Just another WordPress site

Karjat Nagar Panchayat Election । कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये चुरस, पवार विरुद्ध शिंदे लढत रंगणार; कोण बाजी मारणार?

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील जिल्हा बँक निवडणुकींची रणधुमाळी संपली. सध्या विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. हे सुरु असतानाचं राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील १०५ नगरपंचायंतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या पार्श्वभुमीवर सर्वच पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केलीय. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीसाठी दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार  तर दुसरीकडे भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्यात चुरस असणार आहे. त्यामुळे यंदा नगरपंचायती निवडणुकीत गड कुणाचा? याविषयी एकच चर्चा सुरू झाली.



हायलाईट्स

१. कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये चुरस

२. रोहित पवार विरुद्ध राम शिंदे लढत रंगणार

३ नामदेव राऊत राष्ट्रवादीच्या गोटात सामिल

४. आमदार रोहित पवार यांचं पारंड जड


२०१९ च्या विधानसभा निवडणुकी शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. रोहित पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवून विजयी झाले. रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव करुन मोठा धक्का देत भाजपच्या बालेकिल्लात प्रवेश केला. मात्र, आता रोहित पवारांची खरी कसोटी नगरपंचायतीच्या निवडणुकीत लागणार आहे. रोहित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. तर शिंदे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते सर्व ताकद लावून कामाला लागलाहेत. २१ डिसेंबर रोजी कर्जत नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. कर्जत नगरपंचायतीवर सध्या भाजपची एक हाती सत्ता आहे. ही सत्ता राखण्यासाठी शिंदेंनी सर्व ताकत पणाला लावली, तर आमदार रोहित पवार यांनी भाजपचा गड भेदण्यासाठी जोरदार राजकीय रणनिती आखल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं खातही उघडलं नव्हतं. नगरपंचायतीमध्ये भाजपने बाजी मारत सत्ता स्थापन केली होती. प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान नामदेव राऊत यांना मिळाला.   मात्र, यंदा ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी निवडणुकीपूर्वीच रोहित पवारांनी मोठी राजकीय खेळी खेळली. राम शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांना फोडून राष्ट्रवादीच्या गोटात सामिल केलंय. मागील २५

वर्षापासून राऊत यांचं  कर्जत शहरावर मोठं वर्चस्व आहेत. त्यामुळे राऊत यांना राष्ट्रवादीत शामिल करून घेतल्याशिवाय ही निवडणूक रोहित पवारांसाठी सोपी नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत राऊत यांची महत्वाची भूमिका असणार आहे. दरम्यान ही निवडणूक नामदेव राऊत यांच्या भोवती फिरतेय, असं दिसतं. त्यामुळे  या निवडणुकीत नगर पंचायतीच्या १७  पैकी १७ जागा आम्हीच जिंकणार, असा विश्वास रोहित पवारांना आहे. तर दुसरीकडे राम शिंदे हे मागील १० वर्ष या मतदारसंघाचे आमदार होते. राज्यात भाजपची सत्ता असतांना ते मंत्रिमंडळात मंत्रीही होते. या काळात त्यांनी मतदार संघात जी विकासकामे केली, त्या कामाच्या जोरावर जोरावर आणि जनता भाजपला बहुमत दिल्याशिवाय राहणार नाही, असं शिंदेंना वाटतं. मात्र, शिंदेना २०१९ निवडणूकीत मतदारांनी राम शिंदेना नाकारून रोहित पवारांचं पारड जड केलं होत. त्यामुळे या नगरपंचायत निवडणूकी विषयी नेमका अंदाज बांधणं अवघड आहे. एकंदरीत यावेळची निवडणूक योग्य उमेदवाराची निवड, प्रचाराची रणनीती आणि मतदारांची साथ यावर अवलंबून आहे. त्यात जो सरशी घेईल त्यांची सत्ता नगरपंचायतीवर असेल, यात दुमत असण्याचं कारण नाही.  दरम्यान, नामदेव राऊत राष्ट्रवादीच्या गोटात गेल्यानं मतदार आता त्यांना कौल देणार का, हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!