Just another WordPress site

Osho DeathAnniversary | संभोगाला समाधीचा मार्ग म्हणवणाऱ्या आचार्य ओशो यांचा गूढ जीवनप्रवास कसा होता?

ऐंशीच्या दशकात जगभरात अक्षरश: धुमाकूळ घातलेलं नाव म्हणजे, आचार्य रजनिश अर्थात ओशो. अत्यंत साध्या सोप्या जगण्याचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या आचार्य रजनीश ओशोंकडे एक मसिहा म्हणून पाहिले जातं. ‘संभोग से समाधी की ओर’ नावानं भाषणं देत जीवनशैलीविषयी खूप वेगळ्या कल्पना मांडणाऱ्या ओशोंचा आज स्मृतिदिन. ओशोंचं व्यक्तीमत्व बहुआयामी होतं. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत आणि वादग्रस्त राहिले. काय आहे या वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख? त्याचं गुढ आयुष्य नेमकं कसं होतं? याविषयी अनेकांना आकर्षण आहे.


हायलाईट्स

१. ओशो हे आध्यात्मिक गुरू आणि महान दार्शनिक होते

२. आचार्य रजनीश यांचे खरं नाव चंद्रमोहन होतं 

३. ओशोंनी काही काळ प्राध्यापकाची नोकरीही केली

४. ओशो जन्मल्यानंतर तीन दिवस ना रडले, ना दूध प्यायले


ओशोंकडे आध्यात्मिक गुरू आणि महान दार्शनिक म्हणून पाहिले जाते. भारतातील सर्वात वादग्रस्त गुरूंमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. आपल्या विलक्षण चातुर्य बुद्धीने ते लोकांना आपल्याकडे आकर्षित करत. रजनीश यांचा जन्म ११ डिसेंबर १९३१ ला मध्य प्रदेशातील कुचवाडामध्ये झाला.  त्यांचं नाव चंद्रमोहन जैन असं होतं. ओशोंच्या जन्मावेळी एक विचित्र घटना घडली होती. जन्मल्यानंतर तीन दिवस ओशो रडले नव्हते. तीन दिवस ते आईचं दूधही प्यायले नव्हते. त्याचवेळी ओशो हे जगावेगळे असल्याचा अंदाज त्यांच्या कुटुंबीयांना आला होता. लहान असल्यापासूनच त्यांना गूढ आणि तत्त्वज्ञान या विषयांमध्ये ओढ वाटू लागली होती, असं रजनीश यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलंय. ओशो अत्यंत जिज्ञासू होते. १२ वर्षाचे असताना त्यांना मृत्यूचं कुतुहूल वाटलं होतं. त्यामुळे मृत्यूनंतर काय होतं? हे जाणून घेण्यासाठी ते सतत स्मशानभूमीत जायचे. तिथे गेल्यावर तुम्ही कुठे गेला आहात? असं ते आत्म्यांना विचारायचे.  पुढे ओशो  एकवीस वर्षांचे झाल्यावर कुटुंबियांनी त्यांच्या मागे लग्नाचा तगादा लावला. मात्र तोवर चंद्रमोहन यांचा संन्यासी जीवन जगण्याचा निर्णय पक्का झालेला होता. ओशोंनी मध्यप्रदेशातील जबलपूर महाविद्यालयातून दर्शनशास्त्राचं शिक्षण घेतलं. त्यांना पुस्तकं वाचण्याचं प्रचंड वेड होतं. दिवसाला तीन पुस्तके ते वाचायचे. त्यांनी संपूर्ण आयुष्यात एक लाखाहून अधिक पुस्तके वाचली होती. त्यांना जर्मनी, मार्क्स आणि भारतीय दर्शनशास्त्रावरील पुस्तके वाचणं अधिक आवडायचं. विशेष म्हणजे जबलपूरच्या महाकौशल कॉलेजात असताना त्यांनी त्यांच्या पदव्या जाळल्या होत्या. पदव्यांवरून ज्ञान ठरत नसतं, असं त्यांचं मत होतं.   पुढे काही वर्ष त्यांनी जबलपूर विद्यापीठात दर्शनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून अध्यापनाचं काम केलं. दरम्यानच्या काळात त्यांनी विविध धर्मांवर आणि विचारप्रणालींवर प्रवचन देण्यासही सुरुवात केली. देशभरात त्यांचे अनुयायी वाढू लागले. त्यामुळं १९६६ मध्ये त्यांनी प्राध्यापकीचा राजीनामा दिला आणि संन्यास घेतला. संन्यास घेतल्यानंतर त्यांनी धर्मगुरू म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी गावोगावी, देशोदेशी जाऊन प्रवचने दिली. भारत भ्रमण केल्यानंतर १९७० मध्ये ते मुंबईत आले. मुंबईत देशी-विदेशी भक्तांना त्यांनी प्रवचन देण्यास सुरुवात केली. त्यानंतर १९७४ मध्ये त्यांनी  पुण्यातील कोरोगाव पार्क परिसरात  ‘श्री रजनीश आश्रमा’ची स्थापना केली.  कालांतराने या आश्रमाविषयी वाद झाल्यानंतर त्यांनी ८० च्या दशकात अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये येथे त्यांनी एका आश्रमाची स्थापना केली होती. हा आश्रम ६५ हजार एकर इतक्या विस्तीर्ण आवारात पसरला होता.  या आश्रमात प्रत्येक अनुयायी महिन्याला ९० लोकांबरोबर सेक्स करत असे असं म्हटलं जायचं. मात्र, त्यासंबंधी कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नाही.  १९८५ साली त्यांनी अमेरिकेतला त्यांचा आश्रम नोंदणीकृत करण्याचा प्रयत्न केला.  मात्र त्याला खूप विरोध झाला. अमेरिकेत ओशोंची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. त्यांचा अनुयायी वर्ग तरुण युवक होता.  त्यामुळे अमेरिकन सरकार घाबरले होते. त्यांनी ओशोंच्या आश्रमावर कारवाईस सुरुवात केली. संन्यासींना व्हिसा नाकारला जाऊ लागला.  त्यानंतर ओशोंवर काही आरोप ठेवून त्यांना अटक करण्यात आली. १२ दिवस त्यांना अज्ञातवासात ठेवलं गेलं. त्यानंतर १४ नोव्हेंबर १९८५ रोजी ओशोंनी अमेरिका सोडली. त्यांनी जगातील २१ देशांमध्ये जाऊन राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येक देशांनी त्यांना प्रवेश नाकारला. त्यामुळे अखेर ते भारतात परतले. १९८७ मध्ये पुण्यातील आश्रमात येऊन त्यांनी वास्तव्य केलं. याच ठिकाणी त्यांनी प्रवचनं देण्यास सुरुवात केली. त्यांनी धर्म, राजकारण, मानवता, शिक्षण, समाज, कुटुंब व्यवस्था, स्त्रियांचं शोषण, मार्क्स, गांधी, आंबेडकर, तत्त्वज्ञान, दर्शनशास्त्रापासून ते संभोगावरही प्रवचने दिली होती. त्यांच्या प्रवचनं तर्कशुद्ध असायची. त्यांचा युक्तिवाद भलेभले खोडून काढण्यात असमर्थ ठरायचे. जगभरातील तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला होता. त्यामुळे सर्वच धर्मसत्ता हादरून गेल्या होत्या. ओशोंनी संभोगावर प्रवचन दिलं. संभोगातून समाधीकडे हे त्यांचं पुस्तक सर्वाधिक वादग्रस्त ठरलं. त्यानंतर त्यांना ‘सेक्स गुरू’ म्हणूनही संबोधलं जाऊ लागलं. मात्र,  त्यांना ही ओळख कधीच मान्य नव्हती. ओशोंनी नेहमीच मुक्त सेक्सचं समर्थन केलं. त्यांच्या या मोकळ्या विचारांमुळे अनेकदा समाजाचा मोठा विरोध सहन करावा लागला.  भारतीय अध्यात्मिक गुरूंनी त्यांची भोगवादी म्हणून कायमच हेटाळणी केली. त्यांची हेटाळणी झाली तरीही दुसर्‍या बाजूला जगभरातील प्रचंड पैसा बाळगून असलेली श्रीमंत मंडळी झपाट्यानं त्यांचे भक्त बनत गेली. ओशोंची प्रवचनं ज्यांनी ऐकली आहेत त्यांना त्या आवाजातली ताकद नक्कीच माहित असेल. त्याची जादू आजही इतक्या वर्षांनंतर त्यांच्या मृत्युनंतरही कायम आहे. पुण्यातल्या आश्रमात ओशो यांचं १९ जानेवारी १९९० ला निधन झालं. त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याची नोंद असली, तरी त्यावर एकमत नाही. १९८५ मध्ये त्यांना अमेरिकेच्या तुरुंगात ठेवलं होतं. त्यावेळी त्यांना थेलियम नावाचं स्लो पॉयझन दिलं गेलं होतं. त्यांना प्राणघातक रेडिएशनमधूनही जावं लागलं होतं, तेच त्यांच्या मृत्यूचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या मृत्यूची वेगवेगळी कारणं सांगितली जातात.  ओशोंच्या मृत्यूच्या ३० वर्षांनंतरही त्यांच्या अचानक जाण्याचं कुठलंही ठोस कारण समोर आलेलं नाही. त्यांच्यावर विषप्रयोग झाला, अशीही वदंता आहे. मात्र,  कुठलंही कारण अद्याप सिद्ध होऊ शकलेलं नाही.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!