Just another WordPress site

Delmicron । अरे बापरे! डेल्टा, ओमिक्रॉननंतर आता डेल्मिक्रॉन; किती धोकादायक आहे हा व्हेरियंट ?

कोरोना विषाणूने गेल्या दोन वर्षांपासून जगभरात धुमाकूळ घातला. आतापर्यंत कोरोनाचे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, डेल्टा प्लस असे वेगवेगळे व्हॅरिएंट्स आढळून आलेत. कोरोनाचा एक व्हेरिएंट गेला की काही काळातच नवा व्हेरिएंट समोर येतोय. वुहानमधील कोरोनाच्या पहिल्या व्हेरिएंटमुळे पहिली लाट आली होती. तर डेल्टाने संपूर्ण जगात भयावह परिस्थिती निर्माण केली होती. आता काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा व्हॅरिएंटआढळून आला. त्यानंतर अल्पावधीतच अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले. त्यातच आता ओमिक्रॉन व्हेरिएंटचा एक भाऊही समोर आला असून नव्या व्हॅरिएंटची चर्चा सुरू झाली. डेल्मिक्रॉन असं या नव्या व्हॅरिएंटचं नाव आहे.  डेल्मिक्रॉन म्हणजे नक्की काय?, त्याचा भारताला किती धोका आहे? याचा सर्वाधिक फटका कोणत्या देशांना बसू शकतो? या विषयी जाणून घेऊया.


डेल्मिक्रॉन काय आहे?

डेल्मिक्रॉन हा कोरोनाचा डबल व्हॅरिएंट असून, त्याचा पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये प्रसार वाढत आहे. तज्ज्ञांना दिसत असलेला ओमिक्रॉनचा भाऊ अन्य कुणी नाही तर डेल्टा आणि ओमिक्रॉनचे मिळते जुळते रूप आहे. त्याला डेल्मिक्रॉन असे नाव देण्यात आले आहे. डेल्मिक्रॉन हा शब्द डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन शब्दांपासून तयार करण्यात आलाय. सध्या हा शब्द दोन अर्थांनी वापरला जातोय. पहिला म्हणजे एकाच वेळी दोन प्रकारच्या कोरोना विषाणूंचा होणारा प्रादुर्भाव आणि दुसरा म्हणजे या दोन्ही विषाणूंमधील रचेनतून संयुक्तरित्या निर्माण होण्याची शक्यता असलेल्या नव्या प्रकारच्या विषाणूलाही काहीजण याच नावाने संबोधताना दिसत आहेत. आता डेल्मिक्रॉनचा अगदी सामान्य भाषेत अर्थ सांगायचा झाल्यास डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या स्ट्रेनचा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होणे.


डेल्मिक्रॉनचा व्हायरस तयार होऊ शकतो?

दोन्ही व्हेरिएंट एकत्र येऊन एक सुपर स्ट्रेन तयार करू शकतात की नाही यावरून तज्ज्ञांमध्येच मतभेद आहेत. असं असलं तरी दोन्ही व्हेरिएंट एकत्र येण्याची शक्यता फेटाळण्यात आलेली नाहीय. काही संशोधकांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार अशाप्रकारे एकाच वेळी दोन व्हेरिएंट सक्रीय असले तरी ते एकत्र येऊन नवीन व्हेरिएंट निर्माण होण्याची शक्यता दुर्मिळ आहे. मात्र ही शक्यता पूर्णपणे फेटाळता येणार नसल्याचंही संशोधकांचं म्हणणं आहे.


अमेरिका आणि युरोपात डेल्मिक्रॉन वाढतोय

अत्यंत वेगाने पसरणाऱ्या या दोन्ही विषाणूंचा प्रादुर्भाव एकाच वेळी होऊ लागला तर कोरोना रुग्णांची संख्या फार झपाट्याने वाढू शकते असा तज्ज्ञांचा दावा आहे.  सध्या डेल्मिक्रॉनचा संसर्ग अमेरिका आणि युरोपात वाढताना दिसत आहे.  


डेल्मिक्रॉनची लाट धोकादायक

डेल्टा आणि ओमिक्रॉन हे दोन्ही व्हॅरिएंट भारतात सध्या अस्तित्वात आहेत. भारतामध्ये ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही २२० च्या पुढे गेली आहे. देशात ओमिक्रॉन किती भयंकर रूप धारण करेल हे सध्या सांगता येणं कठीण आहे. कारण जगभरात ओमिक्रॉनने धुमाकूळ घातला आहे. मात्र, तो अजून किती भयंकर रूप घेईल याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही. दरम्यान, या व्हेरिएंटचा वाढता फैलाव पाहता बुस्टर डोसची मागणी होत आहे. अनेक देशांमध्ये बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत डेल्टा आणि ओमिक्रॉन म्हणजेच डेल्मिक्रॉन किती भयानक रूप धारण करेल, याबाबत काही स्पष्ट सांगता येणार नाही.  डेल्टा आणि ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, आर-नॉट व्हॅल्यू म्हणजेच रुग्ण बाधित होण्याचा दरही वाढताना दिसत आहे. भारतातल्या काही राज्यांमध्ये हा दर ०.८९ पेक्षा अधिक झाला आहे. विषाणूचा संसर्ग झालेली एक व्यक्ती सरासरी किती निरोगी लोकांना आजारी पाडू शकते, हे आर-नॉट व्हॅल्यूवरून समजतं. ही व्हॅल्यू अशीच वाढत राहिली, तर कोरोनाबाधितांची संख्या वेगानं वाढू शकते. या पार्श्वभूमीवर देशात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


दरम्यान, सध्या देशात ओमिक्रॉनची रुग्ण आढळून येत आहेत.


ओमिक्रॉनची लक्षणं काय ?

सध्या ओमिक्रॉनवर आणखी संशोधन सुरू आहे. मात्र, सध्या रुग्णांमध्ये खोकला, सर्दी, थकवा अशी लक्षणं आढळून येत आहेत. तसेच काही रुग्णांमध्ये अंगदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणे, मळमळ वाटणे, उलट्या आणि अतिसार असे लक्षणं दिसत आहेत.


ओमिक्रॉन धोकादायक

नवीन व्हेरिएंटपासून पुन्हा संसर्ग होण्याचा धोका बीटा आणि डेल्टा पेक्षा तीनपट अधिक आहे. दुसऱ्या लाटीस कारणीभूत असलेल्या डेल्टाचे दोन म्युटेशन होते. बेटा प्रकाराचे तीन म्युटेशन होते मात्र, ओमिक्रॉन या प्रकाराचे पन्नासहून अधिक म्युटेशन  शिवाय, ओमिक्रॉन एका व्यक्तीकडून ३० जणांपर्यंत पसरू शकतो.

तज्ज्ञांनी दिला इशारा

ओमिक्रॉनसाठी कुठलाही विशेष उपचार नाही.  कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या एका रुग्णाचा युकेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली आहे. त्यामुळे आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे. दरम्यान, येत्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळतील असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे कोविड नियमांचे पालन करून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!