Just another WordPress site

Mamata Banerji : ममतांच्या हालचालींना वेग, तेलंगाणाचे CM घेणार ममता दीदी आणि CM ठाकरेंची भेट, काय आहे मास्टर प्लॅन ?

पश्‍चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला थेट टक्कर देत पराभव स्वीकारायला लावल्याबद्दल देशातील विरोधी पक्षांचा ममता बॅनर्जी प्रमुख चेहरा बनल्या. आता ममता बॅनर्जी विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र करून एक नवी राजकीय फळी बनविण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी दिली. त्यामुळे ममता बॅनर्जी ह्या अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या विरोधात विरोधकांची फळी तयार करण्यास यशस्वी होतील का,  या चर्चांना उधाण आलं. 

हायलाईट्स

१. भाजपविरोधी मोट बांधण्याच्या ममतांच्या हालचालींना वेग

२. स्टॅलिन, के. चंद्रशेखर राव यांच्‍यासह उद्धव ठाकरेही सक्रिय

३. ममता दीदी आणि उद्धव ठाकरेंची भेट घेणार तेलंगाणाचे CM

४. ममतांच्या हालचालींमुळे राजकारणात उलट-सुलट चर्चांना उधाण


राष्ट्रीय पातळीवर तिसरी आघाडी उभी करून पंतप्रधान मोदी आणि भाजप समोर आगामी लोकसभा निवडणुकीत तगडे आव्हान उभं करण्यासाठी व्यूहरचना आखली जातेय. यात शिवसेना, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस हे पक्ष पुढाकार घेत असल्याचे संकेत आधीच मिळालेत. त्यातच अलीकडे ममता बॅनर्जी या कमालीच्या सक्रिय झाल्या असून त्यांनी प्रमुख नेत्यांच्य भेटीगाठी सुरू केल्यात.  ममता बनर्जी टीएमसीचा राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे त्या अनेक पक्ष प्रमुखांच्या भेटी घेत आहेत. दरम्यान, आता देशात भारतीय जनता पार्टीला शह देण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन वर्षांपूर्वी शरद पवार यांनी भाजप विरहीत आघाडीचा प्रयत्न केला होता. त्यावेळी यश आलं नव्हतं. मात्र, ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये पुन्हा निवडून आल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर त्या अॅक्टिव्ह झाल्या.  दरम्यान,  त्यांच्या सरकारचं अधिवेशन राज्यपालांनी तहकूब केलं.  महाराष्ट्रातही राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे… राज्यपाल  सत्ताधाऱ्यांना जुमानत नसल्याची टीका महाविकास आघाडीतील अनेक नेते करत असतात…  तसंच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे देखील भाजपच्या विरोधात आघाडीत एकत्र येण्यासाठी प्रयत्नशील दिसतात. यासाठी ते लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आणि ममता बॅनर्जी यांचीही भेट घेणार असल्याची माहिती आहे.  त्यामुळें मोदी आणि भाजपाविरोधात विरोधकांची आघाडी निर्माण होतं असल्याचं चित्र आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी ट्विट करून सांगितलं की, “ममता बॅनर्जी यांनी फोनवरून माझ्याशी चर्चा केली. त्यांनी विविध राज्यांच्या राज्यपालांकडून अधिकारांचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींनी विरोधी पक्षातील सर्व मुख्यमंत्र्याची बैठक घेण्याचा सल्ला दिला. दिल्लीमध्ये लवकरच भाजपविरोधी पक्षातील मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडणार आहे”, अशीही माहिती स्टॅलिन यांनी दिली. तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर हे देखील लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची समक्ष भेट घेणार आहेत. त्याचबरोबर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हैदराबादच्या दौऱ्यावर येणार आहे, तेव्हा त्यांचीही भेट घेतली जाणार आहे, अशी माहिती के. चंद्रशेखर राव यांनी दिली. दरम्यान, भाजप सरकारची धोरणं जनताविरोधी आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला हाकलून लावले पाहिजे, असं विरोधकांना वाटतं. त्याच उद्देशाने  भाजपविरोधी राजकीय पक्षांना एकत्र करण्यात ममता बॅनर्जी मोठी भूमिका बजावणार असल्याचं चित्र आहे. मात्र, खरोखरचं विरोधकांना एकत्र आणण्यात ममता बॅनर्जी यशस्वी ठरतील का, आणि त्या भाजपला टक्कर देऊ शकतील का, की, त्यांची  राजकीय महत्वकांक्षा यात अडसर ठरेल, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!