Just another WordPress site

Cold । थंडीची लाट म्हणजे काय? ती कधी घोषित केली जाते अन् कुठल्या कारणांमुळे वाढतेय थंडी ?

अर्धा हिवाळा संपला. मात्र, अद्याप पाहिजे तशी थंडी पडत नव्हती. मात्र, दोन दिवसांपूर्वी अचानक वातावरण बदलून कडाक्याची थंडी जाणवू लागली.नागपूरच्या तापमानात तब्बल सहा अंशांची घट झाली असून पारा नीचांकी ७.८ डिग्रीवर आला. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी तडाखा वाढला असून किमान तापमानात चांगलीच घट झाल्यानं शहरे गारठलीत. दरम्यान, महाराष्ट्रात २७ डिसेंबरपर्यंत थंडीची तीव्र लाट कायम राहणार असल्यानं  नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. त्याच निमित्ताने ही थंडीची लाट म्हणजे काय? हवामान खातं ती कशी जाहीर करतं? लाट आली असं कधी म्हटलं जातं?  या विषयी जाणून घेऊया. 



जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांत अतितीव्र थंडीची लाट सक्रिय झाली. त्यामुळे महाराष्ट्रही गारठला. तर  राजस्थानमध्येही अनेक ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेला. मध्य प्रदेशात कडाक्याची थंडी पाहता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस उत्तर-पश्चिम भारतात थंडीची लाट  आणि तीव्र शीतलहरीची स्थिती कायम राहण्याची आणि त्यानंतर कमी होण्याची शक्यता आहे.


राज्यात सध्या स्थिती काय?

उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट तीव्र झाल्यामुळे राज्यातील तापमानात आणखी घट होऊन गारव्यात वाढ झाली.  विदर्भात थंडीची लाट आली असून, बहुतांश भागातील तापमानाचा पारा ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलाय.उत्तर महाराष्ट्रातही काही भागांत तापमानाचा पारा १० अंशांखाली गेला.


रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट

गेल्या दोन दिवसांपासून उत्तरेकडील राजस्थान, पंजाब, चंडीगड, हरियाणा, दिल्ली या राज्यांमध्ये थंडीची लाट आहे. ती सध्या तीव्र झाली असून, मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आणि थेट महाराष्ट्रातील विदर्भापर्यंत त्याचा परिणाम जाणवतोय. उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने ही आपल्याकडे थंडीची लाट आहे. त्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही भागात रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली असून, बहुतांश भागात ते सरासरीच्या खाली आले.


थंडीची लाट म्हणजे काय?

किमान तापमानापेक्षा ज्या दिवशी तापमानामध्ये ४.५ अंश सेल्सिअसपर्यंत घट झाल्यास तो दिवस थंडीचा दिवस होता असं म्हटलं जातं.हवामान खात्याच्या भाषेत अशा दिवसाला थंड दिवस किंवा कोल्ड डे असं म्हणतात. आणि जर एखाद्या दिवशी तापमान साडेचार अंश सेल्सिअसहूनही अधिक घसरलं तर थंडीची लाट आली असं म्हटलं जातं. म्हणजेच उदाहरण घ्यायचं झालं तर नगरचं तापमान हे १२ अंश सेल्सिअस असेल आणि दुसऱ्या दिवशी ते अचानक सात अंशांपर्यंत घसरलं तर त्याला थंडीची लाट आली असं म्हणता येईल. मात्र हेच तापमान १२ अंशांवरुन ९ अंशांवर गेलं तर त्याला थंड दिवस असं म्हणतात.


आता पाहूया कुठल्या कारणांमुळे वाढतेय थंडी,

सूर्यापासून पृथ्वीचे अंतर

सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर हेही थंडीचे कारण आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे तुम्हाला माहित आहे, ज्या कक्षेत पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्या कक्षेत सूर्यापासून पृथ्वीचे अंतर प्रत्येकवेळी सारखं नसते. काहीशा लंबवर्तुळाकार  कक्षेत प्रदक्षिणा घालत असताना एक वेळ अशी येते जेव्हा सूर्यापासून पृथ्वीचे अंतर खूप जास्त होते. या काळात सर्वाधिक थंडी असते. भारताच्या बाबतीतही तेच आहे. कडाक्याच्या थंडीच्या वेळी पृथ्वी फक्त सूर्यापासून दूर असतेच, त्याशिवाय सूर्याची किरणे थेट भारताच्या पृष्ठभागावर पडत नाहीत.


वेस्टर्न डिस्टर्बन्स

दुसरे कारण म्हणजे  वेस्टर्न डिस्टर्बन्स. जेव्हा देशातील हवामान बदलते तेव्हा भूमध्य समुद्र, कॅस्पियन आणि लाल समुद्रावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. या दाबामुळे समुद्रातील आर्द्रतेसोबत हवा फिरू लागते.  ही वादळं आहेत, जे त्यांच्याबरोबर भूमध्य समुद्र आणि अटलांटिक महासागरातून ओलावा आणतात. भारतात पोहोचेपर्यंत यातील हवा खूप थंड झालेली असते. आणि जेव्हा ते हिमालयावर आदळतात तेव्हा उत्तर भारतात हिवाळ्यात पाऊस पडतो. अनेक ठिकाणी गारा आणि बर्फ पडतो. शिवाय वेस्टर्र डिस्टर्बन्समुळे थंडीची लाट येऊन दाट धुके पडण्याची शक्यता असते. ही परिस्थिती अनेक दिवस टिकू शकते.


‘ला निना’मुळे पडते कडाक्याची थंडी 

थंडीच आणखी एक कारण म्हणजे ला निना. ला निना हा एक स्पॅनिश शब्द आहे.  ज्याचा अर्थ लहान मुलगी आहे. पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावर हवेचा दाब कमी असताना ही स्थिती उद्भवते. यामुळे समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात लक्षणीय घट होते. त्यामुळे तिथल्या वारे आणि प्रवाहांचा जगावर थेट परिणाम होताना दिसतो. आणि तोही सरासरीपेक्षा जास्त थंड होतो. हे सगळं घडतं ते व्यापारी वाऱ्यांमुळे. हे वारे उत्तर गोलार्धात ईशान्येकडून तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वाहतात. यादरम्यान, वायव्य भागात तापमान पूर्वीपेक्षा कमी होते, तर आग्नेय भागात हिवाळ्यातही तापमान जास्त राहते. त्याच्या उत्पत्तीची वेगवेगळी कारणे आहेत. मात्र, सर्वात सामान्य कारण म्हणजे जेव्हा व्यापारी वारे म्हणजे, पूर्वेकडून वाहणारा वारा खूप वेगाने वाहत असतात. यंदाही ला-निनाचा प्रभाव जाणवेल असं सांगण्यात येतेंय. परिणामी भारताचा विचार करता उत्तरेकडील राज्यांत यंदाचा हिवाळा कडक असेल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.

हवामान खात्याकडून वेगवेगळ्या स्तरावरील सतर्कतेचे इशारे दिले जातात.  मध्य प्रदेशात थंडीची लाट आणि कडाक्याची थंडी पाहता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला तर  उत्तराखंडला १८ डिसेंबर ते २१ डिसेंबरदरम्यान यलो अलर्ट  देण्यात आला होता. मात्र, हे यलो अलर्टचा किंवा रेड अलर्टचा अर्थ काय होतो?  तेे पाहूया. 

१. ऑरेंज अलर्ट म्हणजे तयार राहा. 

२. यलो अलर्ट म्हणजे हवामान बदलावर लक्ष ठेऊन राहा, अपडेट घेत राहा.

३. ग्रीन अलर्ट म्हणजे तो संबधीत विभाग सुरक्षित झोनमध्ये आहे. 

४. रेड अलर्ट म्हणजे सर्व यंत्रणांनी तातडीने सावध होत काहीतरी कृती करणं गरजेचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!