Just another WordPress site

Ravindra Waikar । ईडीकडून तब्बल आठ तास ज्याची चौकशी करण्यात आली ते रविंद्र वायकर आहेत तरी कोण?

प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अजित पवारांचे नातेवाईक, हसन मुश्रीफ, भावनाताई गवळी,अर्जुन खोतकर आणि प्राजक्त तनपुरे यांच्या नंतर ईडीने आता आपला मोर्चा शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांच्याकडे वळवला. वायकर यांना ईडीने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये समन्स बजावल्यानंतर ते काल ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले होते. वायकर यांची काल आठ तास ईडीकडून चौकशी करण्यात आली. नेमक्या कोणत्या प्रकरणी त्यांनी ईडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, रविंद्र वायकर आहेत तरी कोण? आणि त्यांची ईडीकडून चौकशी का करण्यात आलीये? याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.


हायलाईट्स

१. आमदार रविंद्र वायकर यांची ईडीकडून ८ तास चौकशी

२. वायकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय 

३. फडणवीस सरकारच्या काळात वायकर मंत्रीही होते 

४. वायकरांच्या चौकशीनंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा 

रवींद्र वायकरांवर पहिल्यांदा काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी आरोप केला होता.  वायकर आणि मातोश्रीचे आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप निरुपम यांनी केले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र निरुपम यांना हे आरोप सिद्ध करता आले नव्हते. नंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही महिन्यांपूर्वी  वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत जमिनीबाबत गंभीर आरोप केले होते. अलिबागमधील कोर्लाई येथे वायकर आणि ठाकरे यांनी संयुक्तपणे खरेदी केलेल्या जमिनीवर १९ बंगले असल्याचा दावा, सोमय्या यांनी  केला होता. शिवाय, या संपत्तीबाबतची माहिती  निवडणूक आयोगापासून लपविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर वायकर यांनी सोमय्यांना मानहानीची नोटीस पाठवली होती. या सर्व घडामोडींनंतर काल अचानक वायकरांची ईडी कडून वेगवेगळ्या प्रकरणांवरुन तब्बल आठ तास वायकरांची चौकशी करण्यात आली.  वायकर यांच्या चौकशीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी वायकर यांना नेमके कोणते प्रश्न विचारले, किंवा त्यांची आज कोणत्या प्रकरणात चौकशी केली हे समजू शकलेले नाही. दरम्यान, वायकर यांच्या चौकशीनंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्यायेत.  रवींद्र दत्ताराम वायकर हे ६३ वर्षाचे आहेत. गेल्या सरकारमध्ये म्हणजे फडणवीस सरकारच्या काळात ते मंत्री होते. त्यांना गृहनिर्माण मंत्रिपद देण्यात आलं होतं. आपल्या कार्यकाळात वायकर यांनी गृहनिर्माण धोरण अधिक सोपं करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. साधा शिवसैनिक ते गृह निर्माण राज्यमंत्रीपदापर्यंत मजल मारण्याचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. वायकर यांनी मुंबई महापालिकेत २० वर्षे नगरसेवक म्हणून काम पाहिलं आहे. १९९२ मध्ये ते जोगेश्वरीतून पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर निवडून आले होते. त्यानंतर ते २००९, २०१४, आणि २०१९ मध्ये सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून निवडून आले होते. या काळात ते सलग तीन वेळा मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षही होते. मुंबई महापालिकेत २० वर्षे नगरसेवक राहिलेल्या वायकर यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. प्रशासनाकडून काम करून घेण्याची त्यांची हातोटी आहे. महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना शिवसेना भवन आणि शिवालय उभारण्याच्या कामात वायकरांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचे विश्वासातील आणि मर्जीतले समजले जातात. वायकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात आल्यानं  हा मुख्यमंत्र्यांना धक्का असल्याचे मानले जातेय. सध्या वायकर हे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. ते जोगेश्वरी येथील मातोश्री क्लब, शिवछत्रपती संस्थानासह अनेक समाजिक संस्था आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये संचालक म्हणून काम पाहताहेत. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकार आल्यानंतर वायकर यांना कॅबिनेटपदी बढती मिळेल अशी शक्यता होती. मात्र, रवींद्र वायकर यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे वायकर नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना ऑफिस चीफ कोऑर्डिनेटर करून त्यांची नाराजी दूर केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!