Just another WordPress site

RRR Movie । ‘RRR’सिनेमा ज्यांच्या आयुष्यावर बेतला ते अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम आहेत तरी कोण ?

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपट बाहुबली फेम दिग्दर्शक  एस. एस. राजामौली यांच्या बहुचर्चित मल्टीस्टार चित्रपट ‘RRR’चा  ट्रेलर अलीकडेच रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये राम चरण आणि ज्युनियर एनटीआर फ्रेंडशिप गोल्स देताना दिसताहेत.  ट्रेलर पाहून चित्रपटाच्या कथेचा अंदाज येतो  की, यात सिनेमात ब्रिटिश राजवटीविरुद्धचा लढा दाखवण्यात आलाय. हा सिनेमा ७ जानेवारीला प्रदर्शित होणार असून केवळ दक्षिणेतच नाही तर जगभरात या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. दरम्यान, ज्या दोन नायकांच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतलेला आहे, ते क्रांतीकारक आहेत तरी कोण? याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.

हायलाईट्स

१. बहुचर्चित ‘RRR’सिनेमा ७ जानेवारी होणार प्रदर्शित 

२. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर प्रमुख भूमिकेत 

३. दोन महान क्रांतीकारकांच्या आयुष्यावर सिनेमा

४. अल्लुरी सीताराम राजू, कोमाराम भीम यांचा संघर्ष 

या चित्रपटात साऊथ सिनेसृष्टीतील दोन मोठे स्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत दिसताहेत. या चित्रपटात राम चरण यांनी स्वातंत्र्यसैनिक ‘अल्लुरी सीताराम राजू’ची भूमिका साकारलीये. तर साऊथचा अॅक्शन स्टार ज्युनियर एनटीआर ‘कोमाराम भीम’च्या भूमिकेत दिसणार आहे. 


कोण आहेत अल्लुरी सीताराम राजू?


अल्लुरी सीताराम राजू हे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील एक क्रांतिकारक आहेत. त्यांचा जन्म ४ जुलै १८९७ मध्ये आंध्र प्रदेशातील  मोगलू गावातील एका मध्यमवर्गीय कुटूंबात झाला. लहानपणी त्यांच्यावर क्रांतिकारी विचारांचे संस्कार झाले. अल्लुरी यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. वडिलांच्या मृत्युनंतर त्यांनी तीर्थयात्रेला प्रारंभ केला. यादरम्यान त्यांनी देशातील अनेक शहरे, मुंबई, वडोदरा, बनारस, ऋषिकेश असा प्रवास केला. या वेळी त्यांना ब्रिटिश राजवटीतील सामाजिक-आर्थिक स्थिती, विशेषतः आदिवासी क्षेत्राची दयनीय स्थिती दिसून आली. तीर्थयात्रेनंतर त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षीच संसारिक जीवनातून संन्यास घेतला. ते जंगलात राहू लागले. त्यांनी जंगलात राहणाऱ्या आदिवासींना उपदेश करून त्यांची जीवनशैली बदलविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत देश इंग्रजांच्या अत्याचाराचा साक्षीदार झाला होता. अल्लुरी यांच्या जीवनावर त्याचा खोल परिणाम झाला.  यानंतर त्यांनी गांधींच्या अहिंसेचे विचार सोडून इंग्रजांविरुद्ध युद्ध सुरू केले. त्यांनी आदिवासींमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला. आदिवासीं लोकांना ब्रिटिशांच्या विरोधात जागृती निर्माण करून ब्रिटिशांपासून भारताला स्वतंत्र करण्यासाठी संघटित केलयं. आणि ब्रिटिशांच्या विरोधात रम्पा उठाव केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत असताना अल्लुरी यांनी इंग्रजांकडून अनेक छळ सोसले होते. मात्र, त्यांनी इंग्रजांच्या जाचक धोरणांसमोर त्यांनी कधीही मान झुकवली नाही. त्यांनी संपूर्ण रम्पा क्षेत्राला क्रांतिकारी आंदोलनाचे केंद्र बनवलं होत. त्यांच्या ब्रिटिशविरोधी उठावाला आदिवासींनी शेवटपर्यंत साथ दिली. आपल्या ३०० सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी ऑगस्ट १९२२ रोजी चिंतापल्ली पोलीस ठाण्यावर हल्ला करून शस्त्रे लुटली. आंध्र प्रदेशातील ब्रिटिश सैन्य अल्लुरी सीताराम राजूंना पकडण्यास अपयशी ठरल्यामुळे केरळमधील मलबार येथील पोलिसांची मदत घेण्यात आली. मात्र मलबार पोलिसांना अनेकदा पराभव पतकरावा लागला. ६ मे १९२४ ला अल्लुरी राजूंच्या सैन्याचा सामना शस्त्रांनी सुसज्ज अशा आसाम रायफल दलासोबत झाला, ज्यात अनेक क्रांतिकारक मारले गेले. दरम्यान, मॅम्पा येथे ७ मे ला ब्रिटिश सैन्याविरोधात झालेल्या चकमकीमध्ये अल्लुरी सीताराम राजू यांचा मृत्यू झाला. अल्लुरी सीताराम राजू आज आपल्यात नसले तरी त्यांच्या बलिदानात खूप काही आहे, ज्यातून आपण प्रेरणा घेऊ शकतो. हा सिनेमा ज्यांच्या आयुष्यावर बेतला ते दुसरे क्रांतीकारक आहेत कोमाराम भीम. 


कोण आहेत कोमाराम भीम ?कोमाराम यांचा जन्म १९०१ मध्ये हैदराबाद मधील संकेपल्ली येथे झाला. ते गोंड समाजाचे होते. देशाला  स्वातंत्र्य मिळवून देणे हाच भीम यांचा उद्देश होता. भीम १९ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांना निजामांनी मारले. वडिलांच्या मृत्यूमुळे व्यथित झालेल्या भीमाला ‘निजामाच्या राजवटीला धडा शिकवायचा होता, मात्र, निजामाच्या राजवटीशी एकटा लढण्याची क्षमता त्याच्यात नव्हती. तरुणपणात भीम यांच्यावर अल्लुरी सीताराम राजू यांचा खूप प्रभाव होता. त्यांच्यासारखच भीम यांनी देशासाठी काहीतरी करायचं होतं. दरम्यान, कोमाराम भीम यांना भगतसिंग यांच्या फाशीची बातमी मिळाली, त्यामुळे ते खूप दुःखी झाले. यानंतर त्यांनी निजामाच्या राजवटीविरुद्ध बंडाचे रणशिंग फुंकले. या दरम्यान त्यांनी  हैदराबादच्या स्वातंत्र्यासाठी ‘असफ जही घराण्या’ विरुद्ध बंड केले. ‘निजामाच्या राजवटीने’ कोमाराम भीम यांनी पकडण्यासाठी मोठी फौज पाठवली, मात्र, भीम यांनी निजाम सैनिकांचा नायनाट केला. नंतर त्यांनी हैदराबादच्या निजाम सरकारच्या विरोधात ‘गनिमी मोहीम’ सुरू ठेवली. या काळात भीम यांनी शौर्याने युद्ध केले आणि जंगलातील प्रत्येक लढाई जिंकली. भीमाच्या शौर्याने निजामाचे सैन्य भयभीत होत होते. अखेर निजाम आणि इंग्रजांविरुद्ध शेवटच्या क्षणापर्यंत लढणाऱ्या या योद्ध्याने २७ऑक्टोबर १९४० रोजी हे जगाचा निरोप घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!