Just another WordPress site

Economic Inequality : अब्जाधीशांच्या संख्येत भारत अव्वल, सर्वात श्रीमंत फक्त ९८ भारतीयांकडे ५५.२ कोटी लोकांइतकी संपत्ती

कोरोना संकट काळात एकीकडे भारतात अब्जाधीशांची संख्या वाढत असताना दुसरीकडे गरिबीही झपाट्याने वाढतेय. गेल्या वर्षभरात देशातील गरीबांची संख्या दुप्पट झाली आहे, तर देशात ४० नवीन अब्जाधीश झाले आहेत, असा दावा ऑक्सफॅम इंडियाच्या ताज्या ‘इनइक्वॅलिटी किल्स’ या अहवालात करण्यात आला. या अहवालात नेमकं काय सांगितलं? अहवालानुसार, भारतातील परिस्थिती कशी आहे? याच विषयी जाणून घेऊया.




हायलाईट्स

१. देशातील अब्जाधीशांची संपत्ती झाली दुप्पट 

२. फ्रान्स, स्वीडनपेक्षा अधिक अब्जाधीश भारतात

३. भारताने जगातील अनेक देशांना मागे टाकले

४. आर्थिक असमानतेमुळे रोज २१ हजार लोकांना मरण

ऑक्सफॅम इंटरनॅशनलने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले की, कोविड-१९ साथीच्या आजारापासून, जगातील दहा श्रीमंत व्यक्तींनी त्यांचे नशीब दुप्पट केले. तर ९९ टक्के नागरिकांचे उत्पन्न कमी झाले आहे. पत्रकानुसार, जगातील १० सर्वात श्रीमंत व्यक्तींनी त्यांची संपत्ती ७०० अब्ज डालर्स वरून १.५ ट्रिलियन डालर्स इतकी वाढवलीय.


अहवाल काय म्हणतो?

हा अहवाल जगभरात पसरलेल्या असमानतेबद्दल बोलतो. आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन यांसारख्या देशांतील १ अब्ज महिला आणि मुलींपेक्षा २५२ पुरुषांकडे अधिक संपत्ती आहे, असा धक्कादायक खुलासा अहवालात करण्यात आला. जर कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांचे आयुर्मान गोर्‍या लोकांइतके असते, तर आज ३.४ दशलक्ष कृष्णवर्णीय अमेरिकन जिवंत राहिले असते, जे COVID-19 महामारीपूर्वी २.१ दशलक्ष होते. पर्यावरणाला होणाऱ्या हानीबद्दल बोलताना, सर्वात गरीब १ अब्ज लोकांपेक्षा ८००० पट जास्त कार्बन उत्सर्जन जगातील २० श्रीमंत अब्जाधीश करतात. अहवालातील अंदाजानुसार गरीब राष्ट्रांमध्ये आरोग्यसेवा उपलब्ध नसल्यामुळे दरवर्षी ५.६ दशलक्ष लोक मरतात आणि दरवर्षी २.१ दशलक्ष लोक उपासमारीने मरतात. कोरोना साथीच्या दरम्यान जगातील १० सर्वाधिक धनाढय़ांची संपत्ती दुप्पट झाली. मात्र, त्यामुळे वाढलेल्या असमानतेने दररोज किमान २१ हजार ३०० लोकांचा जीव घेतला गेला. कोविड-१९ प्रतिबंधक लशींचे जगभरात वाटप आणि विभाजन याचे ढळढळीत उदाहरण आहे.


अहवाल भारताबद्दल काय सांगतो?

देशात दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू होते. अपुऱ्या आरोग्य सुविधांची उडालेली दैना उडाल्याचं चित्र होते. त्याच काळात अहवालानुसार,  भारतीय अब्जाधीशांची संख्या २०२० मध्ये १०२ वरून २०२१ मध्ये १४२ वर पोहोचली. म्हणजे, अब्जाधीशांची संख्या ४० ने वाढून १४२ वर पोहोचल्याचे जागतिक अहवालाला पूरक ‘ऑक्सफॅम इंडिया’चा अहवाल नमूद करतो. राष्ट्रीय संपत्तीमध्ये सर्वात खालच्या पातळीवरील ५० टक्के लोकांचा वाटा फक्त ६ टक्के होता. तर भारतातील टॉप १० टक्‍क्‍यांकडे लोकांकडे २०२० मध्ये देशाच्या एकूण राष्ट्रीय संपत्तीपैकी ४५ टक्के संपत्ती होती.  सर्वात श्रीमंत ९८ भारतीयांची एकत्रित संपत्ती ही बाकी ५५ कोटी २० लाख भारतीयांच्या एकूण मालमत्तेपेक्षा जास्त भरणारी आहे.


भारताने जगातील अनेक देशांना मागे टाकले

भारताने जगातील अनेक देशांना मागे टाकले आहे. जर आपण अब्जाधीशांच्या निर्देशांकावर नजर टाकली तर, जगातील ५०० सर्वात श्रीमंत व्यक्तींनी गेल्या वर्षी त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये $१ ट्रिलियनपेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे. ऑक्सफॅमने म्हटले आहे की, भारत, जेथे शहरी बेरोजगारी गेल्या मे महिन्यात १५ टक्क्यांपर्यंत वाढली आणि अन्न असुरक्षितता वाढली, आता फ्रान्स, स्वीडन आणि स्वित्झर्लंडपेक्षा अधिक अब्जाधीश भारतात आहेत. 


भारतात अपेक्षित कर सुधारणा?   

भारतातील श्रीमंतांवर कर लादल्यास आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक सेवांची काळजी कशी घेता येईल याबद्दलही अहवालात सांगितले आहे. त्याचप्रमाणे, देशातील ९८  श्रीमंत कुटुंबांवर जर फक्त ४ टक्के कर लादल्यास आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय दोन वर्षांहून अधिक काळ, मध्यान्ह भोजन कार्यक्रम १७ वर्षे किंवा सहा वर्षांसाठी समग्र शिक्षा अभियान चालवू आणि त्याची देखरेख करू शकते, असे ऑक्सफॅम इंडियाचा अहवालानेच सूचित केले आहे.  तसंच भारतातील 98 सर्वात श्रीमंत अब्जाधीश कुटुंबांवर जर १ टक्के संपत्ती कर लागू केल्यास आयुष्मान भारत योजनेला सात वर्षांहून अधिक काळ किंवा भारत सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता कार्यक्रमाला शिक्षण विभागाकडून वित्तपुरवठा केला जाऊ शकतो.


आर्थिक असमानतेमुळे दर ४ सेकंदाला एक व्यक्ती मरण पावते

गरिबांना कोरोना, बेरोजगारी, महागाईने मारले तर श्रीमंत अधिक श्रीमंत बनत गेले, असं आर्थिक असमानतेचं वास्तव हा अहवाल पुढे आणतो. ऑक्सफॅमच्या अंदाजानुसार, आर्थिक विषमतेमुळे दररोज किमान २१  हजार जण आपला जीव गमावत आहेत. याचा अर्थ विषमतेमुळे दर ४ सेकंदांना एका व्यक्तीचा मृत्यू होतोय.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!