Just another WordPress site

गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर, तुम्हाला मिळते ५० लाखांची नुकसान भरपाई; ‘असा’ करा क्लेम

आपण रोजच्या स्वंयपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करतो. पण अनेकदा कळत-नकळत गॅसचा स्फोट होतो आणि नको ते घडतं. दोनच दिवसांपूर्वी राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील भुंगरा गावात एका लग्न समारंभात ६ गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन किमान ८ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे झालेला हा पहिला अपघात नाही. अशा घटना या आधीही झाल्या. मात्र, तुमच्या घरात स्वयंपाकाच्या गॅसमुळे अपघात झाला तर तुम्ही तेल कंपनीकडून नुकसान भरपाई घेऊ शकता, हे तुम्हाला माहित आहे का? याच विषयी जाणून घेऊ.

भारतामध्ये सर्वाधिक संख्येने घरामध्ये LPG गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. मात्र एलपीजी गॅस सिलेंडर वापरताना सावधानता बाळगली नाही तर दूर्घटना होण्याचा धोका असतो. LPG गॅस सिलेंडर दुर्घटनेमध्ये जखमी होण्याची किंवा एखाद्याचा मृत्यू होण्याची भीती असते. तसंच घरातील मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. त्यामुळं एलपीजी गॅस कनेक्शन घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मोफत इन्श्युरन्स मिळतो. यासाठी ग्राहकाला वेगळा अपघात विमा घ्यायची गरज नाही.

किती मिळतो विमा?

घरगुती LPG गॅस सिलेंडरवर ग्राहकांना अनेक सुविधा मिळतात. त्यातील महत्वाची सुविधा म्हणजे, एलपीजी ग्राहकांना ५० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. गॅस सिलिंडरमुळे होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अपघातात जीवित आणि मालमत्तेच्या हानीसाठी विमा दिला जातो. जेव्हा ग्राहक गॅस कनेक्शन घेतात, तेव्हा गॅस कनेक्शनसोबतच ग्राहकांना ४० लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो. याशिवाय सिलेंडरच्या स्फोटामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास ५० लाख रुपयांपर्यंतचा दावा केला जाऊ शकतो. तर ग्राहकाच्या मालमत्तेचे किंवा घराचे नुकसान झालं असेल तर दोन लाख रुपयापर्यंत नुकासान भरपाई मिळते.

रक्कम देण्यापूर्वी कंपनी तपासणी करते

अपघात विम्याची रक्कम देण्यापूर्वी कंपनी स्फोट झालेल्या ठिकाणाची तपासणी करते. स्फोट किंवा अपघात गॅस सिलेंडरमुळेच झाला आहे का? हे या तपासात पाहिलं जातं. तपासादरम्यान कंपनीला जर गॅस सिलिंडरमुळे अपघात झाला असून त्यामध्ये नुकसान झाल्याचं समोर आल्यास योग्य ती नुकासान भरपाई दिली जाते. दुसरं म्हणजे, अपघाताच्या परिस्थितीत आगीचा मुख्य कारण दुसरे असेल तर या विमा संरक्षणाचा लाभ उपलब्ध मिळणार नाही, अशी तरतुद या पॉलिसीमध्ये आहे.

सिलिंडर घेतांना काळजी घ्याल?

या विमा संरक्षणाचा फायदा घेण्यासाठी तुम्ही जेव्हाही सिलिंडर घ्याल तेव्हा तुमच्या सिलेंडरची एक्सपायरी डेट निघून गेलेली नाही याची खात्री करा. आणि नेहमी एक्स्पायरी डेट पाहूनच सिलेंडर घ्या. कारण ते विमा सिलेंडरच्या एक्सपायरी डेटशी जोडलेले असते. दाव्याचा लाभ फक्त अशा लोकांनाच मिळेल ज्यांचे सिलेंडर पाईप, स्टोव्ह आणि रेग्युलेटर ISI मार्कचे आहेत.

काय आहे दावा करण्याची प्रक्रिया?

अपघातानंतर दावा करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाइट http://mylpg.in वर देण्यात आली. या वेबसाईटनुसार, जर कोणतीही व्यक्ती LPG कनेक्शन घेते आणि त्याने घेतलेल्या त्या सिलेंडरमधून कोणतीही दुर्घटना होते तेव्हा त्याला ५० लाख रुपयांच्या विम्याचा दावा करता येऊ शकतो. ग्राहकाने थेट विमा कंपनीकडे जाण्याची किंवा दाव्यासाठी अर्ज करण्याची गरज नाही. तर ग्राहकाने अपघात झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत त्याच्या वितरकाला आणि जवळच्या पोलिसांना अपघाताची लेखी तक्रार करावी लागते. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दिलेली एफआयआरची प्रत गॅस डिस्ट्रीब्यूटरला एफआयआरची द्यावी लागेल. दावा करतांना एफआयआरच्या प्रतसोबतच मृत्यू झाल्यास वैद्यकीय पावती, रुग्णालयाचे बिल, शवविच्छेदन अहवाल आणि मृत्यू प्रमाणपत्रही आवश्यक आहे. हे कागदपत्र डिस्ट्रीब्युटरला दिल्यानंतर डिस्ट्रीब्युटर ही माहिती तेल कंपनी आणि इन्शूरन्स कंपनीला देईल. त्यानंतर तेल कंपनीकडून संबंधित घटनेबाबत दूर्घटनेचं कारण तपासेल. तपासानंतर गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे झालेलं नुकसानाची रक्कम ही टीम ठरवेल. त्यानंतर तेल कंपनी क्लेम केलेली रक्कम डिस्ट्रीब्युटरकडे पाठवते. ही रक्कम डिस्ट्रीब्युटरजवळ जमा झाली की, डिस्ट्रीब्युटर ही रक्कम ग्राहकाला सुपूर्द करेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!