयुक्त राष्ट्रानेही याला परवानगी दिली होती. तेव्हापासून २२ एप्रिल १९७० पासून जगभरातील १९५ देशांमधील अब्जावधी नागरिक पृथ्वीच्या संरक्षणाची प्रतिज्ञा घेतात. हे जगातील सर्वात मोठं जनजागृती आंदोलन असून यंदा पृथ्वी दिवसाला ५१ वर्ष पूर्ण झाली आहेत.


यावर्षीच्या पृथ्वी दिनाची थीम काय आहे?

मागच्या वर्षी जागतिक पृथ्वी दिनाला ५० वर्ष पूर्ण झाली होती. तेव्हा या दिनाची थीम क्लायमेट अॅक्शन ठेवण्यात आली होती, तर यंदाची पृथ्वी दिनाची थीम रिस्टोर अवर अर्थ म्हणजेच पृथ्वीचं जतन अशी ठेवण्यात आली. जगभरातील नागरिक मोठ्या उत्साहानं पृथ्वी दिन साजरा करतात.  मात्र, अलीकडच्या काळात या दिवसाला केवळ उत्सवाचं स्वरूप आलं असून आपण फक्त नावापुरताच हा दिन साजरा करतो. यावर्षाची पृथ्वी दिनाची थीम रिस्टोर अवर अर्थ असल्यानं आपण पृथ्वीचं जतन आणि संवर्धन करणं करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.


पृथ्वीचं संवर्धन करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

– पृथ्वीच्या संवर्धनासाठी रिसायकल आणि रियूज करणं गरजेचं आहे.

– पर्यावरणास हानिकारक बाबींचा जसं प्लॅस्टिक, रासायनिक खतं याचा आपण वापर टाळायला हवा.

– पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करायला हवं. त्यासाठी प्रत्येकानं किमान एक तरी झाड लावून ते जोपासलं पाहिजे.

– शक्य होईल तितकं अपारंपरिक योग्य उर्जास्रोतांचा आपण वापर करायला हवा.

– वाहतूकीची सार्वजनिक साधनं वापरायला पाहीजेत.

– जिथे शक्य असेल तिथं सायकल किंवा किमान पायी चालण्याची सवय आपण टाकली पाहिजे.

– प्लॅस्टिक पिशव्यांचा कमीत कमी वापर केला तर पृथ्वीचे संवर्धन करता येऊ शकतं.


आपल्या आजूबाजूला पर्यावरणाचा दररोज ऱ्हास होत असतांना आपली पृथ्वी, जैवविविधतेचा आणि नैसर्गिक स्रोत वाचविण्याचा प्रयत्न करून आपण पृथ्वीचं सौंदर्य कायम राखूया.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!