Just another WordPress site

महिनाभरात हार्ट अॅटकने अनेकांचा मृत्यू, हार्ट अटॅक ओळखायचा कसा? तुमचं हार्ट सुरक्षित आहे ना? अशी करा खात्री

गेल्या काही महिन्यांमध्ये देशात हार्ट अटॅक येऊन अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आपल्या ओळखीतील मित्र किंवा नातेवाईक असोत किंवा मोठमोठे सेलेब्रिटी असोत, यातील अनेकजण हार्ट अटॅक आल्यामुळे मृत्यूमुखी पडल्याचं गेल्या काही आठवड्यात दिसून आलं आहे. कुणी स्टेजवर परफॉर्मन्स करत असताना, कुणी मैदानात खेळत असताना तर कुणी बसल्या बसल्या हार्ट अटॅकमुळे मृत्युमुखी पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दररोज पेपरचं पान उघडलं की कोणाच्या तरी अचानक मृत्यूची बातमी आपलं लक्ष वेधून घेते. इतक्या कमी वयात असं कसं झालं? नुकतंच लग्न झालं होतं. लहान मुलं आहेत, आता त्यांचं कसं होणार? यासारख्या विचारांनी त्याच्या कुटुंबियांबद्दल एक सहानुभूतीची भावना निर्माण होते. त्याच्या जागी आपणही असू शकतो या जाणिवेने एक थंड शिरशिरी डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला थिजवून जाते. एखाद्या दिवशी ऑफिसला गेल्यानंतर घरी परत येऊ का? असा अपशकुनी विचारही मनात येऊन जातो. नेमका काय हा प्रकार आहे? हार्ट अटॅक येतो तरी कशामुळे? इतक्या लोकांचा हार्ट अटॅकने मृत्यू का होत आहे? आणि आपलं हृदय तरी सुरक्षित आहे का? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.

 

का वाढतंय हार्ट अटॅकचं प्रमाण?

डॉक्टरांनी नोंदवलेल्या निरिक्षणानुसार कमी वयातच हार्ट अटॅक येणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या काही वर्षात वर्षात वाढत असल्याचं दिसून आलं आहे. चुकीची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अपुरी झोप ही त्यामागील प्रमुख कारणं असल्याचं दिसून आलं आहे. त्याचप्रमाणे स्मोकिंग, अल्कोहोल आणि व्यायामाचा अभाव यासारख्या कारणांनीदेखील हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. बॉडी बनवण्यासाठी अनेक तरुण आपल्या आहारात सप्लिमेंटचा वापर करतात. हा प्रकारही हार्टसाठी अत्यंत धोकादायक असल्याचं सांगितलं जातं. प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम करणं किंवा प्रमाणाबाहेर डान्स करणं हे प्रकारदेखील हृदयासाठी घातक ठरत असल्याचं दिसून आलं आहे.

 

हार्ट अटॅकची प्रमुख लक्षणं

हार्ट अटॅक अचानक येतो, असं म्हटलं जातं. हार्ट अटॅकने मरण पावलेल्या माणसाला त्याची जाणीवच झाली नसावी, असं सर्वांना वाटत असतं. मात्र आपण आपल्या शरीराकडे लक्ष ठेवलं, तर ते आपल्याला हार्ट अटॅकची पूर्वसूचना देत असतं. हार्ट अटॅकची प्रमुख लक्षणं समजून घेऊया.

छातीत अचानक प्रचंड वेदना होणे
छातीतील दुखणं जबड्यापर्यंत पोहोचणे
छातीत भरल्यासारखं, जड वाटणे
हृदयाचे ठोके अचानक वाढणे
श्वास घेण्यास त्रास होणे
अचानक प्रचंड घाम येणे
थकवा येणे, गळून गेल्यासारखे वाटणे

 

वेळीच करा तपासणी

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हार्ट अटॅकचा धोका कुठल्याही वयात संभवण्याची शक्यता असते. त्यासाठी नियमित आपल्या हृदयाचं आरोग्य तपासण्याची गरज असते. त्याचप्राणं जर तुम्ही जिम जॉईन करायचा विचार करत असाल, तर कार्डिओलॉजिस्टकडून तुमच्या हार्टची तपासणी करून घेणं आवश्यक असतं. खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणे, पुरेशी झोप घेणे, जंक फूड टाळणे आणि स्ट्रेस मॅनेजमेंट योग्य प्रकारे करण्याची गरज असते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!