Just another WordPress site

Amit Palekar : गोव्यात ‘आप’चा मुख्यमंत्रिपदाचे चेहरा असलेले अमित पालेकर नक्की आहेत तरी कोण?

गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी अखेर गोव्यातील आपच्या मुख्यमंत्रिपदाच्या आपला चेहरा कोण असणार, याची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी भंडारी समाजाचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी देऊ अशी घोषणा आधीच केली होती. त्यानुसार त्यांनी अखेर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून अमित पालेकर यांच्या नावाची घोषणा केली. अमित पालेकर  या नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं असून त्याचीच सध्या जोरदार चर्चा होतेय.. दरम्यान, अमित पालेकर आहेत तरी कोण? याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. 
हायलाईट्स

१. गोव्यात अमित पालेकर झाले मुख्यमंत्रीपदाचा चेहरा

२. व्यवसायाने वकील असलेले पालेकर समाजकारणात सक्रीय

३. वर्तमानपत्रात उपसंपादक म्हणूनही पालेकरांनी केले काम 

४. पालेकरांनी आजवर अनेक घोटाळे आणले उघडकीस 


अमित पालेकर हे मेरशी येथील असून ते मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले तरी उच्चशिक्षित आहेत. पालेकर यांचे वडील मेरशी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते. तर त्यांची आई मेरशीमध्ये किराणा दुकान चालवत होती. पालेकर यांना घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालेत.. त्यांची आई माजी सरपंच होत्या. त्यामुळे त्यांनी राजकारण जवळून अनुभवलेलं आहे. अशातच आता गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून ते स्वतः राजकारणात सक्रिय आहे. आपमध्ये प्रवेश केल्यानंतर अमित पालेकर हा एक आपचा एक आक्रमक चेहरा म्हणून गोव्यातून समोर आले आहोत. पालेकर हे भंडारी समाजातील असून एक युवा राजकीय नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याचप्रमाणे ते एक गोव्यातील आघाडीचे वकीलही आहे. अत्यंत हुशार, हजरजबाबी म्हणून अमित पालेकर ओळखले जातात. पालेकर यांनी प्राणीशास्त्रात पदवी प्राप्त केली असून त्यांना एमबीए करण्याची इच्छा होती. त्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती आणि त्यावेळी दिल्ली आणि बंगळुरूच्या कॉलेजमध्ये त्याची निवड झाली होती. मात्र, वाढीव ट्यूशन फीमुळे त्यांना तेथे प्रवेश घेणे शक्य झाले नाही. आपल्या मुलाने वकील व्हावे असे त्यांच्या वडिलांचे नेहमीच स्वप्न असल्याने पालेकर यांनी कायदा क्षेत्र निवडले. गोवा विद्यापीठातून त्यांनी घटनात्मक कायदा आणि बौद्धिक संपदा अधिकार या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. गोवा विद्यापीठात असताना, त्यांनी एका वृत्तपत्रासाठी उपसंपादक म्हणून कामंही केले. पुढं  त्यांनी १९९८ मध्ये एका ज्येष्ठ वकिलाच्या हाताखाली कायद्याचा सराव सुरू केला. नंतर २००२ मध्ये जीपीएससी परीक्षेत पात्र ठरले. गुणवत्ता यादीत स्थान मिळवूनही, ते सेवेत रुजू होऊ शकले नाही. कारण त्यांनी अधिकाऱ्यांना लाच देण्यास नकार दिला. पुढं  २००७ मध्ये वडिलांचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर पालेकर यांनी सरकारी नोकरीच्या मागे न धावता कायद्याचा सराव करायला हवा असा विचार केला.  २००७ मध्ये रोटरी क्लब ऑफ पणजी रिव्हिएराचे अध्यक्ष बनले. अनेक घोटाळे आणि बेकायदेशीर बाबी त्यांनी उघड केल्या. सरकारच्या चुकीच्या कृत्यांमुळे त्यांना त्यांचे आरामदायी जीवन मागे सोडले आणि भावी पिढ्यांसाठी गोवा जतन करण्यासाठी ते रस्त्यावर उतरले. स्वार्थ आणि विविध धार्मिक गटांमधील तेढ असताना अमित पालेकर यांनी आपला जीव धोक्यात घालून जुने गोव्याचे वारसास्थळ वाचवले. ओल्ड गोवा हेरिटेज साइटवर बेकायदेशीर बांधकामाचे संरक्षण करण्यासाठी त्यांचे पाच दिवसांचे उपोषण केले होते. त्यांनी केलेल्या उपोषणामुळे बेकायदा बांधकामाला परवाना रद्द करण्याचा आदेश सरकारने दिला होता. याशिवाय,  पालेकर यांनी आरोग्य आणि पीडब्ल्यूडी खात्यातील नोकरीतील घोटाळे उघडकीस आणले होते. ज्यामुळे सरकारला भरती प्रक्रिया थांबवावी लागली होती. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्याबरोबरच त्यांनी जीएमसी विक्रेत्यांच्या हक्कांचीही वकिली केली. पालेकर यांनीच राज्यातील कोविडच्या काळात  रोटरी क्लब ऑफ पणजी रिव्हेरा यांच्यासमवेत सरकारसमोर नव्याने बांधलेल्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये १८५ खाटांची व्यवस्था केली होती. दरम्यान, समाजसेवा करण्यात आनंद मानणाऱ्या पालेकरांनी राज्यात बदल घडवण्यासाठी ‘आप’मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. भंडारी समाजातील पालेकर हे गोव्यातील लोकांसाठी नवीन आशा आहेत. आता आपनं अमित पालेकर यांना सांताक्रूझ मतदारसंघातून उमेदवारी देत आपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून शिक्कामोर्तब केलं.  भंडारी समाज हा गोव्यातील सर्वात मोठा समाज आहे. मात्र, राज्याच्या राजकारणात समाजाला योग्य स्थान मिळालेले नाही. भंडारी समाजातून रवी नाईक हे अडीच वर्षे एकच मुख्यमंत्री होते. सर्वच राजकीय पक्षांनी समाजाचा केवळ व्होट बँक म्हणून वापर केल्याने भंडारी समाजाचा विकास झालेला नाही. दरम्यान,  पालेकर गोव्यात प्रसिद्ध आहेत. व्यवसायाने वकील असले तरी सामाजिक कार्यात ते सक्रिय असतात. यामुळेच गोव्यात लोक त्यांना पसंत करतात. याशिवाय भ्रष्टाचाराबाबत त्यांनी अनेकदा आवाज उठवला. त्यामुळे ते या पदाला अनुकूल असल्याने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून त्यांची निवड करण्यात आल्याचं सांगण्यात येते. दरम्यान, आता ‘आप’नं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जातीय समीकरणांवर नजर ठेवून निवडल्यावर गोव्याची निवडणूक कोणत्या दिशेनं जाते हे कुतुहलाचं असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!