Just another WordPress site

School Bus : शाळेत परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश, काय असतात स्कुल बस वाहतुकीचे नियम?

स्कूलबस धोरणानुसार शाळेच्या स्तरावर स्थापन होणाऱ्या शाळा परिवहन समित्या नावापुरत्याच असतात. समितीचे बहुतांश पदाधिकारी आणि सदस्यांना त्यांचे कर्तव्य काय हेच माहिती नसल्याची बऱ्याचदा समोर येत. आता न्यायालयाने फटकारल्यानंर प्रत्येक शाळेत स्कुलबस समिती बंधनकारक शिक्षण विभागाचे निर्देश दिले. दरम्यान,  स्कुल बस वाहतुकीचे नियम काय आहेत? याच विषयी जाणून घेऊ.


महत्वाच्या बाबी 

१. ‘विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षा’ हा चिंतेचा विषय

२. प्रत्येक शाळेत स्कुलबस समिती बंधनकारक

३. १५ सप्टेंबरपर्यंत समिती स्थापन करण्याचे आदेश

४. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मुख्याध्यापक जबाबदार


हल्ली ‘विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षा’  हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनतोय. त्यामुळं विद्यार्थ्यांची ने आण करणार्‍या वाहतूक व्यवस्थेवर सुप्रीम कोर्टाने काही महत्वाचे निर्देश दिले. त्यानुसार प्रत्येक राज्यातील रोड ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीने नियमावली बनवली. 

काय असते परिवहन समिती? 

शाळेच्या वाहतुकीसंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी एक वेगळी समिती असणं गरजेच आहे.  विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार असतात. त्यांच्या अध्यक्षतेखाली शाळेत परिवहन समिती स्थापन करण्यात येते.  या समितीत शाळेचे मुख्याध्यापक, पोलीस अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, शिक्षणाधिकारी आणि इतर आधिकारिक मंडळी असतात.  बसचे मार्ग निश्चित करणे, थांबे निश्चित करणे, नियम पालनाकडे लक्ष देणे, शुल्क निश्चित करणे याकडे लक्ष देणं हे या समितीचं काम असतं. 


बस कशी असावी? 

बसची यांत्रिक स्थिती उत्तम असवी. नियमानुसार बस १५ वर्षांपेक्षा अधिक जुनी नसावी. शाळेची बस ही पिवळ्या रंगाची असावी. बसच्या दोन्ही बाजूच्या खिडक्यांखाली आणि पुढे चॉकलेटी रंगाचा पट्टा असावा. या पट्ट्यावर शाळेचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, बस कंत्राटी असल्यास त्याचे तपशील पांढऱ्या रंगाने ठळकपणे लिहिलेले असणे आवश्यक आहे. बसच्या मागे आणि पुढे शालेय बस असे ठळक अक्षरात लिहिलेले असावे. विद्यार्थ्यांना बसमध्ये सहज चढता-उतरता येईल अशा पायऱ्या असाव्यात. बसमध्ये विद्यार्थ्यांची दप्तरे, डबे ठेवण्यासाठी सुविधा असावी. आसने फार उंच नसावीत. खिडक्यांमध्ये तीन आडव्या दांड्या असाव्यात. दोन दांड्यांमधील अंतर ५ से.मी पेक्षा जास्त असू नये.


परवान्याची आवश्यकता

शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी त्या वाहनांकडे मोटार वाहन अधिनियमाच्या कलम ७४ अंतर्गत वैध कंत्राट असणे आवश्यक आहे. त्यानुसार शाळा व्यवस्थापनाच्या मालकीची आणि केवळ स्कूलबस म्हणूनच वापरण्यात येणारी वाहने त्यांच्या सुरुवातीच्या नोंदणी दिनांकापासून वीस वर्षांपेक्षा अधिक जुनी असता कामा नयेत.


स्कूलबसमध्ये काय सुविधा काय असाव्यात?

प्रत्येक शाळेने वाहतुकीची व्यवस्था पाहणारा एक अधिकारी नेमावा. शाळेच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा अपघात विमा काढलेला असणे आवश्यक आहे. शाळा प्रशासनावर विमा काढण्याची जबाबदारी आहे.शाळा प्रशासन विम्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या शुल्कात समाविष्ट करू शकते. प्रत्येक बसमध्ये आवश्यक औषधे आणि साहित्यासह प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अग्निशमन यंत्रणा असणेही गरजेचे आहे. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असणेही आवश्यक आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बसमध्ये एक महिला सेविका नियुक्त असावी. आपातकालीन परिस्थितीमध्ये आवश्यक म्हणून शाळेच्या प्रत्येक बसमध्ये विद्यार्थ्यांची यादी आणि त्यांच्या घरच्यांचे फोन नंबर असणं गरजेचं आहे. बस स्वच्छ, निर्जंतुक केलेली असावी. बसमध्ये एअर फ्रेशनर असावे. मुलांच्या बॅग्ज, पाणी बॉटल्स, जेवणाचे डबे ठेवण्यासाठी बसमध्ये स्वतंत्र व्यवस्था आवश्यक आहे. 


कर्मचाऱ्यांची नियुक्ती कशी?

बसच्या चालकास किमान पाच वर्षे बस चालवण्याचा अनुभव असावा. त्याच्यावर कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल नसावा. चालकाशिवाय सहाय्यक बसमध्ये असणेही बंधनकारक आहे. विद्यार्थिनी असल्यास महिला सहाय्यक असावी. मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांचे ज्ञान असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. सर्व बस चालकांच्या वेगवेगळ्या वैद्यकीय तपासण्या करण्यात याव्या. त्याचबरोबर चारित्र्य पडताळणी केलेली असणेही गरजेचे आहे.

कर्मचारी-चालकांसाठी नियम काय?

– कर्मचारी निश्चित केलेल्या गणवेशात असणे आणि त्यांच्याकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. 

– शाळेच्या वेळाचे बस चालकांनी काटेकोर पालन करावे. 

– सहाय्यकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.  

– विद्यार्थ्यांना चढ-उतार करण्यासाठी मदत करावी.

– बसमध्ये धूम्रमान, मद्यपान करणे, गाणी लावणे यासाठी मनाई आहे. 

– कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आपणहून कोणतेही खाद्यपदार्थ देऊ नयेत. 

– शाळेने किंवा वाहतूक समितीने निश्चित केलेल्या मार्गावरूनच बस न्यावी. 

– प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांचे पालकांकडेच सहाय्यकांनी सोपवावे. 


विद्यार्थ्यांनी पाळावयाच्या सूचना

– बस चालू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आपल्या जागेवर बसावे.   

– प्रत्येक विद्यार्थ्याने आपले पास सोबत ठेवावे.

– विद्यार्थ्यांनी शरिराचा कोणताही भाग खिडकीतून बाहेर काढू नये  

– विद्यार्थ्यांनी बसमध्ये स्वच्छता ठेवावी. 

– विद्यार्थ्यांनी बसचे नुकसान केल्यास याबाबत मुख्याध्यापकांना कळवणे गरजेचे आहे.


प्रवासी संख्या आणि वेगाची मर्यादा काय?

बसच्या एकूण प्रवासी संख्येपेक्षा अधिक विद्यार्थी घेऊ नयेत असा नियम आहे. बसमध्ये वेग नियंत्रक असणे आवश्यक आहे.मुंबई महानगर परिसरात बसची कमाल वेग मर्यादा ताशी ४० किमी, तर इतर महानगरांमध्ये ताशी ५० किमी अशी निश्चित करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!