Just another WordPress site

कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी कॉंग्रेस हायकमांडने मल्लिकार्जुन खरगेंचीच निवड का केली?

काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, शशी थरूर आणि कृष्णानंद त्रिपाठी यांनी शेवटच्या दिवशी कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या मैदानात दंड थोपटले. त्रिपाठी यांचा अर्ज रद्द झाला. त्यामुळं अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत शशी थरुर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात थेट लढत होणार आहे. मल्लिकार्जुन खरगे यांना मिळणारा पाठिंबा पाहता तेच नवे अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित आहे.

 

महत्वाच्या बाबी

१. काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार? याची सर्वांनाच उत्सुकता
२. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी थरुर आणि खरगे यांच्यात लढत
३. मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाला जवळपास सर्वांनीच दिली पसंती
४. आगामी निवडणूक खरगेंच्या अध्यक्षतेखाली लढली जाण्याची शक्यता

 

अनेक वर्षांनी काँग्रेसची पक्षांतर्गत अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती असणार आहेत. या निवडणुकीत मल्लिकार्जून खरगे आणि शशी थरूर आमनेसामने आहेत. अशातच खरगे पक्षश्रेष्ठींच्या जवळचे उमदेवार असल्याची आणि काँग्रेस पक्षाचा त्यांनाच पाठिंबा असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत खरगे यांनी सांगितले की, काँग्रेसमध्ये ‘जी-२३’ नावाचा कोणताही बंडखोर गट राहिलेला नाही. माझा उमेदवारी अर्ज भरताना बंडखोर गटातील नेतेही उपस्थित होते. मी कोणाला विरोध करण्यासाठी नव्हे तर, काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. मी सगळय़ांना बरोबर घेऊन संघ आणि भाजपविरोधात संघर्ष करेन, असं वक्तव्य त्यांनी केलं. तर खरगे आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत, आम्हाला एकमेकांशी लढायचे नसून भाजपशी लढायचं असल्याचं थरूर यांनी सांगितलं. शिवाय, खरगेंना मिळत असलेला पाठिंबा पाहता थरूर आपला अर्ज मागे घेतील, असं राजकीय जाणकार सांगतात. असं झालं तर, खर्गे बिनविरोध कॉंग्रेसचे अध्यक्ष निवडले जातील आणि थरूर मैदानात टिकून राहिले तर मतदान होईल.

२०१९ मधील लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून पूर्णवेळ अध्यक्षाची मागणी होत होती. मात्र, हे घोडं अडून होतं. आता अध्यक्षपदाची निवडणूक होत असून खरगे यांचं नाव पुढं आलं. मात्र खरगे यांचं नाव अचानक पुढं आलं असं अजिबात नाही. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच अशोक गेहलोत, कमलनाथ, मल्लिकार्जुन खरगे, मीरा कुमार, आणि मुकुल वासनिक यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, गेहलोत आणि कमलनाथ यांच्यापैकी कुणी तरी एकाने कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचं जू आपल्या खांद्यावर घ्यावं, अशी सोनिया गांधी आणि राहुल गांधींची इच्छा होती. मात्र, अध्यक्षपदी निष्ठावंत व्यक्‍ती बसावा असं गांधी कुटुंबाला वाटत असलं तरी निष्ठावंत असण्यासोबतच त्यांच्यात वेगळे गुणसुद्धा असायला पाहिजे, असंही वाटत होतं. कारण, सव्वाशे वर्षे जुना एक राष्ट्रीय पक्षाचा गाडा हाकायचा झाला, तर केवळ निष्ठावंत असून चालणार नाही तर त्यासाठी नेतृत्वक्षमता, सर्वांना घेऊन चालणारा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्षासाठी फंड गोळा करण्याची क्षमता असली पाहिजे.

गेहलोत आणि कमलनाथ या सर्व निकषांवर फिट बसत होते. म्हणून, दोघांपैकी कुणी तरी एकाने अध्यक्षपद सांभाळावे, असं गांधी कुटुंबाला वाटत होतं. यातही पहिली पसंती कमलनाथ यांना होती. सोनिया गांधी यांनी कमलनाथ यांना दोन-तीन महिन्यांपूर्वीच बोलावून याबाबत विचारणा केली होती. मात्र, आपल्याला मध्य प्रदेशातच राहायचं आहे, असं सांगून त्यांनी नकार दिला. कमलनाथ यांच्यानंतर एक नाव उरलं होते ते म्हणजे अर्थातच गेहलोत यांचं. गहलोत यांना राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवून त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा काँग्रेस हायकमांडचा प्रयत्न होता. निवडून आलेला प्रतिनिधी आणि मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री अध्यक्षपदी विराजमान होईल, असा हेतू होता. तो कठपुतळीसारखा न दिसता खऱ्या नेत्यासारखा दिसला पाहिजे हाही हेतू होता. मात्र, गेहलोत यांना राजस्थान सोडायचं नव्हतं. म्हणूनच त्यांनी राहुल गांधी यांना राजी करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मात्र, राहुल गांधी यांनी तटस्थ भूमिका घेतली आणि गेहलोत यांना नाईलाजापोटी हायकमांडचे म्हणणे ऐकावे लागले. ते अध्यक्ष व्हायला तयार झाले; मात्र, राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी सचिन पायलट यांना बसविण्यास त्यांचा विरोध होता. परिणामी, गहलोत यांना अध्यक्ष करणं हा प्रयत्नही फसला.

त्यानंतर शशी थरूर यांनी अर्ज दाखल केल्यानं हायकमांडचं टेंशन वाढलं होतं. तडकाफडकी निष्ठावंत उमेदवार निवडण्याचं प्रेशर गांधी कुटुंबावर आलं होतं. मल्लिकार्जुन खरगे, मुकुल वासनिक, मीरा कुमार यांच्यापैकी कुणाची निवड करायची? असा प्रश्‍न हायकमांडला अस्वस्थ करीत होता. ही सर्व मंडळी निष्ठावंत असली तरी उर्वरित गुणधर्मांचं काय? असा प्रश्‍न पडला होता. हे विचारचक्र सुरू असतानाच एक नाव पुढं आलं तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचं. मात्र, दिग्विजय सिंह यांनी अनेकवेळा आपल्या वक्तव्यांनी पक्षाच्या प्रतिमेला धक्का दिलेला आहे. शिवाय, मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार जाण्यामागे अनेक तज्ज्ञ दिग्विजय सिंह यांनाच जबाबदार मानतात. त्यांचे म्हणणे आहे की दिग्विजय आपल्या राज्यातील सरकार वाचवू शकले नाहीत, तर राष्ट्रीय पातळीवर पक्षाला कसे वाचवणार. त्यामुळे पक्षाचे नुकसान होईल. ते लहरीपणात कधी काय बोलून जातील याचा नेम नाही? या आणि अशा कितीतरी विचारांच्या लाटा हायकमांडच्या मनात उठत होत्या. अशात खरगे याचं नाव पुढं आलं आणि त्यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब झाले! पक्षात तळापासून वर आलेले ते नेते आहेत. नेहमीच गांधी घराण्याचे निकटवर्तीय राहिले आणि त्यांचा प्रत्येक आदेश शिरसावंद्य मानत राहिले. अशा स्थितीत खरगे अध्यक्ष झाले तर काहीही झाले तरी ते पक्ष हायकमांडला आव्हान देणार नाहीत हे निश्चित आहे. आता, खर्गे यांचं अध्यक्ष होणं जवळपास निश्‍चित झालंय. लोकसभेची निवडणूक त्यांच्या अध्यक्षतेखाली लढली जाईल. खरगे यांच्यामुळे कॉंग्रेस पक्षाची एक मोठी डोकेदुखी संपली असं म्हणायला हरकत नाही. कारण, जी-२३ गटाचे सदस्य पूर्णपणे मवाळ झाले. जवळपास सर्वांनीच खर्गे यांच्या नावाला पसंती दिली. दरम्यान, पंजाबमध्ये गेल्या वर्षीच्या धामधुमीत त्यांची महत्वाची भूमिका होती, मात्र, नंतर काय हाल झाले हे सर्वांनीच पाहिले. गेल्या काही दिवसांत ते राजस्थानमध्येही पर्यवेक्षक म्हणून गेले होते, पण रिकाम्या हातांनी परतले. त्यामुळं आगामी लोकसभा निवडणूकीत ते मोदींचं आव्हान कसं पेलतात हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!