Just another WordPress site

Dadasaheb Falake : चित्रमहर्षी फाळकेंबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का?

दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह म्हटले जाते. आज हजारो कोटींचा व्यवसाय असलेल्या या उद्योगाची पायाभरणी दादासाहेब फाळके यांनी केली. भारतात पहिला चित्रपट निर्माण केला तो दादासाहेब फाळके या मराठी माणसाने… म्हणूनच भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात त्यांचे योगदान अमूल्य आहे. ज्या काळात सिनेमाचे तंत्रज्ञान, कॅमेरा, वितरण, व्यक्तिरेखा हे शब्द आपल्या गावीही नव्हते, त्या काळात दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली.  दादासाहेब फाळके हे भारतातले पहिले चित्रपटकार, त्यांचा आज जन्मदिन. त्यानिमीत्ताने त्यांच्याविषयी जाणूून घेणार आहोत.

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकार असलेले दादासाहेब फाळके हे  चित्रपट महर्षी म्हणूनही ओळखले जातात. त्याचं  पूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके. पण ते दादासाहेब या नावानेच अधिक प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांचे वडील गोविंदशास्त्री तथा दाजीशास्त्री व मातोश्री द्वारकाबाई. दाजीशास्त्री स्वत: संस्कृत भाषेचे विद्वान आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचे पुजारी होते. त्यामुळे दादासाहेबांचे बालपण धार्मिक वातावरणात व्यतीत झाले. दादासाहेब १२ वर्षांचे असताना दाजीशास्त्रींनी मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेज येथे संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली आणि फाळके कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले. दादासाहेब शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात वाकबगार होते. काही काळ त्यांनी राजा रविवर्मांसोबत कामही केले.
फोटोग्राफर फाळके
पहिल्यापासूनच कलेची आवड असल्यामुळे त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस मधून  एक वर्षाचा चित्रकलेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कलाभवनातून त्यांनी तैलरंगचित्रण, जलरंगचित्रण, वास्तुकला आणि नमुना प्रतिरूपण (मॉडेलिंग) यामध्ये प्रावीण्य मिळवले.  कलेचे प्रचंड वेड असलेल्या फाळकेंनी चित्रकला, वास्तुकला, प्रोसेस फोटोग्राफी अशा अनेक कला आत्मसात करून त्यात विविध प्रयोगही केले. १८९५ मध्ये गुजरातमधील गोध्रा येथे ते फोटोग्राफर म्हणूनही काही काळ कामही करत होते. पण तेथे त्यांचा जम बसला नाही. ते बडोद्याला परतले. नंतर  दादासाहेबांनी १९०३ साली भारतीय पुरातत्त्व खात्यात प्रारूपकार आणि छायाचित्रकार म्हणून नोकरी पतकरली. पण त्यांच्यातला हरहुन्नरी माणूस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.

जादूगार फाळके


बडोद्याला त्यांची ल्युमिएर बंधूंनी नेमलेल्या चाळीस जादूगारांपैकी एक असलेल्या जर्मन कार्ल हर्ट्‌झ याच्याशी त्यांची ओळख झाली. त्या जादूगाराकडून दादासाहेबांनी रासायनिक तांत्रिक, भ्रांतिकृत चमत्कार, पत्त्यांची जादू वगैरे गोष्टी शिकून घेतल्या. प्रोफेसर केळफा  (केल्फा) या नावाने जादूचे प्रयोग दाखवायला सुरुवात केली. दादासाहेबांची एक मजेदार गोष्ट आठवली. एकदा मुंबईला पुण्याहून जाताना खंडाळ्याच्या घाटाजवळ काही तांत्रिक दोषामुळे गाडी बराच वेळ थांबली. लोक कंटाळले होते. दादासाहेबांनी एका प्रवाशाकडून पत्त्याचा एक जोड मिळवला व त्याच्या निरनिराळ्या जादू करून त्यांची भरपूर करमणूक केली. त्यावेळी त्यांना हा जादूगार म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक आहे हे कळले नसेल. आणि फाळकेंनीही त्यांची ओळखही करून दिली नाही. असे ते प्रसिद्धीविन्मुख होते.

फाळके  प्रिंटिंग प्रेस
१९०८ मध्ये त्यांनी लोणावळ्याला ‘फाळके एनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग प्रेस’ ही संस्था सुरू केली. पुढे ती दादरला हलविली. तिचे रूपांतर ‘लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स’ मध्ये
झाले. १९०९ मध्ये दादासाहेब जर्मनीहून तीनरंगी मुद्रणप्रक्रियेचे अद्ययावत तांत्रिक शिक्षण घेऊन भारतात परतले व ही संस्था त्यांनी भरभराटीस आणली. पण व्यवसायातील भागीदारांबरोबर बेबनाव झाल्यामुळे ते वेगळे झाले. यामुळे दादासाहेब उद्विग्न होते.

‘द लाईफ ऑफ ख्राइस्ट’ नं बदललं आयुष्य

याच दरम्यान त्यांनी मुंबईमध्ये  ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित ‘द लाईफ ऑफ ख्राइस्ट’  हा मूक चित्रपट पाहिला आणि त्यांच्या आयुष्यातले ध्यासपर्व सुरू झाले. चलत्‌चित्रच्या निर्मितीप्रक्रयेचा शोध घ्यायला सुरुवात केली.
दादासाहेबांना आलं होतं अंधत्व
दादासाहेबांनी चित्रपट निर्मितीच्या तंत्राचा अथक परिश्रम करून अभ्यास केला. परिणामस्वरूप १९११-१२ च्या काळात अंधत्वही आले होते.  परंतु सुदैवाने, त्यांना मुंबईचे डॉ. प्रभाकर या नेत्रविशारदाने पुन्हा दृष्टी प्राप्त करून दिली.

ध्यासपर्व ‘राजा हरिश्चंद्र’


भारतात स्वदेशी चित्रपटव्यवसाय उभारण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगून शिक्षणाच्या निमित्ताने  लंडन येथे गेलेल्या दादासाहेब यांना त्याठिकाणी चलत्‌चित्र पाहायला मिळाले. असा चित्रपट भारतात आणण्याच्या ध्येयाने झपाटून जाऊन त्यांनी कामाला सुरुवात केली. आपले घरदार विकले, कर्जे काढले आणि सरतेशेवटी त्यांनी  अखेर, ३ मे १९१३ रोजी ‘राजा हरिश्चंद्र’ हा संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला मूकपट तयार केला आणि भारतात चलचित्रांचा आरंभ झाला. फाळकेंच्या ‘राजा हरिश्चंद्र’ चं बजेट त्या काळी १५ हजार रुपये होते असं म्हटलं जातं.


महिलांना चित्रपटात भूमिका


तत्कालीन समाजव्यवस्थेत चित्रपट निर्मिती करताना सामाजिक अडचणींबरोबरच आर्थिक अडचणींनीही असायच्या. चित्रपटात काम करण्यासाठी स्त्री कलावंतासोबतच पुरुष कलावंतही तयार होत नसत. अशावेळी गरज पडल्यास ते स्वत: किंवा कुटुंबियांपैकी कोणीतरी ते उभे करीत. सुरुवातीच्या त्यांच्या चित्रपटातील स्त्री पात्रांच्या भूमिकाही त्यांनी पुरुषांकडूनच करून घेतल्या. पण, महिलांना चित्रपटात काम करण्याची पहिली संधीही दादासाहेब फाळके यांच्यामुळे मिळाली, असंही म्हटलं जातंय. त्यांच्या ‘भस्मासूर मोहिनी’ मध्ये दुर्गा आणि कमला या दोन महिलांनी काम केलं होतं.
कारकीर्दीला उतरती कळा

१ जानेवारी १९१८ मध्ये ‘फाळकेज फिल्मस’चे रूपांतर त्यांनी ‘हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी’ मध्ये केले व त्याच वेळी त्यांच्या कल्पनेत १९१४ पासून असलेले कायमचे चित्रपटनिर्मितिगृहही नाशिक येथे उभारले. त्या संस्थेचे श्रीकृष्णजन्म व कालिया मर्दन हे फाळके दिग्दर्शित दोन्ही चित्रपट यशस्वी ठरले; परंतु त्या चित्रपटानंतर दादासाहेबांचे इतर भागीदारांशी मतभेद सुरू झाले. यानंतरच दादासाहेबांच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली.
नाटककार फाळके
१९१९ अखेर  ते सहकुटुंब मनःशांतीसाठी काशीला निघून गेले. तेथील वास्तव्यात त्यांनी ‘रंगभूमी’ हे नाटक लिहून काढले. त्यांनी लोकमान्य टिळक व दादासाहेब खापर्डे यांनाही त्यातील काही प्रवेश ऐकवले. तथापी, दोन भागांत सादर केल्या जाणाऱ्या त्या सात अंकी नाटकाला व्यावसायिक यश मात्र मिळू शकले नाही.

फाळकेंचा बोलपट
व्यवहार विन्मुखतेमुळे त्यांना कठीन अवस्थेत दिवस कंठण्याची वेळ आली.., तरीही त्याही अवस्थेत वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी कोल्हापूर सिनेटोनसाठी गंगावतरण या कलाकृतीची निर्मीती केली.


हा त्यांचा पहिला आणि शेवटचा बोलपट निर्माण केला. नंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली.
९५ चित्रपट आणि २७ लघुपट
आपल्या देदीप्यमान कारकीर्दीत फाळकेंनी एकूण ९५ चित्रपट आणि २६ लघुपटांची निर्मिती केली. अनेक कला अवगत असल्यामुळे, त्याचा उपयोग त्यांनी चित्रपटनिर्मिती करताना केला. त्यामुळे ते चित्रपट तांत्रिकदृष्ट्या उत्तम असत. त्याकाळी परदेशातही चित्रपट निर्मिती करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवण्यात आला. पण त्या मोहाला बळी न पडता त्यांनी भारतातच चित्रपट निर्मिती केली.  उण्यापुऱ्या १९ वर्षाच्या करिअरमध्ये भारतीय संस्कृतीतील विविध पौराणिक कथा त्यांनी मोठ्या पडद्यावर मांडल्या.

अखेरचा प्रवेश
राजा हरिश्चंद्र या चित्रपटानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. मोहिनी-भस्मासूर, सत्यवान-सावित्री असे चित्रपट केले. लंकादहन या चित्रपटाने त्यांना अफाट यश मिळवून दिले. ‘सेतु बंधन’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. या प्रवासात त्यांनी भरपून पैसा, प्रसिध्दी मिळवली पण, नियतीच्या मनात काही औरच होते. त्यानंतर त्यांना खुप हाल सोसावे लागले. व्ही. शांताराम व इतर सहकार्यांनी त्यांना आर्थिक मदत केली आणि याच आधारावर त्यांनी नाशिकमध्ये घर बांधले. 


आर्थिक विवंचनेतच वयाच्या ७४ व्या वर्षी म्हणजे, १६ फेब्रुवारी १९४४ मध्ये नाशिकमध्ये त्यांचे निधन झाले. भारतीय चित्रपटसृष्टीच्या या जनकाला आदरांजली वाहण्यासाठी १९६९ मध्ये भारत सरकारने ‘दादासाहेब फाळके पुरस्कारां’ची घोषणा केली.

दादासाहेब फाळके यांनी सिनेमासाठी दिलेलं योगदान हे अनन्यसाधारण आहे.  आज चित्रपट व्यवसाय खूप कोटींच्या घरात गेलाय. पण, या  चित्रपटकलेचा वृक्ष लावला होता तो दादासाहेब फाळकेंनी. फाळकेंनी लावलेला चित्रपटकलेचा वृक्ष शतक कधीच पूर्ण केलं. अशा या अष्टपैलू चित्रमहर्षीला मानाचा मुजरा !
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!