Just another WordPress site

इलेक्ट्रिक कार होणार आणखी ‘पॉवरफुल’, आता केवळ अवघ्या ५ मिनीटांत चार्ज होणार इलेक्ट्रिक कार

भारतीय बाजारात गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ झाली. रस्त्यावर आता इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणात धावताना दिसताहेत. त्यामुळे लवकर चार्ज होणारी आणि बॅटरी लाइफ चांगली असलेल्या वाहणांना चांगली मागणी आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. इलेक्टिक कार आता या केवळ ५ मिनिटांतच चार्ज होतील, असं तंत्रज्ञान अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने विकसित केलंय.

 

महत्वाच्या बाबी

१. गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ
२. इ-वाहने चार्ज होण्यासाठी २० मिनिटे ते १ तास इतका वेळ
३. आता इलेक्ट्रिक कार होईल केवळ पाच मिनिटांत चार्ज
४. अमेरिकेच्या ‘नासा’ या संस्थेने विकसित केलं नवं तंत्रज्ञान

 

इंधनाचे वाढते दर, प्रदुषणामुळे सध्या जगभर इलेक्ट्रीक मोटारींचा पर्याय स्विकारला जातोय. पारंपरिक इंधनाला पर्याय आणि पर्यावरणपूरक असणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना सध्या मोठ्या प्रमाणात मागणी वाढतेय. मात्र या इलेक्ट्रिक गाड्यांना चार्जींगसाठी लागणाऱ्या वेळेमुळं नागरिक हैराण आहेत. त्यासाठी या विजेवर चालणाऱ्या वाहनांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान शोधलं जातंय. जगभरात सर्वत्र इलेक्ट्रिक मोटारींच्या वापराला प्रोत्साहन दिले जात असतानाच आता या मोटारी केवळ ५ मिनिटांतच चार्ज होतील, असे तंत्रज्ञान नासाने तयार केलंय. त्यामुळं इलेक्ट्रिक कारच्या चार्जिंगचं टेन्शन आता दूर होईल. एकीकडे बॅटरीची रेंज वाढवली जात असताना दुसरीकडे फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानामुळे लोकांना इलेक्ट्रिक कार वापरणं अधिक सुलभ होईल. अर्थात, हे तंत्रज्ञान त्यांनी भविष्यातील अवकाश मोहिमांसाठी तयार केले असले तरी त्याचा वापर मोटारी चार्ज करण्यासाठीही केला जाऊ शकतो. यामुळे या वाहनांचा वापर करणाऱ्यांची संख्याही वाढेल, असा विश्‍वास नासाने व्यक्त केला. त्यामुळं इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरू शकते.

अमेरिकेतील पर्ड्यु विद्यापीठातील संशोधकांनी ‘फ्लो बॉइलिंग अँड कंडेन्सेशन’ हा प्रयोग विकसित केला. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अत्यंत कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या वातावरणात दोन टप्प्यांत द्रव पदार्थाचे वहन आणि उष्णतेचे रूपांतर करण्यासाठीचा हा प्रयोग आहे. ‘सबकूल्ड फ्लो बॉइलिंग’ या नव्या तंत्रज्ञानामुळे उष्णतेचे रूपांतर अधिक परिणामकारक पद्धतीने शक्य असून भविष्यात अवकाशात तापमान नियंत्रणासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. याच तंत्रज्ञानाचा पृथ्वीवरही वापर होऊ शकतो. इलेक्ट्रिक मोटारीमध्ये त्याचा प्रभावीपणे वापर शक्य आहे, असा संशोधकांचा दावा आहे. या तंत्रज्ञानाद्वारे, डायइलेक्ट्रिक लिक्विड कूलंट हे चार्जिंग केबलमधून सोडले जाते. येथे विद्युत वहन करणाऱ्या कंडक्टरद्वारे निर्माण झालेली उष्णता हे कूलंट शोषून घेते. त्यामुळे सुमारे २४.२२ किलोवॉट ऊर्जा काढून टाकल्याने सध्याच्या चार्जरपेक्षा ४.६ पट अधिक वेगाने वीजेचे वहन होते. यामुळे चार्जिंग केबल २४०० ॲम्पियरचा वीज पुरवठा करू शकते.

इलेक्ट्रिक मोटारी चार्ज होण्यासाठी सध्या वीस मिनिटे ते एक तास इतका वेळ लागतो. काही मोटारींसाठी हा वेळ याहून अधिक आहे. चार्जिंगसाठी लागणारा वेळ आणि चार्जिंग स्टेशनची कमी संख्या या इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक प्रसार होण्यातील मोठा अडथळा असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या चार्जिंगसाठीचा वेळ पाच मिनिटांवर आणण्यासाठी चार्जिंग यंत्रणेला १४०० ॲम्पियरचा विद्युतप्रवाह मिळणे आवश्‍यक आहे. सध्याच्या अत्याधुनिक चार्जरला केवळ ५२० ॲम्पियरचा वीजेचा पुरवठा होतो. चार्जरला १४०० ॲम्पियरचा वीजपुरवठा झाल्यास अधिक तापमान उष्णता निर्माण होऊन वेगाने चार्जिंग होऊ शकते. दरम्यान, हे तंत्रज्ञान प्रत्यक्षपणे बाजारात येण्यासाठी आणखी किती काळ लागतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!