Just another WordPress site

Bajoriya Vs Khandelwal। अकोल्यात बाजोरिया विरूध्द खंडेलवाल सामना रंगणार! कोण पडणार कुणाला भारी?

विधान परिषदेच्या निवडणुकीत सहापैकी चार मतदारसंघात निवडणूक बिनविरोध झाली. अकोला आणि नागपूर या ठिकाणी मात्र महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात सामना रंगतोय. विधान परिषदेचा अकोला, वाशीम आणि बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ सेनेचा गड म्हणून ओळखला जातो. शिवसेनेच्या  गोपीकिशन बाजोरिया यांनी हॅट्ट्रिक साधली असून पुन्हा चौथ्यांदा ते निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. त्यांच्या विरोधात भाजपने सराफा व्यावसायिक वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी दिल्यानं या निवडणूकीची रंगत वाढली. दरम्यान, या निवडणूकीत कुणाचा विजय होईल, याविषयी मतदार संघात चर्चा रंगल्या आहेत. 



हायलाईट्स

१. बाजोरिया-खंडेलवाल आमनेसामने

२. सध्या खंडेलवाल यांचं पारडं जड 

३. बाजोरिया लढतीत चौकार मारणार का?

४. या निवडणूकीकडे लागलं राज्याचं लक्षं


महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया हे आतापर्यंत भाजप सेना युतीकडून नेहमी निवडून आले. मात्र, यावेळी चित्र निराळं आहे. महाविकास आघाडीकडून गोपीकिशन बाजोरिया लढत आहेत.  तर भाजपकडून अकोल्यातील सराफा व्यावसायिक वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी दिली. हे दोन्ही उमेदवार सक्षम आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. २६ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख होती. मात्र, कुणीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने बाजोरिया आणि खंडेलवाल यांच्यात थेट लढत होते. या उमेदवारीमुळे  गोपीकिशन बाजोरिया यांच्यासमोर अकोल्यातूनच आव्हान उभे राहीलं. गेल्या चार टर्मपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात भाजप – शिवसेना युतीच्या माध्यमातून सदैव सोबत राहिलेली आहे.  मात्र, यावेळी समीकरणे वेगळी असणार आहेत. या मतदारसंघाचा इतिहास लक्षात घेतल्यास उमेदवाराच्या पक्षाचे अधिकृत संख्याबळ अधिक असतानाही तो उमेदवार विजयी होईल, याची कुठलीही गॅरंटी नसते. मागील तीन निवडणुकांमध्ये युतीचे उमेदवार म्हणून बाजोरिया यांनी अधिकृत अल्प मतदार असतानाही चमत्कारिक विजय मिळवले. आता बीजोरिया स्वत: महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. आघाडीतील नेत्यांमध्ये अंतर्गत गटबाजी आणि मतभेद आहेत. त्याचा परिणाम या निवडणुकीवर होऊ नये, याची काळजी बाजोरिया यांना घ्यावी लागणार आहे. दुसरं म्हणजे,  वंचित, अपक्ष आणि इतर मतदार आपल्याकडे वळवण्यावर बाजोरियांचा भर राहिला तर बाजोरियांचा विजय पक्का असू शकतो. असं राजकीय जाणकार सांगतात. मात्र, आतापर्यंत बाजोरिया यांनी केलेल्या काही चुका आणि मतदारांमध्ये असलेली नाराजी हे कुठेतरी या निवडणुकीत कारणीभूत ठरू शकते. तर दुसरीकडे वसंत खंडेलवाल हे पूर्वीपासून संघ परिवाराची जोडलेले आहेत. त्यांची उमेदवारी गडकरी यांच्या कोट्यातील मानली जाते. त्यामुळे एकप्रकारे गडकरींची प्रतिष्ठा यानिमित्ताने पणाला लागली.  दरम्यान, खंडेलवाल हे बैठका घेऊन आपल्या मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रयत्न करताहेत. आतापर्यंतची परिस्थिती पाहता खंडेलवाल यांचं पारडं जड असल्याचं दिसतं. मात्र,  बाजोरिया यांच्या रुपाने शिवसेनेचा बालेकिल्ला भेदण्याचं मोठं आव्हान खंडेलवाल यांच्यापुढे आहे. त्यामुळं  या निवडणुकीत कुणाचे डावपेच कुणावर भारी पडतात,  आणि  विजयाचा गुलाल कुणाच्या खांद्यावर पडतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!