Just another WordPress site

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडाआधी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून हादरा देणाऱ्या ‘या’ नेत्यांविषयी तुम्हाला माहिती आहे का?

विधान परिषद निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचं नाराजीनाट्य केंद्रस्थानी आलं. शिंदेंनी बंड पुकारल्यामुळे सेनेत राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. याचा फटका राज्यातील सरकारलाही बसू शकतो. दरम्यान, शिवसेना पक्षात असं बंड पुकारण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही सेनेला ‘अखेरचा जय महाराष्ट्र’ करून अनेकांनी खळबळ उडवून दिली होती. याच निमित्ताने आजपर्यंत कोणत्या बड्या नेत्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन रामराम ठोकला? याच विषयी जाणून घेऊ. 


महत्वाच्या बाबी 

१. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचं नाराजीनाट्य केंद्रस्थानी 

२. शिंदेंनी बंड पुकारल्यामुळे राजकीय भूकंप होण्याची शक्यता

३. सर्वात आधी शिवसेनेतून छगन भुजबळ बाहेर पडले होते

४. भुजबळ, राणे, आता एकनाथ शिंदेंही बंडाच्या तयारीत 


छगन भुजबळ

सर्वात आधी शिवसेनेतून दिग्गज नेते छगन भुजबळ हे बाहेर पडले. १९९१ साली भुजबळांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि थेट राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षनेत्याचं पद आणि मनोहर जोशींसोबतच्या मतभेदामुळे भुजबळांनी सेना सोडल्याचे बोलले जाते. यावेली सेनेला पहिल्यांदा मोठं खिंडार पडलं. त्यावेळी नऊ आमदारांना घेऊन भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.


गणेश नाईक

शिवसेनाला दुसरा मोठा झटका बसला तो गणेश नाईक यांच्या शिवसेना सोडण्याने. नवी मुंबईतल्या बेलापूर मतदारसंघातून १९९० साली गणेश नाईक पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाले. पुढे १९९५ साली जिंकले आणि त्याचवेळी शिवसेना-भाजप युतीची महाराष्ट्रात सत्ता आली. तेव्हा त्यांना महत्वाच्या मंत्रिपदाची अपेक्षा होती.  मात्र महत्वाची खाते डावलून त्यांना पर्यवरण मंत्रिपद देण्यात आलं.  इथेच गणेश नाईक यांच्या शिवसेनेतील नाराजीची ठिणगी पडली आणि  नाराज असणाऱ्या गणेश नाईकांनी १९९९ ला शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. २०१४ मध्ये त्यांनी ४८ नगरसेवक घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. 


नारायण राणे

१९९१ साली छगन भुजबळांनी सेना सोडली आणि विधिमंडळातल्या विरोधीपक्ष नेतेपदाची संधी आमदार राणेंकडे चालून आली. दरम्यान, युती सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मनोहर जोशींना गैरव्यवहारांच्या आरोपांचा सामना करावा लागला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी जोशींचा राजीनामा घेऊन राणेंनी मुख्यमंत्री केलं. याच काळात बाळासाहेबांनी आपला उत्तराधिकारी म्हणून शिवसेना कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची निवड केली आणि नारायण राणे दुखावले गेले.  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला असलेला राणेंचा विरोध आणि शिवसेनेतली गटबाजी बळावत गेल्याने राणेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. २००५ साली राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढं त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 


राज ठाकरे

२००६ साली शिवसेनेत पुन्हा एकदा उभी फूट पडली. ही फूट फक्त शिवसेनेतीलच नव्हती तर ती ठाकरे घराण्यातलीही फूट होती. कारण ज्या राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जायचं त्यांनीच शिवसेनेला रामराम ठोकला. त्याच कारण होतं. महाबळेश्वर इथंलं अधिवेशन. या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. आणि त्यामुळे उद्धव हेच बाळासाहेब ठाकरे आणि पर्यायानं शिवसेनेचे वारसदार आहेत यावर शिक्कामोर्तब झालं. त्यामुळे राज ठाकरे  २७  नोव्हेंबर २००५ रोजी  शिवसेनेतून बाहेर पडले. 


भास्कर जाधव

२००४ मध्ये भास्कर जाधवांना शिवसेनेची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे २००४  मध्ये त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून उतरले, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात त्यांना विविध खात्याची मंत्रिपदं सांभाळली. सुनील तटकरे, उदय सामंत यांच्याशी वितुष्ट असल्यामुळे अखेर  हातातल्या घड्याळ्याला जय महाराष्ट्र करत पुन्हा एकदा शिवबंधन बांधून घेतलं. 


प्रवीण दरेकर

मुंबै बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी दरेकर यांची राजकीय कारकीर्द झाकोळली. मात्र,  त्यांचा शिवसेना, मनसे आणि भाजप हा प्रवास आश्चर्यचकित करणारा आहे. राज ठाकरे शिवसेनेत असल्यापासून त्यांचे विश्वासू साथीदार असलेल्या प्रवीण यांनी २००९ मध्ये मनसेच्या तिकिटावर विधानसभा गाठली. २०१४  मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 


बाळा नांदगावकर

१९९५  मध्ये मुंबईतल्या माझगाव इथून बाळा नांदगावकर आमदार म्हणून निवडून आले. १९९९ आणि त्यानंतर २००४ मध्येही ते निवडून आले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर बाळा नांदगावकर यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.


एकनाथ शिंदे

छगन भुजबळ आणि नारायण राणे यांच्यासोबत १० च्या आतच आमदार गेले होते. मात्र, सध्या शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या मोठी आहे. शिवाय शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा ठाणे जिल्ह्यावर शिंदे यांची चांगलीच पकड आहे. शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे ठाण्याचे खासदार आहेत. त्यामुळे भुजबळ आणि राणे यांच्या तुलनेत शिंदे यांची ताकद जास्त आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची बंडखोरी यशस्वी झाली तर शिवसेनेची आतापर्यंतची सर्वात मोठी हानी होईल. त्यामुळं शिवसेना पुन्हा एकदा मोठं खिंडर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!