Just another WordPress site

Eknath Shinde Property : शिंदेंकडे ७ गाड्या, ठाण्यात दोन बंगले, २५ लाखांचं सोनं… एकनाथ शिंदेंची नेमकी संपत्ती तरी किती?

शिवसेनेचे पहिल्या फळीचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिंदेंनी बंड करून सेनेत सुरुंग लावल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आलं. त्यामुळं आता शिंदे यांच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं. शिंदे हे सध्या बंडखोर आमदारांसह गुवाहाटीतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आहेत. दरम्यान, ५० आमदारांची बडदास्त ठेवणाऱ्या एकनाथ शिंदेंची नेमकी संपत्ती किती? याच विषयी जाणून घेऊ.महत्वाच्या बाबी

१. एकनाथ शिंदेंकडे साडे अकरा कोटीची संपत्ती

२. शिंदेंकडे ७ गाड्या, १ पिस्तूल, २५ लाखांचं सोनं


एकनाथ शिंदेंची राजकीय पार्श्वभूमी सर्वांना माहिती आहे. रिक्षाचालक ते मंत्री असा एकनाथ शिंदे यांचा प्रवास आहे. शिंदे हे अनेक वर्षापासून मंत्रिपदावर आहेत. सध्या महाविकास आघाडीतील महत्त्वाचं असलेलं नगरविकास खातं हे गेल्या अडीच वर्षापासून  शिंदे यांच्याकडेच आहे. नगरविकास खातं हे बहुतेक मुख्यमंत्री स्वत:कडेच ठेवतात. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे खातं  एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं. गेल्या तीन वर्षात एकनाथ शिंदे यांची संपत्ती किती वाढली याचे आकडे अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र, २०१९ पर्यंत नेमकी त्यांची संपत्ती किती होती, याची आकडेवारी समोर आली. २०१९ च्या प्रतिज्ञापत्रात शिंदेंनी आपल्याकडील संपत्तीची माहिती दिली होती. यात घर, गाडी, मालमत्ता, सोनं, गुंतवणूक, कर्जासह इतरही माहिती जाहीर केली  होती. या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे साडे अकरा कोटीची संपत्ती आहे. शिंदे यांच्याकडे ७ गाड्या आहेत. यामध्ये दोन स्कॉर्पिओ, दोन इनोव्हा, एक अर्माडा गाडीचा समावेश आहे. या सर्व गाड्यांची किंमत २०१९ मध्ये ४६ लाख इतकी होती. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे ११० ग्रॅम सोन स्वतःकडे आहे. तर ५८० ग्रॅम सोनं बायकोकडे असल्याची माहिती शिंदे यांनी प्रतिज्ञापत्रात दिली होती. एकूण २५ लाख रुपयांपेक्षा जास्त सोनं शिंदे यांच्याकडे २०१९ साली होतं.  याशिवाय, त्यांनी आपल्याकडे एक पिस्तूल आणि एक रिव्हॉल्व्हरही असल्याची माहिती दिली होती. शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर २८ लाख रुपयांची शेतजमीन आहे. महाबळेश्वरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावावर १२ एकर जमीन आहे. तर चिखलगाव आणि  ठाण्यात पत्नीच्या नावे १.२६ हेक्टर जमीन असल्याचीही माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रातून दिली होती. वागळे इस्टेटमध्ये त्यांच्या पत्नीच्या नावे ३० लाखांचा एक दुकानाचा गाळा आहे.  तर ठाणे पश्चिमेच्या वागळे इस्टेटमधील धोत्रे चाळीत एक घर आहे. हे घर ३६० स्केअर फिट आहे. तर लँडमार्क को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीमध्ये एक आलिशान फ्लॅटही आहे. या फ्लॅटचं क्षेत्रफळ २ हजार ३७० स्केअर फिट आहे. दरम्यान, त्यांच्या पत्नीच्या नावेही असाच एक फ्लॅट याच सोसायटीमध्ये आहे. तर शिवशक्ती भवन इथेही एक फ्लॅट पत्नीच्या नावे घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलेली होती. घरं आणि गाळ्याांचा आताच्या घडीचं किंमत पाहिलं तर ते ९ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!