Just another WordPress site

One Nation-One Health Card । वन नेशन-वन हेल्थ कार्ड कसं बनवाल? काय कागदपत्रे लागतील आणि काय होईल फायदा?

बऱ्याचदा एखाद्या दीर्घकालीन आजारावर वैद्यकीय उपचार घेत असतांना प्रत्येकवेळी उपचारांसाठी डॉक्टरांकडे जायची वेळ येते तेव्हा आपल्याला सगळे रिपोर्ट्स, प्रिस्क्रिप्शन्स याची भली मोठी फाईल जवळ बाळगावी लागते. कारण या फाईलमध्ये आधीच्या उपचारांविषयीची सर्व माहिती असते. आपली फाईल पाहून डॉक्टर आगामी उपचार पध्दती ठरवत असतात. मात्र,  आता प्रत्येकवेळी डॉक्टरकडे जातांना आपल्याला अशी फाईल जवळ बाळगण्याची गरज नसणार आहे. केद्र सरकार वन नेशन – वन हेल्थ कार्ड धोरण सुरू करत. काय आहे ही वन नेशन – वन हेल्थ कार्ड योजना? हे हेल्थ कार्ड कसं मिळवायचं? याचे फायदे काय? याच विषयी आज जाणून घेऊ.केंद्र सरकारच्या ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’, ‘वन नेशन-वन टॅक्स’ या योजनांची नावं तुम्ही ऐकली असतील. देशात ज्या प्रमाणं वन नेशन – वन रेशन कार्ड, वन नेशन -वन टॅक्स असे उपक्रम राबवले जात आहेत, त्याच धर्तीवर आता वन नेशन – वन हेल्थ कार्ड  ही संकल्पना राबवली जाणार आहे. याच योजनेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑग्सट २०२० रोजी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा केली होती. सध्या ही योजना देशातील अंदमान-निकोबार, चंदीगढ, दादरा व नगर हवेली, दमण-दीव, लडाख आणि लक्षद्वीप या ठिकाणी पायलट प्रोजेक्ट स्वरूपात राबवली जात आहेत.


काय आहे नॅशनल हेल्थ मिशन?

नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री अंतर्गत सर्व हॉस्पिटल आणि क्लिनिकल लॅब एकमेकांशी जोडल्या जाणार आहेत. या मिशनच्या माध्यमातून नागरिकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना एक युनिक आयडी देण्यात येणार आहे. यामुळं सर्व नागरिकांच्या आरोग्यविषयीचा एक डाटाबेस तयार होणार आहे. सरकारकडून या मिशनच्या माध्यमातून देशातील नागरिकांकडे यूनिक हेल्थ कार्ड दिलं जाणार आहे. या कार्डमध्ये संबंधित व्यक्तीच्या आरोग्याबद्दलची सगळी माहिती असणार आहे.


कशाप्रकारे सुरू कराल हेल्थ आयडी?

हेल्थ कार्ड काढण्यासाठी तुमच्याकडं आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक असणं आवश्यक आहे. 

–  हेल्थ कार्ड काढण्यासाठी सर्वात आधी 

https://healthid.ndhm.gov.in/register या संकेतस्थळावर जा.

– आधारच्या मदतीने ओळखपत्र काढण्यासाठी ‘जनरेट व्हाया आधार’ यावर क्लिक करा.

– तुम्हाला मोबाईल क्रमांकावरून हेल्थ कार्ड काढायचं असेल तर  जनरेट व्हाया मोबाईल यावर क्लिक करा.

–  आधार वा मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो टाका.

–  त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल. त्यात विचारण्यात आलेली सर्व माहिती भरा.  

– ही माहिती भरल्यानंतर सबमिट करा, त्यानंतर तुमचं ओळखपत्र तयार होईल. 


या कार्डमुळे काय फायदा होणार?

हेल्थ कार्ड मुळे प्रत्येकवेळी आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांकडं जाताना तुम्हाला वैद्यकीय तपशील असेलल्या कागदपत्रांची फाइल सोबत घेऊन जावं लागतं, हे आता बंद होणार आहे.  या फायलीचं डिजिटल स्वरूपात रूपांतर होणार आहे. म्हणजेच आधार कार्डप्रमाणे हेल्थ कार्ड तयार होणार आहे. या हेल्थ कार्डसाठी १४ अंकी युनिक आयडी असेल. त्यात तुमचं आरोग्य आणि आजार याची तुमची सगळी हेल्थ हिस्ट्री त्यात जमा होत राहणार. ही सर्व माहिती सेंट्रल सर्व्हरला जोडली जाईल. हे कार्ड सेंट्रल सर्व्हरशी जोडलं असल्यानं देशभरातील कोणत्याही दवाखान्यात किंवा आरोग्य केंद्रात तुम्ही उपचार घेण्यासाठी गेलात तर हे कार्ड दाखवल्यास डॉक्टरांना तुमच्या आरोग्याविषयीचा सर्व तपशील एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. जेव्हा केव्हा तुम्ही रुग्णालयात जाल, तेव्हा फक्त हे कार्ड घेऊन जावं लागणार. या कार्डमुळे डॉक्टरांना तुमच्याबद्दलची पूर्वीच्या आजारांविषयीची, तुम्ही घेतलेल्या उपचारांविषयीची माहिती मिळण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे नव्याने आजाराचं निदान करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या चाचण्या करण्याची गरज पडणार नाही. तसेच त्यातून पैसेही वाचतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!