Just another WordPress site

Priyanka Chaturvedi । राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेल्या प्रियंका चतुर्वेदींची ‘अशी’ आहे राजकीय कारकिर्द

 


दिल्लीत सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी मोठी कारवाई करण्यात आली. संसदेच्या हिवाळी  अधिवेशनात गोंधळ घातल्यानं राज्यसभेच्या १२ खासदारांचं निलंबन  करण्यात आलं. या निलंबन झालेल्या १२ खासदारांमध्ये काँग्रेसचे ६, तृणमूल काँग्रेसचे २ , सीपीआयआणि सीपीएमच्या  प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे. तर  त्यात शिवसेनेचे  दोन म्हणजेच खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि खासदार अनिल देसाई यांचा समोवश आहे. निलंबनाची कारवाई झालेल्या या १२ खासदारांना हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहता येणार नाही.  राज्यसभेतून निलंबित करण्यात आल्यावर प्रियांका चतुर्वेदी यांनी तिखट प्रतिक्रिया देत सरकारवर तोफ डागली. दरम्यान, प्रियंका चतुर्वेदी कोण? याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.

हायलाईट्स

१. राज्यसभेच्या १२ सदस्यांचे निलंबन झाल्याने खळबळ

२. खासदार प्रियंका चतुर्वेदी निलंबन केल्याने नाराज 

३. विरोधी पक्षाने संयुक्त निवेदन जारी करत केला निषेध

४. बाजू न ऐकता कारवाई केल्याचा शिवसेनेचा आरोप


हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत संसदेत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संसदेच्या पावसाळी शेवटच्या दिवशी झालेल्या अभूतपूर्क गोंधळावरुन राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या १२ खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं. राज्यसभेतील निलंबनावर बोलतांना प्रियंका चतुर्वेदी यांनी सरकारवर टीका केली.आपल्या देशात आरोपीलाही बाजू मांडण्याचा हक्क आहे. जिल्हा कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत आरोपीचं म्हणणं ऐकून घेतलं जातं. त्याच्यासाठी वकील उपलब्ध करून दिला जातो. गरज पडल्यास सरकारी अधिकारीही तिथे आपली भूमिका मांडतात. एकीकडे आरोपीला असे अधिकार असताना आम्हाला मात्र ती संधीही दिली गेली नाही. आमची बाजू न ऐकताच कारवाई करण्यात आली, अशा शब्दात चतुर्वेदी यांनी निशाणा साधला. राज्यसभेतील ज्या घटनेवरून ही कारवाई करण्यात आली त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे. ते फुटेज पाहिल्यास पुरुष मार्शल महिला खासदारांना मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसतंय, असं असतानाही कारवाई आमच्यावर करण्यात आली. ही कारवाईच असंसदीय आहे, असा आरोपही चतुर्वेदी यांनी केला.


प्रियंका चतुर्वेदी यांचा जन्म १९ नोव्हेंबर, १९७९ रोजी झाला. त्या मूळच्या उत्तर प्रदेश राज्यातील आहेत.  प्रियंका यांनी २०१० साली काँग्रेसमध्ये प्रवेश करुन राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. सध्या प्रियंका चतुर्वेदी ह्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सदस्या आणि शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी त्या कॉग्रेंसच्या सदस्या आणि राष्ट्रीय प्रवक्त्या होत्या. ९  एप्रिल, २०१९ मध्ये प्रियंका यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत  हातात शिवबंधन बांधलं. २०१० साली त्यांनी मुंबईमध्ये युवक काँग्रेसमध्ये प्रवेश करुन राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. कॉंग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी चतुर्वेदीशी गैरवर्तणूक केल्याचं त्यांचं म्हणणं होतं. परंतू या गंभीर प्रकरणाची पक्षाने दखल घेतली नसल्याचा आरोप करत त्यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर लोकसभा निवडणूकीत मला तिकीट मिळेल, अशी आशा होती. मात्र, तिकीट न दिल्यानं मी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली, असं म्हणणं योग्य ठरणार नाही. शिवाय सर्वसमावेशक मुक्त, पुरोगामी अशा कॉंग्रेसच्या आदर्शावर माझा विश्वास होता, असं त्या म्हणाल्या होत्या. शिवसेनेतील प्रवेशानंतर त्यांनी अतिशय आक्रमकपणे शिवसेनेची बाजू मांडली होती. शिवसेनेत प्रवेश करतांचा त्यांची उपनेते पदी निवड करण्यात आली होती. राज्यसभेतील महाराष्ट्राच्या कोट्यातील मार्च २०२० मध्ये रिक्त झालेल्या ७ जागांपैकी एका जागेसाठी त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर जुलै २०२० मध्ये त्या महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सदस्या म्हणून निवडून गेल्या होत्या. मेट्रोसाठी आरेमध्ये वृक्षतोड होत असतांना वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी त्या रस्त्यावर देखील उतरल्या होत्या. राजकारणा व्यतिरिक्त प्रियंका चतुर्वेदी या एक लेखिका देखील आहेत. तेहेल्का मासिक, डीएनए वृत्तपत्र आणि फर्स्टस्पॉटमध्ये त्यांनी स्तंभलेखक म्हणून अनेक लेखांचे लेखन केले.  महिला सबलीकरण, बाल शिक्षण तसेच आरोग्या यांसारख्या विषयांवर त्या काम करत आहेत. पुस्तकांचे समीक्षण करणारा प्रियंकांचा ब्लॉग देशातील टॉप टेन ब्लॉग्जपैकी एक समजला जातो.  याआधी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अमृता फडणवीस यांच्या सोबत रंगलेल्या ट्विटर युध्दामुळे प्रियंका चतुर्वेदी चर्चेत आल्या होत्या. आता निलंबणाची कारवाई करण्यात आल्यानं प्रियंका चतुर्वेदी पुन्हा चर्चेत आल्यात. दरम्यान, सरकार निलंबित खासदारांचं निलंबण मागे घेतेय, का हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!