Just another WordPress site

Sant Gadage Baba । गाडगे महाराजांची काय आहे दशसुत्री? घ्या जाणून

महाराष्ट्र ही संतांची भूमी. चार्वाक ते गाडगे महाराजांपर्यंत महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. संतांची एक समृद्ध परंपरा आपल्याला आहे. जेव्हा समाजामध्ये काही तरी अनिष्ट घडून जनतेला ग्लानी यायची, तेव्हा लोकांचं प्रबोधन करुन त्यांना जागृत करण्याचं काम याच संतांनी केलं होतं. विसाव्या शतकात देखील जेव्हा बहुजन समाज हा अज्ञान, अंधश्रद्धा, देव-धर्म, रुढी-परंपरा आणि अन्याय-अत्याचार यामध्ये अडकून होता, तेव्हा या समाजाला यातून बाहेर काढण्याचं काम विज्ञानवादी संत-सत्यशोधकी समाजवादी-कर्मयोगी गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून केलं. आज गाडगेबाबा यांचा स्मृतीदिन. याच निमित्ताने त्यांच्या दशसूत्रीला समजून घेऊया. 


आज आपण एकविसाव्या शतकात जगतोय. विज्ञानाच्या मदतीनं माणसांनी खूपच प्रगती केली. मात्र दुसरीकडे हाच मानव रुढी -अंधश्रद्धा, देवधर्म यातच अडकून असल्याचं दिसून येतं. माणसानं विज्ञानाची सृष्टी घेतली मात्र दृष्टी घेतलीच नाही. केवळ अशिक्षित आणि अडाणी वर्गच या रुढी परंपरांमध्ये गुंतलेला नाहीये तर शिक्षित वर्ग देखील या थोतांड गोष्टींचा बळी ठरतोय. त्यामुळे २१व्या शतकात देखील दिशा चुकलेल्या या समाजाला आज गाडगे महाराजांच्या विचारांची गरज आहे.

गाडगे बाबा हे लोकजीवन तेजानं उजळण्यासाठी खराट्याने गावाचे रस्ते झाडीत. किर्तन करत. गाडगे महाराज चालते फिरते समाज शिक्षक होते. त्यांनी अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा दुर सारुन लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. साक्षरतेचा प्रचार आणि प्रसार केला. ज्या गावात गाडगे महाराजांचं कीर्तन असायचं, ते गाव आधी ते स्वच्छ करायचे. मग रात्री आपल्या कीर्तनातून खेड्यापाड्यातील निरक्षर लोकांची डोक्यातील घाण साफ करायचे. स्वच्छतेचा मूलमंत्र त्यांनी संबंध देशाला दिला. दीन-दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करत त्यांनी माणसातील अज्ञानाची, दुर्गुण आणि दोषांची जाणीव करुन दिली. गाडगेबाबांनी त्यांच्या जीवनात लोकांना दशसूत्री देखील सांगितली होती.

संत गाडगेबाबांची दशसूत्री संदेश

१. भुकेलेल्यांना अन्न द्या

२. तहानलेल्यांना पाणी द्या

३. उघड्या-नागड्यांना वस्त्र द्या

४. गरीब मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत करा

५. बेघरांना आसरा द्या

६. अंध, पंगू, रोगी यांच्यावर औषधोपचार करा

७. बेकारांना रोजगार द्या

८. पशू-पक्षी, मुक्या प्राण्यांना अभय द्या

९. गरीब तरुण-तरुणींचे लग्न लावून द्या

१०. दुःखी व निराशांना हिंमत द्या 

संत गाडगेबाबांची ही दशसूत्री म्हणजेच आजचा खरा धर्म आहे. हीच खरी भक्ती आणि देवपूजा आहे, असं ते सांगायचे. विसाव्या शतकात होऊन गेलेल्या संत गाडगे महाराजांचे विचार आज एकविसाव्या शतकातही कालसुसंगत वाटतात. आपल्याला समृद्ध जीवन जगायचं असेल तर गाडगे महाराजांचा विचार समजून घेणं गरजेचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!