Just another WordPress site

Parvovirus । कुत्र्यांना ग्रासणाऱ्या पार्व्होव्हायरसच्या संसर्गात वाढ; पार्व्होव्हायरस म्हणजे काय आणि हा व्हायरस कुत्र्यांमध्ये कसा पसरतो?

विदर्भातील अमरावती शहरातील जवळपास दोन हजार पाळीव आणि भटक्या कुत्र्यांना गेल्या महिन्यात कॅनाइन पार्व्होव्हायरस विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर शहरातील पशुवैद्यकांनी पाळीव प्राण्यांच्या मालकांना गंभीर उद्रेकापासून सावध राहण्याचे आवाहन केले. दरम्यान,  पार्व्होव्हायरस म्हणजे काय? पार्व्होव्हायरस  व्हायरस कुत्र्यांमध्ये कसा पसरतो? याच विषयी जाणून घेऊया. 


अमरावती पार्व्होव्हायरसच्या घटनांमध्ये वाढ होत असताना मृतांच्या संख्येबाबत कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र, प्राणी बचाव संस्थेच्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात १७ भटक्या कुत्र्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


Parvovirus म्हणजे काय?

पार्व्होव्हायरस हा एक गंभीर व्हायरसचा संसर्ग आहे. जो कुत्र्याच्या पिल्लांमध्ये आणि कुत्र्यांमध्ये देखील जीवघेणा ठरू शकतो. पार्व्होव्हायरस कुत्र्याच्या आतड्यांसंबंधी मार्गावर परिणाम करतो. या व्हायरसमुळे मृत्यूचे प्रमाण ९० टक्के आहे. अमेरिकन पशुवैद्यकीय वैद्यकीय असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, पार्व्होव्हायरसची लक्षणे असलेले कुत्री त्वरित उपचार न करता ७२ तासांच्या आत संक्रमणाने मरू शकतात. अतिसार, उलट्या, वजन कमी होणे, निर्जलीकरण आणि सुस्ती ही  या जीनघेण्या व्हायरची काही लक्षणे आहेत.


पार्व्होव्हायरस व्हायरस कुत्र्यांमध्ये कसा पसरतो? 

पार्व्होव्हायरस संसर्गजन्य विषाणू संक्रमित कुत्र्याच्या थेट संपर्काने किंवा संक्रमित कुत्र्यांना हाताळणाऱ्या लोकांच्या हात आणि कपड्यांसह दूषित वस्तूच्या अप्रत्यक्ष संपर्काने पसरत. कुत्रे प्रत्येक वेळी वास घेतात, चाटतात किंवा संक्रमित विष्ठा खातात तेव्हा त्यांना पार्व्होव्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. एकदा विषाणूचे सेवन झाल्यानंतर ते कुत्र्याच्या घशातील पेशींवर आक्रमण करण्यास सुरवात करते. तिथून, विषाणू रक्तप्रवाहात प्रवेश करतो आणि कुत्र्याच्या अस्थिमज्जा, लिम्फ नोड्स आणि आतड्यांमधील पेशींवर आक्रमण करण्यास सुरवात करतो. यामुळे एसआयआरएस किंवा सिस्टिमिक प्रक्षोभक प्रतिक्रिया सिंड्रोम नावाची गंभीर स्थिती उद्भवू शकते. एसआयआरएसमुळे रक्त गुठळ्या तयार होतात. श्वास घेण्यात अडचण  होते आणि रक्ताच्या संसर्गाची तीव्र निर्मिती होते.


माणसाला लागण होते का? 

पार्व्होव्हायरस संसर्गजन्य विषाणू असला तरी माणसाला या व्हायरसची लागण होत नाही. तसंच मांजरींना कुत्र्यांकडून या व्हायरची लागण होत नाही. मात्र, एका कुत्र्यापासून दुसऱ्या कुत्र्याला याची लागण होते.


पार्व्होव्हायरस उपचार कसा केला जातो?

पार्व्होव्हायरस ग्रस्त कुत्र्यांना आठवड्यातून रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे.  मळमळविरोधी औषधे आणि रक्ताच्या संसर्गास कारणीभूत असणार्‍या बॅक्टेरियांना दूर करण्यासाठी ब्रॉड-स्पेक्ट्रम अँटीबायोटिकची इंजेक्शन्स दिली जातात. 

कुत्र्यांना संसर्गापासून कसे सुरक्षित ठेवायचे?

पार्व्होव्हायरसवर कोणताही इलाज नाही. मात्र,  कुत्र्याला लसीकरण केल्याने त्यांना संसर्गापासून लढण्याची संधी मिळते. सध्या सेव्हन इन वन, फाईव्ह इन वन या लसी उपलब्ध आहेत. लसीचा  पहिला डोस जन्माच्या ४५ दिवसांनी आणि दुसरा डोस पहिल्या डोसनंतर २१ दिवसांनी दिला जातो. कुत्र्यांचे योग्य रीतीने संरक्षण करण्यासाठी, पिल्ले असताना त्यांना लसीकरण करणे आवश्यक आहे. आणि नंतर ते दरवर्षी करत राहणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!