Just another WordPress site

Will Nitish Kumar leave NDA in Bihar? : भाजपला धक्का! महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्येही राजकीय भूकंपाचे संकेत; नितीशकुमार आणि राजद सत्तारूढ होणार?

महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असतानाच बिहारमध्येही पुढील ४८ तासांत राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.  बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजपमधील संबंधात गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला असल्याचं दिसतंय.  त्यामुळं नितीशकुमार  राजद सोबत मिळून नव्यानं सरकार बनवण्याची शक्यता, वर्तवली जातेय.महत्वाच्या बाबी 

१. बिहारमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता 

२. नितीशकुमार आणि भाजपमधील संबंध दुरावले 

३. बिहारमधील घडामोडींची भाजपला बसणार झळ 

४. राजद आणि जेडीयू एकत्र येऊन सत्तारूढ होणार का? 

बिहारमध्ये जेडीयू-भाजपचं सरकार आहे. जेडीयूचे नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वात एनडीएचं सरकार बिहारमध्ये आहे. आता १७ जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली घरोघरी तिरंगा अभियानासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती,  त्याला नितीशकुमार उपस्थित नव्हते. २२ जुलै रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात देखील नितीशकुमार यांनी निमंत्रण येऊनही जाणं टाळलं होतं. तर २५ जुलै रोजी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याला नितीशकुमार यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. तरी देखील नितीशकुमार  यांनी त्या सोहळ्याला अनुपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे जेडीयू आणि भाजपमधील शीतयुद्ध चव्हाट्यावर आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. जून २०१९ मध्ये नरेंद्र मोदी सरकारमध्ये जेडीयूला एकच पद ऑफर करण्यात आल्यानंतर नितीशकुमार भाजपवर नाराज झाले होते. शिवाय, अमित शाह यांनी त्यांच्या जवळच्या लोकांना मंत्री म्हणून नियुक्त करून राज्य नियंत्रित केलं असल्याच्या चर्चा असल्यानं नितीशकुमार नाराज असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. अशातच  बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष राजदचे प्रमुख तेजस्वी यादव यांनी विधिमंडळ पक्षाची बैठक मंगळवारी बोलावली. तर, नितीश कुमार यांच्या जेडीयूनं देखील आज बैठक बोलावली.  या घडामोडींवरून बिहारमधील राजकीय वातावरण सध्या चांगलचं तापलेलं दिसतं.. या तापलेल्या वातावरणाची झळ भाजपाला बसण्याची शक्यता असल्याचं जाणकार सांगतात. यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते. येत्या एक दोन दिवसात जेडीयूकडून युती तोडून लवकरच आरजेडी, डावे आणि काँग्रेसला सोबत घेऊन युती करण्याची शक्यता आहे.  भाजपकडून पक्ष फोडण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा जेडीयूकडून आरोप केला जातोय. आरसीपी सिंह यांनी जेडीयूला सोडचिठ्ठी दिली होती. सिंह यांच्या माध्यमातूनच भाजप जेडीयू फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जेडीयूने केला.  एवढेच नव्हे तर नितीश कुमार यांच्या जेडीयूतील आमदारांना मध्यावधी निवडणुका नको आहेत. त्यामुळेच नितीशकुमार हे आरजेडी, लेफ्ट फ्रंड आणि काँग्रेससोबत आघाडी करून सत्ता स्थापन करण्याचा पर्याय शोधत असल्याचं सांगितलं जात. याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो. २००५ नंतर जेव्हाही बिहारमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या आहेत, त्यात दोन मोठे पक्ष एकत्र आल्यास त्यांना जनतेचे समर्थन मिळते असे दिसते आहे. त्यावरून असं लक्षात येतं की, २०२४ साली जर नितीशकुमार आणि तेजस्वी यादव हे एकत्र आले तर भाजप आणि एनडीएचे मोठे नुकसान होऊ शकतं.  बिहारमध्ये लोक सभेच्या ४० जागा आहेत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जर महाआघाडीने  ४० पैकी ३५ जागा जिंकल्या आणि एनडीए ४-६ जागांवर राहिली तर मोदींचे टेन्शन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर विधानसभेच्या २४३ जागा आहेत. सध्याच्या बिहारच्या विधानसभेत राजद ८०, भाजपा ७७ , जेडीयू ४५, काँग्रेस १९, डावे १६ असं संख्याबळ आहे. त्यामुळं जेडीयूनं भाजपशी फारकत घेऊन राजद सोबत पुन्हा संसार थाटला तर बिहारमध्ये सत्ताबदल होऊ शकतो. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते खुलेपणाने सांगत आहेत की, जर नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडली तर राजद त्यांचे समर्थन करेल. दरम्यान, राजद आणि जेडीयू एकत्र येऊन सत्तारूढ होतात का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!