Just another WordPress site

भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने १३ आणि १४ ऑक्टोबरला नागपुरात बुद्धीजींची बैठक

नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने देशातील प्रमुख बुद्धीजींची बैठक १३ आणि १४ ऑक्टोबरला नागपुरात आयोजित करण्यात आली आहे.

काँग्रेसचे निवडणूक चिन्ह पंजाचा भारत जोडो यात्रेत वापर करण्यात आलेला नाही. ही यात्रा फॅसिझम, कम्युनलीजम आणि क्रोनि कॅपिटलिझमच्या विरुद्ध असल्याने देशातील बुद्धीजीवींना या यात्रेत सहभागी करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. दक्षिणायन या संस्थेच्या महाराष्ट्राच्या शाखेच्या वतीने या बैठकीत भारत जोडो संदर्भात नागरिकांची भूमिका ही जाणून घेण्यात येणार आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते काश्मीर अशी ३५०० किलोमीटरची भारत जोडो पदयात्रा सुरू झाली आहे. यात्रा सुरू झाली तेव्हा अनेक प्रश्नांची सरबत्तीच सुरू झाली होती. माध्यमांतून आणि समाजमाध्यमांतून विचारले जाणारे प्रश्न तिखट आणि टोकदार होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत काँग्रेसने ‘भारत जोडो’ यात्रेची सुरुवात केली.

आता देशभरच्या जनआंदोलनांमध्ये काम करणारे अनेक जण तसेच बुद्धिजीवी यांनी या यात्रेला पाठिंबा दिला आहे, तिचे स्वागत केले आहे. निरनिराळ्या दिशांनी, वेगवेगळ्या सुरांमध्ये आणि भिन्न वैचारिक भूमिकांमधून केल्या जाणाऱ्या या आवाहनांमध्ये ‘भारत जोडो’ हा मात्र समान धागा आहे. नागपूर येथे आयोजित विचारवंतांची बैठकही याचाच एक भाग आहे.

नागपूरच्या काँग्रेसनगर येथील धनवटे कॉलेजमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ऑक्टोबर रोजी या बैठकीत ज्येष्ठ साहित्यिक गणेश देवी, प्रसिद्ध विचारवंत योगेंद्र यादव, राम पुनियानी आणि गुरुदीप सप्पल हे विचारवंत उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसने नेते एस. के. पाटील या बैठकीत सहभागी होतील.

दुसऱ्या दिवशी १४ ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर, दिग्विजय सिंग माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश , सलमान खुर्शीद यांच्यासह डॉक्टर गणेश देवी, योगेंद्र यादव आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील. या दोन दिवसाच्या बैठकीचा अहवाल तयार केला जाणार आहे. आतापर्यंत भारत जोडो यात्रेत प्रगतिशील नागरिक, सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. त्यामुळे यात्रा नऊ नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होत आहे. त्यामुळे त्यातील यात्रेकरूसोबत संवाद साधणे आवश्यक आहे, असे दक्षिणायन या संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!