Just another WordPress site

Lassa fever :कोरोनानंतर लासा तापाने वाढवली चिंता, लासा फिवर म्हणजे काय अन् काय आहेत लक्षणं आणि उपाय?

संपूर्ण जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभर धुमाकुळ घातला. ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव ओसरत असल्याचं दिलासादायक चित्र दिसत असताना आता आणखी एका नव्या जीवघेण्या आजाराने डोकं वर काढलं आहे. सध्या जगभरात लासा फिवर या नव्या आजाराने  चिंता वाढवली. चिंताजनक बाब म्हणजे, हा ताप साधारण ताप नसून उंदरांमुळे याचा फैलाव होतो. दरम्यान, हा आजार आहे तरी काय?  लासा ताप कसा पसरतो? या आजाराजी लक्षणं काय?  याच विषयी जाणून घेऊ. 


हायलाईट्स

१. ओमिक्रॉननंतर धुमाकूळ घालतो ‘लासा फिवर’

२.लासा ताप आजाराचा ब्रिटनमध्ये पहिला बळी

३. लासा तापाचा लहान बालके आणि गर्भवतींना धोका 

४. लासा ताप उंदरांच्या विष्ठेद्वारे आणि लघवीद्वारे पसरतो


युनायटेड किंगडममध्ये लासा फिवरमुळं एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीला आधीच ओमिक्रॉनची लागण झाली होती. लासा फिवरचा व्हायरस प्रामुख्यानं पश्चिम आफ्रिकन देशांतील प्रवाशांमध्ये आढळून आला. असं सांगितलं जात आहे की, ११ फेब्रुवारी रोजी निदान झालेल्या तीन व्यक्तींपैकी एकाचा मृत्यू झाला.  लासा फिवरमुळे मृत्यूचं प्रमाण सध्या १ टक्के असलं तरी, काही लोक, जसं लहान बालके आणि गर्भवती महिलांना त्यांच्या तिसऱ्या तिमाहीत याचा जास्त धोका असतो. चिंतेची बाब म्हणजे, लासा फिवरची लागण झालेल्या ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत. यूरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिवेंशन अॅन्ड कंट्रोलच्या प्राथमिक विश्लेषणावरुन समजलं आहे की, या व्हायरसची लागण झालेल्या काही रुग्णांना गंभीर लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासते. तसेच रुग्णालयात दाखल झालेल्या १५ टक्के रुग्णांचा या व्हायरसमुळे मृत्यू होतो. 


लासा फिवर म्हणजे काय? 

लासाचा ताप १९६९ मध्ये नायजेरियातील लासा येथे पहिल्यांदा सापडला होता. यादरम्यान दोन परिचारिकांचा मृत्यू झाला होता. सिएरा लिओन, गिनी, लायबेरिया आणि नायजेरिया यांसारख्या पश्चिम आफ्रिकन देशांमध्ये हा रोग सामान्य आहे आणि हा ताप प्रथम उंदरांद्वारे पसरला होता.


लासा ताप कसा पसरतो?

लासा ताप संक्रमित उंदरांच्या विष्ठेद्वारे आणि लघवीद्वारे पसरतो. जर एखादी व्यक्ती उंदराची विष्ठा आणि मूत्र यांच्या संपर्कात आली तर त्याला या व्हायरसचा  संसर्ग होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे त्या संक्रमित व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीलाही संसर्ग होऊ शकतो. क्वचित प्रसंगी, संक्रमित व्यक्तीच्या शारीरिक द्रव पदार्थाच्या संपर्कात आल्याने जसं की डोळे, तोंड, नाक यांच्या संपर्कातून देखील हा ताप पसरतो.


लासा फिवरची लक्षणं काय?

लासा विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर १ ते ३ आठवड्यांनी रुग्णाला सौम्य लक्षणं दिसायला सुरूवात होते. सुरूवातीला साधा ताप येतो. त्यानंतर थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी अशीही लक्षणे दिसतात.  तसेच याव्यतिरिक्त रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. याशिवाय चेहऱ्यावर सूज येणे, कंबर, छाती, पोटात दुखायला लागते. काही वेळी रक्तस्त्राव सुरू होतो. याशिवाय, ओटीपोटात दुखणं किंवा उलट्या होऊ शकतात.  जर लक्षण तीव्र असतील आणि योग्य उपचार मिळाले नाहीत तर रूग्णाचा मृत्यू होऊ शकतो. 


लासा ताप आहे जीवघेणा

सीडीसीचं म्हणणं आहे की लासा तापामध्ये, लक्षणे दिसू लागल्यापासून दोन आठवड्यांनंतर दुर्मिळ प्रकरणांमध्ये एकापेक्षा जास्त अवयव निकामी म्हणजेच मल्टी ऑर्गन्स फेल होऊन रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. लासा तापाची सर्वात सामान्य गुंतागुंत म्हणजे बहिरेपणा. एक तृतीयांश लोकांनी बहिरेपणाची तक्रार नोंदवली आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये तापाच्या सौम्य आणि गंभीर दोन्ही प्रकारांमध्ये बहिरेपणा येऊ शकतो.


लासा तापापासून वाचण्याचे उपाय काय? 

१. लासा ताप टाळण्यासाठी उंदीर येऊ शकतात अशा ठिकाणी जाणे टाळावे.

२. स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.

३. सूर्यप्रकाश घरात येऊ द्यावा आणि अन्न उंदरांपासून दूर ठेवावे. 

४. उंदीर पकडण्यासाठी पिंजऱ्याचा वापर करावा जेणेकरून स्वत:चे संसर्ग होण्यापासून संरक्षण करता येईल. 


Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!