Just another WordPress site

Chitrarath : चित्ररथ ठरवण्याची प्रक्रिया कधी सुरू होते आणि कोण सहभागी होऊ शकते?

गेल्या काही वर्षांपासून प्रजासत्ताक दिनी  सादर करण्यात येणाऱ्या चित्ररथावरुन वाद सुरू आहेत. यावेळीही, बंगाल,  केरळ  आणि तमिळनाडू राज्याने प्रजासत्ताक दिनी त्यांच्या राज्यांच्या चित्ररथाचा समावेश न केल्याने राजकीय पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. चित्ररथ नाकराल्याने आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये चित्ररथ कसा निवडला जातो. ही प्रक्रिया किती काळापूर्वी सुरू होते? या विषयी जाणून घेऊया.



हायलाईट्स

१. बंगाल,  केरळ आणि तमिळनाडूचे चित्ररथ नाकारले 

२. चित्ररथाचा समावेश न केल्याने पक्षपातीपणाचा आरोप 

३. तज्ज्ञ समिती करत असते चित्ररथांची निवड 

४ अनेकदा महाराष्ट्राच्या चित्ररथांची झाली होती निवड 

चित्ररथ निवडण्यातची प्रक्रिया कधी आणि कशी सुरू होते?

संरक्षण मंत्रालयावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी आणि सोहळ्यासाठी जबाबदारी असते. दरवर्षी सप्टेंबरमध्ये, संरक्षण मंत्रालय पुढील वर्षीच्या प्रजासत्ताक दिनासाठी सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालयांकडून चित्ररथांसाठी प्रस्ताव मागवते. संरक्षण मंत्रालयाने ८० केंद्रीय मंत्रालये आणि विभाग, सगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना १६ सप्टेंबर रोजी पत्र लिहून त्यांना सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. पत्रामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागासाठी चित्ररथाचा प्रस्ताव आमंत्रित करण्याची प्रक्रियेबाबत भाष्य केले होते. या वेळी हे प्रस्ताव १० दिवसांत पाठवण्यास सांगण्यात आले होते. प्रस्ताव आल्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून निवड प्रक्रिया सुरू होते.  यंदा २७ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करायचे होते. त्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रस्तावांची निवड प्रक्रिया सुरू झाली.


चित्ररथ कसे निवडले जातात?

चित्ररथ  निवड प्रक्रिया विस्तृत आणि वेळखाऊ आहे. चित्ररथ निवडण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने चित्रकला, शिल्पकला, संगीत, स्थापत्य आणि नृत्यदिग्दर्शन या क्षेत्रातील ‘प्रथितयश व्यक्तींचा’ समावेश असलेली एक समिती स्थापन केली आहे, जी प्रस्तांवांमधून  चित्ररथ निवडते किंवा नाकारते. प्रतिष्ठित व्यक्तींची तज्ज्ञ समिती बहु-स्तरीय प्रक्रियेत चित्ररथाची निवड करत असते. २०२३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राज्ये आणि केंद्रीय मंत्रालयांकडून एकूण ५६ प्रस्ताव प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी २१ जणांना शॉर्टलिस्ट करण्यात आले.


समिती मूल्यांकन कसे करते?

तज्ज्ञ समितीच्या बैठका घेऊन चित्ररथ प्रस्तावांचे मूल्यमापन करते. प्रस्तावासोबत, राज्ये आणि केंद्रीय मंत्रालयांना स्केचेस किंवा डिझाइन पाठवावे लागतात, ज्यांचे मूल्यांकन समितीद्वारे केले जाते. समितीला डिझाइन आवडल्यास, प्रस्तावांचे थ्रीडी मॉडेल लवकरात लवकर सादर करण्यास सांगितले जाते. मात्र, त्यानंतरही निवड निश्चित नाही.  चित्ररथासोबत कोणतेही पारंपारिक नृत्य समाविष्ट केले असल्यास ते लोकनृत्य असावे, अशी समितीची शिफारस असते. त्यांची वेशभूषा आणि वाद्ये पारंपारिक आणि अस्सल असावीत.  चित्ररथामध्ये कोणत्याही लेखी विस्ताराची आवश्यकता नसावी अशीही सूचना केली जाते.   रेखाटन समजण्यास सोपे असावे आणि अनावश्यक तपशील टाळण्यास सांगितले जाते.  चित्ररथाच्या निवडीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यापूर्वी, निवड समिती त्या चित्ररथाचे दृश्य आकर्षण, तपशील आणि त्याचा जनतेवर होणारा परिणाम यांची तपासणी करते. समिती ज्या राज्यांच्या चित्ररथांची निवड करते, त्यांनाच पुढील फेरीची माहिती देते. त्यानंतर सहभागाचे निमंत्रण पत्र दिले जाते.


चित्ररथाचा आकार निश्चित आहे का?

चित्ररथ ४५ फुटांपेक्षा लांब, १४ फुटांपेक्षा रुंद आणि जमिनीपासून १६ फुटांपेक्षा उंच नसावा. संरक्षण मंत्रालय प्रत्येक चित्ररथासाठी ट्रॅक्टर आणि ट्रेलर प्रदान करते, ज्यावर चित्ररथ सहज बसू शकतो. सहभागी राज्ये त्यांची इच्छा असल्यास, संरक्षण मंत्रालयाने प्रदान केलेले ट्रॅक्टर किंवा ट्रेलर इतर वाहनांसह बदलू शकतात. मात्र, एकूण संख्या दोन वाहनांपेक्षा जास्त नसावी.


महाराष्ट्राच्या चित्ररथांनी कधी बाजी मारली? 

महाराष्ट्राच्या चित्ररथांनी २०१५ नंतर दोन वेळा बाजी मारली होती. २०१५मध्ये ‘पंढरीची वारी’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. तर २०१८ रोजी ‘शिवराज्याभिषेक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. या दोन्ही चित्ररथांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. यापूर्वी १९८०मध्येही शिवराज्याभिषेक या विषयावरील चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळाला होता. १९८३ साली ‘बैलपोळा’ या विषयावरील चित्ररथ सर्वोत्तम ठरला होता. त्यानंतर १९९३ ते १९९५ अशी सलग तीन वर्षे अनुक्रमे गणेशोत्सव, शताब्दी, हापूस आंबे आणि बापू स्मृती या चित्ररथांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता.



Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!