Just another WordPress site

Who is Milind Narvekar : नारायण राणेंनी ज्यांचा ‘मातोश्री’वरील ‘बॉय’ असा उल्लेख केला, ते मिलिंद नार्वेकर आहेत तरी कोण?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी १५ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर अनेक गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली. या पार्श्वभूमीवर  दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर तुफान टीका केली. याचवेळी त्यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली. नार्वेकर हे तर ‘मातोश्री’वरील ‘बॉय’ होते. बेल मारली की काय हवं हे विचारायला यायचे. असं म्हणत राणेंनी त्यांच्यावर टीका केली. यामुळे मिलिंद नार्वेकरांबाबत पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली. त्याच निमित्ताने जाणून घेऊ, कोण आहेत मिलिंद नार्वेकर? 



हायलाईट्स

१. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे नार्वेकर स्वीय सहायक

२. नार्वेकर MPL च्या गवर्निंग कौन्सिलचेही अध्यक्ष 

३. नार्वेकर पहिल्यांदा मातोश्रीवर पोहोचले १९९२ साली

४. नार्वेकरांकडे तिरुपती देवस्थान ट्रस्टचेही सदस्यपद


मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला. मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून गेल्याच वर्षी मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली.  नार्वेकर पहिल्यांदा मातोश्रीवर पोहोचले ते १९९२ साली, एक साधा शिवसैनिक म्हणून. त्यांची राजकीय कारकिर्द मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरातून सुरू झाली होती.  शिवसेनेचे गटप्रमुख म्हणून ते काम करायचे. १९९२ च्या महापालिका निवडणुकीआधी त्यांचा वॉर्ड विभागला गेला. नवीन वॉर्डचं शाखाप्रमुख पद मिळेल या आशेने मिलिंद नार्वेकरांनी पहिल्यांदा मातोश्रीत प्रवेश केला. पुढं नार्वेकर यांचा संवाद साधण्याची शैली, हुशारी पाहून उद्धव ठाकरेंनी त्यांची आपल्या स्वीय सचिव पदावर नेमणूक केली. गेली २८ वर्षं मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत आहेत. सुरूवातीला मिलिंद नार्वेकर मातोश्रीवर पडेल ते काम करायचे. मात्र, त्यानंतर उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक बनले. १९९२ ते २००२ या काळात शिवसेना नेते, कार्यकर्ते, इतर पक्षातील नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात येऊ लागले. त्यांच्या गाठीभेटी सांभाळण्याचं काम नार्वेकर करायचे. १९९७ साली उद्धव ठाकरे राजकारणात हळूहळू स्थिरस्थावर झाले. २००२ मध्ये महाबळेश्वरच्या अधिवेशनात त्यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरेंची वेळ देणं, नेते-कार्यकर्त्यांचे फोन घेणं, दौरे आखणं ही जबाबदारी नार्वेकर यांच्या खांद्यावर असायची.  स्वीय सहाय्यक म्हणून काम करता करता आता ते पक्षाचे सचिव झाले आहेत. जसजसं पक्षात उद्धव ठाकरे यांचं स्थान उंचावत गेलं तसतसं मिलिंद नार्वेकर हे देखील शिवसेनेत स्थिरस्थावर झाले.  अलीकडेच त्यांची देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी देखील नियुक्ती झाली. नार्वेकर कोणत्याही घटनात्मक पदावर नसले तरी राज्यातील राजकारणात ते सध्या प्रचंड महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. शिवसेना पक्षात त्यांचा बराच दबदबा असल्याचं नेहमीच बोललं जातं. नार्वेकर हे  फारसे लाइमलाइटमध्ये नसतात तरीही पक्षासाठी ते अत्यंत महत्त्वाचे समजले जातात. उद्धव ठाकरे यांच्या पडत्या आणि चांगल्या काळात देखील नार्वेकर हे कायम त्यांच्या सोबत होते. त्यामुळेच शिवसेनेतील त्यांचं स्थान अढळ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!