Just another WordPress site

Gulam Nabi Azad। आता गुलाम नबी आझादही कॉंग्रेसशी फारकत घेऊन स्थापन करणार स्वत:चा नवा पक्ष?

नेहरू-गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या रायबरेली मतदारसंघांमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. काँग्रेस आमदार आदिती सिंग यांनी  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चक्क भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वीही अनेक नेत्यांनी ममता बॅनर्जीच्या तृणमुल मध्ये प्रवेश केला. अशातच आता जम्मू आणि काश्मीरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद पक्षाला सोडचिठ्ठी देऊन नवीन पक्ष स्थापन करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.


हायलाईट्स

१. गुलाम नबी आझाद कॉंग्रेसशी घेणार फारकत? 

२. स्वत:चा नवा पक्ष स्थापन करण्याची शक्यता  

३. जम्मु काश्मिरमध्ये कॉंग्रेसला बसु शकतो फटका 

४. कॉंग्रेसच्या गोटात पसरलीय अस्वस्थता 


मागील काही दिवसांपासून काँग्रेसमधील नाराजी आणि धुसपूस आता चव्हाट्यावर यायला लागली. पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट नवीन पक्ष स्थापन केला. यानंतर प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचे राजीनामानाट्य रंगले. पंजाबमधील अंतर्गत वाद शमतोय, तोच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद  पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांना उत आला. खंरतर गुलाम नबी आझाद काँग्रेसमधील असंतुष्ट जी-२३ गटामधील एक दिग्गज नेते आहेत. अनेक वर्षे त्यांनी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. मात्र, काँग्रेसने त्यांना मुदत संपल्यानंतर पुन्हा संधी दिली नाही. त्यामुळे त्यांनी नाराज G 23 गटात सहभागी होत काँग्रेस नेतृत्वाला आव्हान दिले होते. आझाद हे जनाधार गमावलेले नेते आहेत असा काँग्रेसमधील एका गटाचा दावा आहे. तर, जम्मू-काश्मीरमधील पूँछ येथे एका जनसभेला संबोधित करताना २०२४ मध्ये काँग्रेस पक्षाला ३०० जागा मिळतील अशी परिस्थिती नसल्याची स्पष्ट कबुली आझाद यांनी दिली. बुधवारी जम्मू-काश्मीरमधील पुंछमधील एका सभेला ते संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. यातून नेमकं आझाद हे कॉंग्रेसला काय सुचवू पाहतात, याविषयी अनेक तर्क-वितर्क लढवले जाता आहेेत. या वक्तव्यातून आझाद हे  कॉंग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. २०२४ मध्ये काँग्रेस पक्ष बहुमताकडे जाणार नाही, असे सांगत त्यांनी पक्ष सोडण्याचे सूतोवाच केलं असं दिसतंय, अशा चर्चांना उत आलाय. दुसरं म्हणजे, राज्यघटनेतील  कलम ३७०प्रभावहीन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. याबाबत असलेल्या मौनाचे आझाद यांनी समर्थन केले. गेल्या दिवसांमध्ये गुलाम नबी आझाद हे काँग्रेसविरोधात काही ना काही वक्तव्य करत आहेत. आणि कुठंतरी भाजप सरकारचे  समर्थन  करतांना दिसत आहेत. सध्या आझाद यांच्या जनसभांना होणाऱ्या मोठ्या गर्दीमुळे कॉंग्रेसच्या गोटात एकच अस्वस्थता पसरली. त्यांच्या सभांना मोठी गर्दी होत असून त्यामुळे जनाधार गमावल्याच्या दाव्याला हा छेद आहे असे मानले जाते. आझाद यांच्या जनसभांना होणाऱ्या गर्दीमुळे काँग्रेस पर्यवेक्षक आणि पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जातं. आझाद लवकरच पक्ष सोडणार असून नवा पक्ष स्थापन करतील असे काँग्रेसमधील काही नेते सांगत आहेत. आगामी काळात गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नवा पक्ष स्थापन केल्यास पक्षातील अधिकतर नेते आझाद यांच्यासोबत जातील, अशी माहिती आहे. तर काहींच्या मते,  इतरही पक्षांतील अनेक नेते आझाद यांच्या संपर्कात आहेत. आझाद यांनी नवीन पक्ष स्थापन केल्यास ते सर्व नेते आझाद यांच्या नव्या पक्षात सहभागी होऊ शकतात, अशी दाट शक्यता वर्तवली जाते. दरम्यान, गुलाब नबी आझाद यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकल्यास याचा मोठा जम्मु काश्मिर मध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसु शकतो, असं राजकीय जाणकार सांगतात. मात्र, गुलाब नबी आझाद हे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. दरम्यान, राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि कुणाचा शत्रूही नसतो. त्यामुळे गुलाब नबी आझाद हे कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देतात की, कॉंग्रेसशी एकनिष्ट राहतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.


हेही वाचा :  परिवहन मंत्र्यांनी दिला मेस्मा लागू करण्याचा इशारा, मेस्मा कायदा म्हणजे काय? आणि कधी लावण्यात येतो हा कायदा?

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!