Just another WordPress site

उद्धव साहेब, सावध व्हा! सुषमा अंधारे या राष्ट्रवादीचे प्रॉडक्ट; गुलाबराव पाटलांची टीका

जळगाव : ठाकरे आणि शिंदे गटातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. एका गटाच्या आरोपानंतर दुसऱ्या गटातून त्याला प्रत्त्युत्तर देण्यात येत आहे. शिवसेनाउद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी १ तारखेला धरणगाव येथे प्रबोधन सभा घेऊन शिंदे गटावर चौफेर टीका केली. यातही गुलाबराव पाटील यांच्यावर अंधारे यांनी सडकून टीका केली. मी तुम्हाला सळो की पळो करून सोडणार, आज तुम्हाला झोप येणार नाही, असा इशाराच त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना दिला. यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन सभा ही जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणारी आहे. सुषमा अंधारे या राष्ट्रवादीचे प्रॉडक्ट आहे, अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. उरली सोडलेली शिवसेना डॅमेज करण्यासाठी राष्ट्रवादीकडून सुषमा अंधारे हे पार्सल इकडे आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या या पार्सल पासून सावध रहावे. राष्ट्रवादीचे हे पार्सल तुमच्या पक्षाला डब्यात नेल्याशिवाय राहणार नाही, अशी जोरदार टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

सुषमा अंधारेंनी केली होती टीका

आमचे नेतृत्व हे संयमी व शिस्तबद्ध आहे. आमचे ४० भाऊ तिकडे गेले आहे, त्यातील एक शेरो शायरी करणारे भाऊ गुलाबराव पाटील. एकाच घरात किती दिवस सत्ता ठेवायची असे गुलाबराव पाटील म्हणतात. मात्र, ते कधीपासून पद भोगत आहेत. याचा पाढाच सुषमा अंधारे यांनी वाचला. गुलाबराव पाटील यांनी स्वतःचा चेहरा आरशात पाहावा. तुम्ही २० वर्ष वेगवेगळ्या मार्गाने सत्ता भोगत आहात. मग इतर कार्यकर्त्यांना तुम्ही पुढे करून त्यांना सत्तेवर का आणलं नाही?

दसऱ्या मेळाव्यात वक्तव्य करणाऱ्या गुलाबराव पाटील यांनी झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवायची होती. युपी, बिहारमधून लोकांना सभेसाठी बोलवलं. लोकशाही व इतर प्रसार माध्यमांवर याबाबत बातम्या आल्या आहेत. निधी बाबत यांनी बोलायची का हिंमत केली नाही? तेव्हा का दातखिळी बसली? असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला होता.

तसेच तुम्ही जर हिंदुत्वासाठी तिकडे गेला असाल तर मग ४० लोकांनी हिंदुत्वासाठी जीव पणाला लावायला पाहिजे. यापूर्वी राणे गेले, भुजबळ गेले. मात्र, ते त्यांच्या जीवावर गेले याचा विचार गुलाबराव पाटलांनी करायला हवा होता. ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात घान करण्याची वृत्ती असल्याची टीका गुलाबराव पाटील यांच्यावर केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!