Just another WordPress site

Mohit Kamboj : राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार, मोहित कंबोज यांचे ट्विट; पाहा देशमुख- मलिकानंतर नेक्स्ट कोण?

राज्यात एकीकडे सत्तासंघर्षावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना, दुसरीकडे भाजप नेते मोहित कंबोज यांनी  खळबळजनक ट्विट केले. त्यांनी केलेल्या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता लवकर नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना भेटणार, असं ट्विट त्यांनी केलं.  त्यामुळं देशमुख आणि मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला. 



महत्वाच्या बाबी 

१. राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार?

२. भाजपचे मोहित कंबोज यांनी केले खळबळजनक ट्विट 

३. राष्ट्रवादी काँग्रेसचा आता हा तिसरा नेता कोण असणार? 

४. कंबोज यांच्या ट्विटने NCP च्या गोटात पसरली अस्वस्थता 

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात शिंदे-फडणवीस यांचं नवं सरकार आले. यानंतर ठाकरे सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली. तसेच अनेक निर्णयांची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जातंय. १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ  घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत अटक केली. किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर मोठे गंभीर आरोप करत घोटाळ्यांच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. सध्या अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू असून, पुढचा नंबर अनिल परबांचा असल्याचे सांगितले जातंय.. मात्र, अशातच आता मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या  एका बड्या नेत्याबाबत सूचक ट्विट केलं. त्यांनी लवकरच राष्ट्रवादीच्या या नेत्याच्या एका जुन्या घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यांच्या ट्विटने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खूप मोठी खळबळ उडाली. कारण  कंबोज यांनी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक खूप बडा नेता जेलमध्ये जाणार आहे, असं  ट्विटमध्ये सांगितलं. महत्वाचे म्हणजे, यापूर्वी ज्यांच्या अटकेची भविष्यवाणी  कंबोज यांनी केली होती, ते आज अटकेत आहेत. यामुळे  राष्ट्रवादी काँग्रेसचा हा तिसरा नेता कोण असणार? असा प्रश्नही अनेकांना पडला.   कंबोज आणि  सोमय्या यांच्या ट्विटचा आजपर्यंत इतिहास आहे. त्यांनी केलेल्या आरोपांनंतर राज्यातील अनेक  नेत्यांवर ईडी आणि सीबीआयची कारवाई झाली. त्यामुळे कंबोज यांच्या राष्ट्रवादीतील अनेकांचे धाबे दणाणले. एवढेच नाही, तर कंबोज यांनी आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊन संबंधित बड्या नेत्याचा खुलासा करणार आहोत, असंही म्हटलं. याशिवाय, आपण संबंधित नेत्याची देशातील आणि परदेशातील मालमत्ता, बेनामी कंपन्या, खास मैत्रिणीच्या नावावर असलेली मालमत्ता, मंत्री म्हणून जबाबदारी असलेल्या अनेक खात्यांच्या माध्यमातून केलेला भ्रष्टाचार, कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्ता, यांसंदर्भात मोठा खुलासा करणार असल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. त्यांच्या या ट्विटमुळे आता ती खास मैत्रीण कोण? असा प्रश्नही निर्माण झाला. सलग दोन ट्विट केल्यानंतर कंबोज यांनी तिसरं ट्विट देखील केलं. या ट्विटमध्ये त्यांनी परमबीर सिंग यांनी २०१९ मध्ये बंद केलेली सिंचन घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.  कंबोज यांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादीचा तिसरा नेता कोण? असा प्रश्न चर्चेत आला. राष्ट्रावादीतील काही नेत्यांनी ईडीकडून चौकशी सुरु आहे. खुद्द शरद पवार यांच्यासह अजित पवारांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. तर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचीही सीजे हाऊसमधील पुनर्बांधणी प्रकरणी चौकशी सुरू आहे. दरम्यान, कंबोज यांच्या ट्विटमधून आगामी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघण्याची शक्यता वर्तवली जातं असून  ट्वीटमधून  कंबोज यांचा कोणाकडे इशारा आहे?  नवाब मलिक, अनिल देशमुखांनंतर राष्ट्रवादीचा आणखी कोणता बडा नेता जेलमध्ये जाणार ? की, कंबोज  यांचं हे ट्विट अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दबाव तंत्राच भाग आहे का? हेच पाहणं महत्वाचं आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!