Just another WordPress site

Bhopal Air Leak Accident । भोपाळ वायू गळती : २ डिसेंबर १९८४ च्या रात्री काय घडलं होतं? वाचाल तर हादराल…

मध्यप्रदेश मधील भोपाळ शहरात  २ आणि ३ डिसेंबर १९८४ रोजी एक वेदनादायक दुर्घटना घडली होती.  युनियन कार्बाइड कंपनीच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती झाली आणि पाहता पाहता अख्यं शहर गुदमरलं. या दुर्घटनेत १५ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. आणि जे वाचले त्यांना अनेक प्रकारचे शारीरिक अपंगत्व आणि अंधत्व आले. आजही या ठिकाणी शारिरीक अपंगत्व किंवा दोष असलेली बालके जन्माला येतात. दुर्घटना घडून ३७ वर्षे  गेली मात्र त्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना ठरली. आज राष्ट्रीय प्रदूषण दिवस आहे. भोपाळ दुर्घटनेत घटनेत बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. ही घटना रोखली जाऊ शकत होती का? काय घडलं त्या रात्री? या विषयी जाणून घेऊ.



काय घडलं होतं त्या रात्री?



२ डिसेंबर १९८४ सालची हिवाळ्यातील थंडीची रात्र होती, लोक शांतपणे झोपले होते. रात्री झोपलेल्या हजारो लोकांना याची कल्पनाही नव्हती, की ही काळरात्र ठरणार आहे.  युनियन कार्बाइड कारखान्यात कर्मचारी आणि मजूर नेहमीप्रमाणे प्लांट परिसरात त्यांचे काम करत होते. भोपाळमधल्या युनियन कार्बाईडच्या प्लांट – सीमध्ये पहाटेच्या सुमारास गॅस गळती सुरू झाली. मिथाईल आयसोसायनाइट वायूचा पाण्याशी संपर्क आल्यानं ही घटना घडली.  रासायनिक प्रक्रियेमुळे टँकमध्ये दाब निर्माण झाल्याने टाकी लीक झाली. त्यातून वायू गळती होऊ लागली. हा विषारी वायू वाहत्या वाऱ्यासोबत हा गॅस शहरात पसरला आणि गाढ झोपेतले बेसावध लोक श्वास घ्यायला तडफडू लागले.  कारखान्याच्या जवळ असणाऱ्या झोपडपट्टीला याचा सगळ्यात जास्त फटका बसला. कामाच्या शोधात दूरवरच्या गावातून येऊन या झोपडपट्टीत राहिलेल्या कामगारांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा जीव, या वायू गळतीमुळे गुदमरला. 



या झोपडपट्टीतल्या बहुतेकांचा झोपेतच जीव गेला. सरकारी आकडेवारीनुसार या दुर्घटनेनंतर काही तासांमध्येच जवळपास ३ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र, बिगर-सरकारी स्रोतांनुसार ही संख्या यापेक्षा जवळपास तिप्पट होती. मध्य प्रदेशच्या तत्कालीन सरकारने ३ हजार ७८७ लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली होती, तर इतर अंदाजानुसार दोन आठवड्यांत ८,००० हून अधिक लोक मरण पावले. तर इतर ८ हजार लोक गॅसमुळे पसरलेल्या रोगांमुळे मरण पावले. 


असा होता घटनाक्रम

●  २ डिसेंबर १९८४  रात्री ८  वाजता: युनियन कार्बाइड कारखान्याची नाईट शिफ्ट आली होती, तिथे पर्यवेक्षक आणि कामगार काम करत होते.


● २ डिसेंबर १९८४ रात्री ९ वाजता: भुयारी टाकीजवळील पाइनलाईनच्या साफसफाईच्या कामासाठी सुमारे अर्धा डझन कामगार निघून जातात.


● २ डिसेंबर १९८४ रात्री १० वाजता: कारखान्याच्या भूमिगत टाकीमध्ये रासायनिक अभिक्रिया सुरू झाली, टँकरचे तापमान २०० अंशांवर पोहोचले आणि गॅस तयार होऊ लागला.


● २ डिसेंबर १९८४ रात्री १०.३० वाजता: टाकीतील गॅस पाईपपर्यंत पोहोचू लागला. व्हॉल्व्ह व्यवस्थित बंद होत नसल्याने टॉवरमधून गॅस गळती होऊ लागली.


● ३ डिसेंबर १९८४ दुपारी २३.१५ वाजता: तेथे उपस्थित कर्मचारी घाबरू लागले. व्हॉल्व्ह बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण नंतर अलार्म सायरन वाजू लागला.


● ३ डिसेंबर १९८४ दुपारी १२.५० वाजता: आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना गुदमरणे, खोकला, डोळ्यात जळजळ, पोट फुगणे आणि उलट्या होण्याचा अनुभव येऊ लागला.


● ३ डिसेंबर १९८४ दुपारी १.०० वाजता: पोलिसांना खबर देण्यापूर्वीच चेंगराचेंगरी झाली. पण कारखान्याचे संचालक म्हणाले – गळती झाली नाही.


● ३ डिसेंबर १९८४ दुपारी २.०० वाजता: काही वेळाने रुग्णालयाच्या आवारात अशा रुग्णांची गर्दी झाली होती.


● ३ डिसेंबर १९८४ दुपारी २.१० वाजता: कारखान्यातून अलार्म सायरनच्या आवाजाने लोक घराबाहेर पळत होते आणि त्यांची प्रकृती खालावली होती. संपूर्ण शहरात गॅस पसरला होता.


● ३ डिसेंबर १९८४  दुपारी ४.०० वाजता: झोपेच्या कुशीत असलेले हजारो लोक एका क्षणात विषारी वायूचे रुग्ण झाले होते. दरम्यान, गॅस गळतीवर नियंत्रण आणण्यात आले.


● ३ डिसेंबर १९८४ सकाळी ६ वाजता: पोलिसांच्या वाहनांनी परिसरात ध्वनिक्षेपकाद्वारे इशारे देण्यास सुरुवात केली. हजारो गॅसबाधित लोक एकतर शहरातील रस्त्यावर मरत होते किंवा जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत होते.


मुख्य आरोपीचे अमेरिकेत पलायन

भोपाळ वायू दुर्घटनेनंतर युनियन कार्बाइडचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी वॉरन अँडरसन यांनी रात्रीत भारत सोडला आणि आपला देश अमेरिकेला पलायन केलं.  अँडरसन १९८६ मध्ये निवृत्त झाला. वयाच्या ९२ व्या वर्षी २९ सप्टेंबर २०१४ रोजी त्याचा मृत्यू झाला होता. 

दुर्घटनेचा काय परिणाम झाला?

भोपाळ वायू दुर्घटनेच्या दिवशी एकूण ४० टन मिक गॅसची गळती झाली. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या आकडेवारीनुसार, त्या अपघातात लाखो लोकांना गॅसची बाधा झाली होती, त्यापैकी एकूण २३ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेचा फटका आजही तिथे जन्माला येणाऱ्यांना बसतो. भोपाळ वायू दुर्घटनेनंतर भोपाळमध्ये जन्माला आलेल्या मुलांपैकी अनेकजण अपंगत्व घेऊन जन्माला आले. तर अनेकजण दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या आजाराने या जगात आले. हे भयावह चक्र अजूनही सुरूच आहे आणि इथे अनेक विकृती घेऊन मुलं जन्माला येत आहेत. याशिवाय, भोपाळ दुर्घटना केवळ वायू प्रदूषणाचेच नाही तर जल प्रदूषण आणि जमीन प्रदूषणाचेही उदाहरण बनले. २ डिसेंबर हा दिवस औद्योगिक व्यवस्था आणि त्यामधील मानवी चुकांमुळे होणारे प्रदूषण याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. मात्र, घटनेच्या ३७ वर्षांनंतरही देशात पर्यावरणाबाबत म्हणावी तशी जनजागृती झालेली नाही. त्यामुळे मानवी चुकांमुळे होणारे प्रदुषण टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.


नेमकं काय करता येईल?

जगाला गेल्या काही वर्षांपासून एक समस्या त्रास देतेय. ही समस्या म्हणजे सतत वाढतं प्रदूषण. स्वित्झर्लंडमधील एक संस्था, IQAir (एअर क्वालिटी इंडेक्स) कडून, हवेची गुणवत्ता आणि शहरातील प्रदूषण यांचा अभ्यास केला तेव्हा असे दिसून आले आहे की खराब हवेच्या दहा शहरांच्या यादीत भारतातील तब्बल तीन शहरांचा समावेश होतो. मागील काही दिवसांपासून देशाची राजधानी  राजधानी दिल्लीमधील हवा प्रदुषण पुन्हा एकदा झपाट्याने वाढायला सुरूवात झाली.  प्रत्येक हिवाळ्याच्या ऋतूपूर्वी दिल्लीतील नागरिक विक्रमी प्रदूषणाशी लढा देताना दिसताहेत. देशातील प्रत्येक शहरात वायू प्रदूषणाचे नवीन विक्रम होत आहेत. त्याचा थेट परिणाम लोकांच्या जीवनमानावर होत आहे. प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी व्यापक आणि मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे. त्यासाठी-

१. वाहतूकीची सार्वजनिक साधनं वापरायला पाहीजे. त्यामुळे धूरांचे प्रमाण कमी होईल.

२. हवा दुषित करणाऱ्या बाबींचा वापर टाळायला हवा.  

३. बांधकाम उद्योगात, अशा पद्धती काढून टाकल्या पाहिजेत, ज्यामध्ये वातावरणात धूळ कमीत कमी जाईल.

४. जीवाश्म इंधनाचे पर्याय शोधले पाहिजेत.

 

राष्ट्रीय प्रदुषण दिन आपल्याला आठवण करून देतो की पर्यावरणाला हलक्यात घेणे ही एक मोठी शिक्षा असू शकते. भोपाळ वायू दुर्घटनेनंतर भोपाळमध्ये जन्माला आलेल्या मुलांपैकी अनेकजण अपंगत्व घेऊन जन्माला आले तर अनेकजण दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या आजाराने या जगात आले. हे भयावह चक्र अजूनही सुरूच आहे. अशा औद्योगिक दुर्घटना रोखण्यासाठी कारखान्यातील सुरक्षाविषयक बाबींचे पालन करणे गरजेचे आहे. शिवाय मानवी चुकांमुळे होणारे प्रदुषण टाळण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. भोपाळ वायू दुर्घटनेत या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप जिवांना भावपूर्ण श्रध्दांजली.

हेही वाचा :  सावधान! ‘ही’ आहेत कोरोनाच्या ओमिक्रॉन या जगाला धडकी भरवणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लक्षणे

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!