Just another WordPress site

Muknayak : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक पाक्षिक का सुरू केलं?

शंभरेक वर्षापूर्वी एखादे वृत्तपत्र, मासिक, नियतकालिक, अनियतकालिक किंवा एखादं पाक्षिक काढणं सुध्दा अत्यंत अवघड बाब होती. अशावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक पाक्षिक काढले. बाबासाहेबांनी १०२ वर्षापूर्वी सुरु केलेलं मूकनायक पाक्षिक मराठी पत्रकारितेतील ऐतिहासिक परंपरेची स्थापना करणारं ठरलं. मुकनायक हे पाक्षिक सुरू करण्यामागे बाबासाहेबांची नेमकी काय भूमिका होती? सुरूवातीच्या काळात पाक्षिकाला कुणी मदत केली? याच विषयी जाणून घेऊया. 


हायलाईट्स 

१. ‘मूकनायक’ हा बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा आद्यबिंदू 

२. ‘मूकनायक’चा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० ला प्रकाशित 

३. मूकनायकसाठी शाहू महाराजांनी दिली होती आर्थिक मदत 

४. ८ एप्रिल  १९२३ साली मूकनायक नियतकालिक बंद पडलं 


‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘समता’, ‘जनता’, ‘प्रबुद्ध भारत’ अशी पाच वृत्तपत्रे बाबासाहेबांनी सुरू केलीत. ‘मूकनायक’ हा बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा अधिकृत आद्यबिंदू होता. ‘मूकनायक’ या पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी प्रसिद्ध झाला. म्हणजेच ‘मूकनायक’ या वृत्तपत्रास यावर्षी १०२ वर्षे पूर्ण झाली आहेत. मुकनायकचा रजि नं.बी-१४३० असा होता. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ सुरू केलं तेव्हा अस्पृश्य समाजात साक्षरतेचा दर फार कमी होता. तरीसुद्धा ‘मूकनायक’ सुरू करण्याचं धाडस बाबासाहेबांनी दाखवलं. मूकनायक सुरु होण्याच्या काळात मराठीमध्ये त्यावेळी केसरी, काळ, सुबोध पत्रिका, ज्ञानोदय ही वृत्तपत्र होती. ब्राह्मणेतर चळवळीची विजयी मराठा, दीनमित्र, जागरुक ही वृत्तपत्रं सुरु होती. ब्राह्मणेतर चळवळीच्या वृत्तपत्रांतून अस्पृश्य समाजाचे प्रश्न मांडले जात होते. मात्र, जेवढ्या तीव्रतेनं प्रश्न मांडयला पाहिजे होते ते मांडले जात नव्हते. त्यामुळे आपल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी वृत्तपत्राची गरज असल्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांना दलित, शोषित, पीडितांच्या व्यथा-वेदनांना वाचा फोडायची होती. भणंग आयुष्याला नवी कलाटणी द्यायची होती. त्यामुळे त्यांनी मूकनायक काढण्यास सुरूवात केली. ‘मूकनायक’चा उद्देश स्पष्ट करण्यासाठी त्यांनी तुकारामांचा एक अभंग अंकाच्या शीर्षस्थानी वापरला होता, 

काय करूं आतां धरूनिया भीड

निःशंक हें तोंड वाजविले ।।

नव्हे जगीं कोणी मुकीयांचा जाण

सार्थक लाजून नव्हे हित ।।

मूकनायक’मध्ये वापरल्या जाणारा तोच हा तुकारामांचा अभंग.

भारतातील अस्पृश्यांच्या अधिकारांचा कैवार घेण्यासाठी आंबेडकरांनी या नियतकालिकाचा वापर केला. ‘मूकनायक’च्या पहिल्या १२ अंकांचं संपादन त्यांनी स्वतः केलं. या अग्रलेखाची शिर्षके ‘स्वराज्याची सर सुराज्याला नाही’, ‘हे स्वराज्य नव्हे तर आमच्यावर राज्य’, ‘स्वराज्यातील आमचे आरोहण’ अशी आहेत. मुळात ही शिर्षकच बाबासाहेबांची विचार भूमिका स्पष्ट करणारी आहेत.  तत्कालीन व्यवस्थेला तडाखे देण्याचे काम त्यांनी नेटाने केले. अग्रलेखांमधून कुणाचाही मुलाहिजा न ठेवण्याचे त्यांचे व्रत होते.  मुकनायकच्या आरंभीच्या वर्षांमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी या नियतकालिकाला पाठिंबा दिला होता.  राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील संबंध किती दृढ होते, हे मूकनायक वृत्तपत्राला राजर्शी शाहू महाराजांनी केलेल्या अडीच हजार रुपयांच्या मदतीवरुन दिसून येते. कोल्हापूरमधील दत्तोबा पवार हे बाबासाहेब आंबेडकर यांचे स्नेही होते. १९१९ मध्ये राजर्षी शाहू महाराज मुंबईला आले त्यावेळी डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यासंह अस्पृश्य समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी आणि चळवळ गतिमान करण्यासाठी स्वतंत्र वृत्तपत्राची गरज असल्याचं सांगितलं होतं. बाबासाहेबांनी मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी अडीच हजार रुपये चेकद्वारे दिले. यानंतर मुकनायकचा पहिला अंक प्रकाशित झाला होता. मूकनायकाच्या उजव्या बाजून वार्षिक दर अडीच रूपये तर डाव्या बाजूस जाहिरातीचे दर पहिल्या ओळीस ५ आणे आणि दुसऱ्या ओळीस ४ आणे, कायमचे अडीच आणे अशा प्रकारचे दर होते. कालांतराने, उच्चशिक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकर परदेशात गेले.  सुरुवातीला संपादक म्हणून काम भटकर हे पाहत होते. तर, व्यवस्थापक म्हणून काम ज्ञानदेव घोलप हे पाहत होते.  भटकरांकडून अंकाचं काम वेळेत होत नसल्यानं त्यांची जबाबदारी ज्ञानदेव घोलप यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, बाबासाहेबांची देशातील अनुपस्थिती, जाहिरातींचा अभाव आणि वर्गणीच्या रूपातही फारसा आधार न मिळणं, या कारणांमुळे ८ एप्रिल १९२३ साली हे नियतकालिक बंद पडलं. ‘मूकनायक’चा शेवटचा १९वा अंक २३ ऑक्टोबर १९२० रोजी प्रसिद्ध झाला.  मूकनायक अल्पकाळ जगले असले तरी  ‘मूकनायक’मधून बाबासाहेबांनी समाजाला घातलेली साद अन् हाक अजूनही समाजमनाच्या कानावर कायम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!