Just another WordPress site

Rajyasabha Election : अपक्ष आमदारांनी वाढवले टेन्शन! मोर्चेबांधणीसाठी फडणवीस शनिवारी सोलापुरात, ‘त्या’ दोन आमदारांचं मन वळवणार?

राज्यसभेच्या निवडणुकीची गणिते जुळवण्यात सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत. या निवडणुकीत अपक्षांचे भाव चांगलेच वधारले. राज्यसभेच्या निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी महाराष्ट्रातील अपक्ष आमदारांची एक स्वतंत्र बैठक होणार होती. मात्र, अद्याप ही बैठक झाली नाही आणि अपक्षांचे नक्की काही ठरले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीसह भाजपचे टेन्शन वाढले. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस  मैदानात उतरले असून ते ४ जून रोजी सोलापूरला जाणार आहेत.  या दौऱ्यात ते सोलापुरातील दोन अपक्ष आमदारांना भेटणार असल्याची चर्चा असून ते अपक्ष आमदारांना भाजपकडे वळवतील का? याची उत्सुकता अनेकांना लागलीये.हायलाईट्स 

१. राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदाराचे भाव चांगलेच वधारले

२. अपक्षांचे काही ठरले नसल्याने मविआसह भाजपचे टेन्शन वाढले

३. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस शनिवारी सोलापुरात

४. फडणवीस सोलापुरातील अपक्ष आमदारांना भेटणार असल्याची चर्चा


राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने धनंजय महाडिक यांच्या रुपाने सातवा उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीची चिंता वाढली. शिवसेनेचे संजय पवार आणि महाडिक यांच्यात सहाव्या जागेसाठी चुरस होण्याची चिन्हे आहेत. दोन्ही बाजूंनी अपक्षांना जाळ्यात खेचण्याचे काम सुरू आहे. मात्र बहुतांश अपक्ष आमदारांनी आपले पत्ते खुले केलेले नाहीत. या अपक्ष आमदारांची बैठक झालेली नाही. त्यामुळं या निवडणुकीबाबत अपक्ष आमदार सध्यातरी कोणत्या निर्णयावर पोहोचलेले नाहीत. परिणामी, महाविकास आघाडीतील नेत्यांसह भाजप नेतेही काळजीत पडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने काही अपक्ष आमदारांची बैठक घेतली होती. या आमदारांना निधी कमी पडणार नसल्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, महाविकास आघाडीला राज्यसभेसाठी दिलेल्या चार उमेदवारांसाठी १६८ मतांची तंतोतंत गरज आहे. सध्या महाविकास आघाडीकडे १५३ तर भाजपकडे १३५ मते आहेत. महाविकास आघाडीला चौथ्या उमेदवारासाठी १५ मतांची गरज आहे. या १५ अपक्ष आमदारांच्या निर्णायक मतांवर महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराचा विजय अवलंबून आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दोन अपक्ष आमदरांना महत्त्व आले. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे दोघेही अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं. राज्यसभेसाठी १० जूनला मतदान होणार आहे. तत्पूर्वी, अपक्ष आमदारांशी भाजपसह महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी संपर्क वाढवला. शिवसेनेच्या दोन्ही जागांवरील उमेदवार विजयी होण्यासाठी स्वत: पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अपक्षांशी संपर्क सुरु केल्याची चर्चा आहे. खासदार संजय राऊत हे मागील काही महिन्यांपासून सातत्याने भाजपविरोधात पत्रकार परिषदा घेत आहेत. अशात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील शनिवारी सोलापूरला जाणार आहेत. त्यांचा हा दौरा राज्यसभा निवडणुकीसाठी महत्वाचा ठरणार आहे. या दौऱ्या दरम्यान फडणवीस सोलापुरातील दोन अपक्ष आमदारांना भेटणार असल्याची चर्चा आहे. त्यापैकी एक आमदार भाजप पुरस्कृत आहे. तर दुसरा आमदार हा राष्ट्रवादीच्या जवळचा आहे. त्यामुळे आमदारांचे मन वळवण्यासाठी फडणवीस यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे दोघेही अपक्ष आमदार आहेत. यापैकी राजेंद्र राऊत हे भाजप पुरस्कृत असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केलं. तर करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे राष्ट्रवादीशी जवळीक असलेले आमदार आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीतील अन्य नेत्यांसोबतही त्यांचा चांगला स्नेह असून त्यांचा महाविकास आघाडी सरकारला पाठिंबाही आहे. तरीदेखील, त्यांनी अधिकृतपणे अद्याप राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही. दुसरं म्हणजे, देवेंद्र फडणवीसांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. विधानसभा निवडणकीच्या निकालानंतर अपक्ष आमदार म्हणून संजय शिंदे यांनी सर्वप्रथम फडणवीस यांना पाठिंब्याचे पत्र दिलं होतं. पण, राज्यात सत्तांतर झाले आणि पुढे भाजपला त्या पत्राचा काहीच लाभ झाला नाही. मात्र, राष्ट्रवादीत राहूनही त्यांचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याचे अपूर्ण स्वप्न भाजपमुळेच शक्य झाले होते. त्यांचे आजही फडणवीस यांच्यासोबत जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलं. त्यातच मोठे बंधू आणि राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यावरील ED नोटीसीमुळे आमदार संजय शिंदे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीला फक्त आठ दिवस उरले आहेत. त्यामुळे सहाव्या उमेदवाराच्या विजयासाठी शिवसेनेसह भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही पक्षांचा भर अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचण्यावर आहेत. त्यामुळे फडणवीस यांचा हा दौरा किती फायद्यात पडणार हे लवकरच समजणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!