Just another WordPress site

Shivsena । सध्याच्या राज्यातील घडामोडी पाहता शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होऊ शकते का?

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्राचा दौरा करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यानंतरच्या वार्तालापात त्यांनी यूपीए अस्तित्वातच नसल्याचे वक्‍तव्य केलं. मात्र, भाजपला आव्हान द्यायचं असेल तर काँग्रेसला वगळून राष्ट्रीय स्तरावर कोणतीही आघाडी प्रभावी ठरू शकत नाही, असं विधान खुद्द संजय राऊत यांनी केलं. शिवसेना आणि काँग्रेसची जवळीक वाढत असल्याचं चित्र आहे. त्यात संजय राऊत हे आज दिल्लीत राहुल गांधींची भेट घेणार आहे. त्यामुळे एनडीए मधून बाहेर पडलेली शिवसेना आता  यूपीएमध्ये सहभागी होणार ? या चर्चेला देशाच्या राजकारणात उधाण आलं. 



हायलाईट्स

१. शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होणार का? 

२. राज्याच्या राजकारणात चर्चेला एकच उधाण

३. शिवसेना मोठा निर्णय घेण्याची शक्यता

४. खा. संजय राऊत घेणार राहूल गांधींची भेेट


उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यासह ५ राज्यांच्या निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना मोठा निर्णय घेण्याच्या विचार असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत असलेली शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यूपीएत सहभागी होण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणूक शिवसेना काँग्रेससोबत लढेल, असं बोललं जातं. यासाठी शिवसेनेने आपले मन बनवले असून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचे कळते. या भेटीत राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची यूपीएबाबत नेमकी भूमिका काय आहे, हे राहुल आणि प्रियांका यांना सांगतील, असेही बोलले जातंय. ही बैठक सकारात्मक झाल्यास येत्या काही दिवसांत राष्ट्रीय राजकारणातील मोठी घडामोड पाहायला मिळू शकते, असं राजकीय जाणकार सांगतात.  सध्या शिवसेना युपीए जाण्याची दाट शक्यता दिसून येते. त्यामागंच कारण म्हणजे, २०२४ मध्ये मोदींविरोधात भक्कम आघाडी करण्याच्या उद्देशानं ममता बॅनर्जी मुंबईत आल्या होत्या. यावेळी त्यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबतच १ तास चर्चाही झाली. मात्र ममतांच्या टीकेवरुन हे लक्षात येतंय, की त्यांना काँग्रेसलाच दूर ठेवायचं आहे. मात्र, महाराष्ट्रातील राजकीय समीकरण पाहता, हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मान्य नाही. यूपीएलाच मजबूत करण्यावर पवारांसह शिवसेनेचाही भर असल्याचं दिसून येतंय. सेना युपीएत सहभागी होण्यामागे आणखी एक फॅक्टर आहे. काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्रातील आघाडी सरकार चालू शकत नाही. कॉंग्रेसनं पाठींबा काढून घेतल्यास सरकार कोसळण्याची भीती शिवसेनेला आहे. त्यामुळं युपीएत सहभागी झाल्याशिवाय, शिवसेनेला पर्याय नाहीये, असं राजकीय जाणकार सांगतात. दुसरं म्हणजे,  शिवसेना पक्ष अनेक वर्षे भाजपच्या नेतृत्वातील एनडीएमध्ये होता. मात्र,  दोन वर्षांपूर्वी सेना एनडीएतून बाहेर पडली आणि आपली वेगळी चुल मांडली. मात्र, अद्यापही शिवसेनेने यूपीएत अधिकृत प्रवेश घेतलेला नाही. २०१९ मध्ये शिवसेनेचा मार्ग भाजप पासून आता वेगळा झाला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचे राजकीय मित्र झाले आहे.  राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. राजकारणाच्या केंद्रस्थानी कायम असते ती सत्ता आणि सत्तेचे फायदे. राजकीय नेते हे राजकारणापलीकडं आपले हितसंबंध जपतात आणि त्याचा उपयोग वेळप्रसंगी राजकारणातही करुन घेतात. उद्धव ठाकरेंची सध्या भूमिका पाहता, हे आगामी निवडणुकांमध्ये भाजपसोबत जातील असं सध्या दिसत नाही. दुसरं म्हणजे,  संजय राऊत यांची अलीकडील वक्तव्ये ही शिवसेना यूपीएच्या जवळ जात असल्याचे इशारे देणारी आहे. त्यामुळं शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होऊन भाजपला टक्कर देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!