Just another WordPress site

मालेगाव येथे शिवपुराण कार्यक्रमासाठी निघालेल्या कुटुंबाच्या कारचा अपघात, झेपी सदस्या जागीच ठार

औरंगाबाद : मालेगाव येथे शिवपुराण कार्यक्रमासाठी निघालेल्या कुटुंबाच्या कारचा विचित्र अपघात होऊन माजी जि.प. सदस्या जागीच ठार झाल्या आहेत. तर गाडीतील इतर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना कन्नड – चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाटात घडली. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील माजी जिल्हा परिषद सदस्या यमुनाबाई रामचंद्र पवार (वय ६८) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. कृष्णा संदीप गव्हाणे, अश्विनी कृष्णा गव्हाणे व गौरी कृष्णा गव्हाणे अशी अपघातात जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथे प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराणाचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमासाठी यमुनाबाई पवार यांचे बंधू त्यांच्या कुटुंबासोबत जात होते. त्यांनी त्यांची बहीण यमुनाबाई यांना देखील सोबत घेतले. चौघंही मालेगाव येथे शिवपुराण कार्यक्रमाला कारने जात असताना कन्नड येथील ऑट्रम घाटात सरदार पॉईंटजवळ समोरील ट्रकने अचानक ब्रेक मारला. त्यापाठोपाठ चालक कृष्णा यांनी देखील ब्रेक मारला. मात्र, मागून येणाऱ्या भरधाव मालवाहू ट्रकने कृष्णा यांच्या कारला धडक दिली आणि कारला पुढे फरफटत नेत कार समोरील ट्रकला धडकली. त्यामुळे कारचा दोन्ही ट्रकच्या मध्ये अडकून चूराडा झाला.

या भीषण अपघातात यमुनाबाई गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघेजण गंभीर जखमी झालेत. भीषण अपघात झाल्याचे पाहून ट्रक चालक फरार झाला. या घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. मात्र, मृत आणि जखमी गाडीतच अडकले होते. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने वाहने वेगवेगळी केली व अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. जखमींना चाळीसगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

ऑट्रम घाटात नेहमीच वाहनांची कोंडी होते. एखादे वाहन नादुरुस्त झाले की वाहनांची भलीमोठी गर्दी या घाटात होते. त्यामुळे वाहतुकीचे नियमन करताना पोलिसांच्या नाकी नऊ येतात. त्यामुळे या ठिकाणी भुयारी मार्ग व्हावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. भुयारी मार्ग व्हावा यासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले होते. मात्र ,भुयारी मार्ग होत नसल्याने या मार्गांवर वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!