Just another WordPress site

Omicron Virus । जीवघेणा ओमिक्रॉन हा व्हेरियंट खरचं एवढा घातक आहे? काय आहेत लक्षणे?

   गेल्या एक ते दिड वर्षापासून संपूर्ण जग कोरोना महामारीशी दोन हात करते. चीनपासून सुरु झालेलं कोरोनाचं संकट अजूनही संपताना दिसत नाही. आता या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विळखा सैल होत असतांना ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येताहेत. ओमिक्रॉन  व्हेरियंट  हे तिसऱ्या लाटेची नांदी ठरु शकतील. त्यामुळेच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे सामान्यांसह आरोग्य प्रशासनाच्याही चिंतेत भर पडली. भारतासाठीच नव्हे तर जगासाठी  हा नवा व्हेरियंट अधिक चिंताजनक आहे. या व्हेरियंटची लक्षणे काय? काय काळजी घ्यावी? याच विषयी आज जाणून घेणार आहोत.गेल्या वर्षभरात जगभरात मृत्यूचं तांडव माजवल्यानंतर आता कोरोनाचाच नवा विषाणू उदयाला आला. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबद्दल जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ओमिक्रॉनचे आतापर्यंत 13 देशात रुग्ण आढळलेले आहेत.  भारतासह अनेक देशांनी खबरदारीच्या दृष्टीने पावलं उचलण्यासही सुरुवात केलीय. जागतिक आरोग्य संघटनेनं तर या नव्या व्हेरियंटला ‘Variant of Concern’ म्हणजेच ‘काळजी करण्याजोगा व्हेरियंट’ म्हटलंय. तर शास्त्रज्ञांनी आतापर्यंतचा कोरोना विषाणूचा हा सर्वांत वाईट प्रकार असल्याचं सांगितलंय. ओमिक्रॉनचे हा नवा विषाणू डेल्टापेक्षा जास्त घातक असल्याचा अंदाज जाणकार वर्तवतायत. 


पहिल्यांदा ओमिक्रॉनचा रूग्ण कुठे आढळला?

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण आढळला. 9 नोव्हेंबर 2021 रोजी या रूग्णाचे नमुने घेण्यात आले होते. या रूग्णाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं 24 नोव्हेंबर 2021 रोजी सिद्ध झालं. याशिवाय, दक्षिण आफ्रिकेच्या गौतेंग प्रांतामध्ये या नव्या विषाणूची लागण झाल्याची 77 प्रकरणं समोर आली. त्याशिवाय बोस्तवानामध्ये चार आणि हाँगकाँगमध्ये एक रुग्ण आढळला.


ओमिक्रॉनबद्दल WHO नं काय म्हटलंय?

कोरोनाच्या या नव्या विषाणूमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याचं आढळलं आहे. WHO च्या म्हणण्यानुसार, यातील काही म्युटेशन्स ‘चिंताजनक’ आहेत. लागण होण्याची भीती सुद्धा या व्हेरियंटमध्ये जास्त असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत असल्याचं WHO नं म्हटलंय.


ओमिक्रॉन धोकादायक आहे का?

जीवशास्त्रीय नियमानुसार प्रत्येक विषाणूचे उत्परिवर्तन अधिक धोकादायक असते. कारण उत्परिवर्तित विषाणू चिवटपणे अस्तित्व टिकवण्याचे जोरदार प्रयत्न करतो. ओमिक्रॉन आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरला, तर त्याचा संसर्ग अधिक झपाट्याने वाढून गंभीर आजारपणाची लक्षणे वाढीस लागतील. दरम्यान, टास्क फोर्सने  सांगितले की, कोविडच्या या नव्या विषाणूने दक्षिण आफ्रिकेतील यापूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंट प्रकाराची जागा घेतली असून त्याचा संसर्ग कितीतरी अधिक आहे. डेल्टाची जागा ओमिक्रॉनने अवघ्या दोन आठवड्यात घेतली यावरून त्याची घातकता लक्षात येते. दुसऱ्या लाटीस कारणीभूत असलेल्या डेल्टाचे दोन म्युटेशन होते. बेटा प्रकाराचे तीन म्युटेशन होते मात्र, ओमिक्रॉन या प्रकाराचे पन्नासहून अधिक म्युटेशन आहेत.


ओमिक्रॉनची प्रमुख लक्षणे कोणती?

दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार ओमिक्रॉन सापडल्यानंतर जगभरात खळबळ उडाली. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील एका डॉक्टरने नवीन कोविड प्रकार ओमिक्रॉनची लक्षणे काय आहेत हे उघड केले आहे. डॉक्टरांच्या मते, ओमिक्रॉनची काही लक्षणे आहेत जी पूर्णपणे वेगळी आहेत. दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशन च्या प्रमुख अँजेलिक कोएत्झी यांनी सांगितले की, गेल्या 10 दिवसांत त्यांनी 30 रुग्णांना कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार, ओमिक्रॉनने संक्रमित पाहिलेय.

१. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णाला अत्यंत थकवा, घसा खवखवणे  ही लक्षणे आढळतात.

२. याशिवाय,  स्नायू दुखणे आणि कोरडा खोकला यासारख्या समस्या असतात. 

३. शरीराचे तापमान वाढते. त्याची लक्षणे कोरोनाच्या डेल्टा प्रकारापेक्षा खूपच वेगळी आहेत. 


काय काळजी घ्यावी?

१. नेहमी योग्य पध्दतीने मास्क वापरा.

२. जेथे जेथे शक्य असेल तिथे सहा फुटांचं सोशल डिस्टंन्स पाळावं.

३. साबणाने किंवा सॅनिटायझरने हात वारंवार स्वच्छ करा.

४. साबणाने हात न धुता डोळ्यांना, नाकाला स्पर्श करु नका.

५. खोकतांना किंवा शिकतांना टिश्यू पेपरचा वापर करून तोंड आणि झाकावे.

हा व्हेरिएंट सध्याच्या औषधांना, लसीला दाद देतो किंवा नाही ते डॉक्टर्स आणि तज्ञ जाणून घेत आहेत. मात्र,  घाबरून न जाता आपण काळजी घेण्याची गरज आहे. या कोरोनाच्या नव्या अवतारावर कोरोना लस प्रभावी ठरेल की नाही, हे आत्ताच सांगता येत नाही. त्यामुळं आपणच आपली काळजी घेणं आणि कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!