Just another WordPress site

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊतांच्या मागे भाजप हात धूऊन का लागलाय?

शिवसना खासदार संजय राऊतांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीनं रविवारी सकाळी ७ वाजता राऊतांच्या घरावर धाड टाकली असता त्यांच्या घरात  ११ लाख ५० हजार रुपयांची रोकड सापडली. त्यानंतर राऊत यांना अटक करून ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान, आता न्यायालयानं ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली. मात्र, संजय राऊतांच्या मागे भाजप हात धूऊन का लागलाय? याच विषयी जाणून घेऊ.



महत्वाच्या बाबी 

१. खा. संजय राऊत यांना ईडीकडून अटक

२. ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली

३. राऊत शिवसेनेची ढाल बनून काम करायचे 

४. राऊत यांचा झुकेगा नहीं पवित्रा कायम 

महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून ते उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देईपर्यंत संजय राऊत एकटेच भाजपला जोरदार भिडल्याचे राज्यातील जनतेनं पाहिलं.. भाजपचे किरीट सोमय्या, नारायण राणे आणि नवनीत राणा यांच्याकडून महाविकास आघाडीवर पर्यायाने शिवसेनेवर होत असलेल्या टिकेला उत्तर देण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संजय राऊत हेच भाजपला  एकटे अंगावर घेताहेत.  त्यामुळे भाजपनं सातत्यानं त्यांना लक्ष्य केलं. खरंतर २०१९ च्या अखेरपासून याची सुरुवात झाली. विधानसभेची निवडणूक झाली. निकाल लागला. भाजपला १०५, तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली असल्यानं त्यांचं सरकार येणं अपेक्षित होतं. मात्र मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षातले संबंध टोकाला गेले आणि शिवसेनेनं थेट काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केला आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास राऊतांची भूमिका महत्त्वाची होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या मदतीनं राऊत जबरदस्त राजकीय चाल खेळले. या सत्ता संघर्षाच्या काळात राऊतांनी भाजपवर टीकेचे बाण सोडले. दररोज सकाळी ते माध्यमांशी संवाद साधायचे. भाजपवर घणाघाती टीका करून आणि पवारांच्या राजकीय कौशल्याच्या मदतीनं त्यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळवून दिलं. भाजपच्या जनादेशाविरोधात जाऊन महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. शिवसेना पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाईल अशी शक्यता नसतानाही महाविकास आघाडीचा जन्म झाला. यात संपूर्ण प्रक्रियेत संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. तेव्हापासून संजय राऊत भाजपच्या टार्गेटवर असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. राज्यात ठाकरे सरकार आल्यानंतरही राऊत यांचा धडाका सुरूच होता. राऊत यांचा महाविकास आघाडी सरकार आणण्यात जसा मोलाचा वाटा होता. तसंच त्यांनी महाविकास आघाडीवर होणाऱ्या हल्ल्यांना चोख आणि सडेतोड उत्तर देण्यासाठी सातत्याने  भाजपवर टीका केली. कोरोना काळात होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण, एनसीबीचे छापे, ईडीकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेल्या कारवाया यासह अनेक बाबींवर राऊत भाष्य करायचे. भाजप नेत्यांकडून होत असलेले शाब्दिक हल्ले परतवून लावण्याचं काम त्यांनी केलं. शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारसाठी राऊतांनी ढाल बनून काम केलं. आणि त्यामुळेच  संघर्ष टोकाला गेल्याचं बोलल्या जातं. ठाकरे सरकारवर होत असलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचं काम राऊतांनी केलं.  त्यामुळेच राऊत भाजपच्या रडारवर आले. आणि त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी बंड केलं. सेनेच्या ४० आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. ठाकरे सरकार कोसळलं. आणि शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. शिंदेच्या बंडखोरीने पक्ष फुटला. सगळेच आमदार, खासदार पक्ष सोडत होते. मात्र, संजय राऊतांनी उध्दव ठाकरेंची साथ सोडली नाही. उलट या सगळ्या गदारोळात राऊतांनी उध्दव ठाकरेंची मुलाखत घेऊन भाजपचा वचपा काढला. दुसरं म्हणजे, राऊत हे सेनेचा आक्रमक चहेरा आहेत. ते रोज भाजप आणि शिंदे गटावर टीकेची झोड उठवतात. त्यामुळं राऊतांना  अटक केल्यास शिवसेनेकडे बोलण्यासाठी कोणी राहणार नाही, या हेतून  भाजप ईडीच्या माध्यमातून संजय राऊतांना टार्गेट करत असल्याचं जाणकार सांगतात. दरम्यान, संजय राऊतांची अटक हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जातो. मात्र राऊत यांचा झुकेगा नहीं पवित्रा कायम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!