Just another WordPress site

Inheritance Right : सख्खा भाऊ नसल्यास वडिलांच्या मृत्यूनंतर चुलत भाऊ संपत्तीवर अधिकार सांगू शकतात का?

मुलींचा वडिलांच्या संपत्तीवरचा हक्क हा विषय कायमच वादात राहिला आहे.  बऱ्याचदा वडिलांच्या संपत्तीवर कुणाचा हक्क यावरुन वाद होतात. अनेकदा हे वाद अगदी न्यायालयापर्यंत पोहचतात. अशावेळी न्यायालये काय निवाडा देतात. अशाच एका प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने वडिलांच्या संपत्तीवर मुलींच्या अधिकारासंदर्भात एक महत्वाचा आदेश दिलाय. दरम्यान,  हे प्रकरण आहे तरी काय? नेमका कोर्टाने काय निर्णय दिला?  वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय? वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींच्या अधिकाराविषयी कायदा काय सांगतो? याच विषयी जाणून घेऊ. 


हायलाईट्स

१. चुलत भावांआधी वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा पहिला अधिकार

२. सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय, संपत्तीचा अधिकार मुलींकडे येणार

३. हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार मुलींना संपत्तीवर समान हक्क

४. मुलींनी हक्क त्याग केल्यास वडिलांच्या संपत्तीत हक्क मिळत नाही


न्यायालयाने एकत्र कुटुंबामध्ये राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याचं इच्छापत्र नसेल तर त्याच्या संपत्तीवर पहिला अधिकार हा मृत व्यक्तींच्या भावंडांआधी मुलीचा असेल असं स्पष्ट केलं.  मृत व्यक्तीच्या पुतण्यांना संपत्ती देण्याऐवजी प्रथम आणि प्राधान्यक्रमाने मुलीचा वडिलांच्या संपत्तीवर अधिकार असतो, असं न्यायालयाने म्हटलंय. 


काय आहे प्रकरण? 

तामिळनाडूमधील एका प्रकरणामध्ये अर्जदार महिलेच्या वडिलांचा मृत्यू १९४९ साली झाला होता. या महिलेच्या वडिलांनी स्वत:च्या कष्टाने कमावलेल्या संपत्तीच्या वाटपासंदर्भात कोणतेही इच्छापत्र मरणापूर्वी तयार केलेलं नव्हतं. मद्रास उच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये निकाल देताना एकत्र कुटुंब असल्याने संपत्तीवर मरण पावलेल्या व्यक्तीच्या भावांच्या मुलांचा पहिला अधिकार असल्याचा निकाल दिला होता. मात्र, या निर्णयाला सर्वाच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. आता सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल रद्द करत एकुलत्या एक मुलीला वडिलांच्या संपत्तीवरील पहिला अधिकार असतो असं स्पष्ट केलंय. सुनावणी करताना न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर आणि कृष्ण मुरारी यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा ५१ पानांचा निकाल दिलाय. 


न्यायालयाने नेमका काय निकाल दिला? 

सर्वोच्च न्यायालयाने हिंदू उत्तराधिकारी कायद्याअंतर्गत मुलींना वडिलांच्या संपत्तीवर समान हक्काचा अधिकार देण्यात आल्याचं नमूद केलं.  न्यायालयाने एकाद्या मृत व्यक्तीला मुलगा नसेल तर त्याची संपत्ती त्याच्या भावाच्या मुलांना देता येत नाही. त्या संपत्तीचा पहिला वारस मृत व्यक्तीची मुलगी असते. ही संपत्ती तिलाच देण्यात यावी. हा नियम मरण पावलेल्या व्यक्तीने स्वत: कमावलेल्या संपत्तीबरोबर वाटपानुसार मिळालेल्या संपत्तीलाही लागू होतो, असं न्यायालयाने स्पष्ट केलंय. इतकच नाही तर न्यायालयाने हा नियम हिंदू उत्ताराधिकारी कायदा १९५६ लागू होण्याच्या आधी झालेल्या संपत्ती वाटपालाही हा नियम लागू होत असल्याचं स्पष्ट केलं. 


वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय?

संपत्ती दोन प्रकारची असते. एक म्हणजे तुम्ही कमावलेली आणि दुसरी वडिलोपार्जित. कोणत्याही पुरुषाला आपल्या वडिलांकडून, आजोबांकडून किंवा पणजोबांकडून जी संपत्ती प्राप्त होते त्याला वडिलोपार्जित संपत्ती म्हणतात. जन्मानंतर त्या मुलाचा वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क स्थापित होतो.


वडिलोपार्जित संपत्तीवर मुलीचा अधिकार 

तसं पाहायला गेलं तर समाजात वडिलांच्या संपत्तीचा वारसदार हा मुलगाच मानला जातो. शिवाय,  वडिलोपार्जित संपत्तीवर केवळ मुलांचा अधिकार आहे, असा कायदाही होता.  मात्र, हिंदू वारस कायदा (दुरुस्ती) २००५ कायद्यानुसार या वडिलोपार्जित संपत्तीत आता मुलांइतकाच मुलींचाही अधिकार आहे. वडिल आपल्या मनाप्रमाणे या संपत्तीचं वितरण करु शकत नाही, तसेच मुलीला संपत्ती देण्यास नकारही देऊ शकत नाही.


धर्मानुसार कायदे वेगळे

वडिलांनी स्वतः कमावलेल्या संपत्तीमध्ये मुलगा आणि मुलीला वडिलांच्या मृत्यूनंतरच वाटा मिळतो. हिंदू नागरिकांच्या बाबतीत हिंदू उत्तराधिकार अधिनियम लागू होतो तर मुस्लिमांच्या बाबतीत पर्सनल लॉ लागू होतो. हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ नुसार, मुलगा आणि मुलीला समान वाटा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या संपत्तीमध्ये जेवढा हक्क मुलाचा असतो, तेवढाच मुलीचा असतो. मुलगा असं म्हणू शकत नाही की आता मुलीचं लग्न झालं आहे, तर तिला वडिलांच्या संपत्ती वाटा मिळणार नाही, तिला तिच्या पतीच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळेल.


कधी वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा अधिकार राहत नाही?

मुलींनी जर स्वतःआपल्या हक्काचा त्याग केला तर तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये कोणताही हक्क मिळत नाही. वंशपरंपरेने मिळालेली संपत्ती किंवा वडिलांनी कमावलेली संपत्ती दोन्ही बाबतीत हे लागू होतं. जर वडिलांनी स्वतःचं मृत्यूपत्र तयार करून आपली संपत्ती मुलाच्या नावे केली असेल तर अशा स्थितीमध्ये मुलींना वडिलांच्या संपत्तीवर कोणताही अधिकार राहत नाही. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की वडील वंशपरंपरेने मिळालेली संपत्ती मृत्यूपत्र लिहून मुलांच्या नावे करू शकत नाही. वंशपरंपरेने मिळालेल्या संपत्तीमध्ये मुलीचाही मुलाइतकाच हक्क असतो.


समाजात कायद्याविषयीचे गैरसमज काय? 

आधी मुलींना केवळ कुटुंबाचा सदस्य मानलं जात होतं, मात्र संपत्तीमध्ये समान वारसाचे अधिकार नव्हते. मुलीचं लग्न झाल्यावर तर तिला माहेरच्या घरचा सदस्य देखील मानलं जात नव्हतं. मात्र २००५ मध्ये कायद्यात झालेल्या दुरुस्तीनंतर आता मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वारस मानलं जातं. मुलीचं लग्न झालं तरी मुलीचा वडिलांच्या संपत्तीवरील अधिकार आबाधित राहतो. वडिलांच्या मनाविरुद्ध लग्न झालं, किंवा काही चुकीचं काम केलं असेल, तर अशा परिस्थितीतही मुलाचा आणि मुलीचाही संपत्तीवरचा हक्क राहत नाही, असा समज काही जणांमध्ये असल्याचं आढळतं.  मात्र, वडिलांच्या मनाविरुद्ध लग्न केल्यानं संपत्तीवरचा हक्क रद्द होत नाही.


Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!