Just another WordPress site

खरिपातील बहुतांश पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. काही पिकांची काढणीपश्‍चात कामे सुरू असून, त्यात मळणी हे अत्यंत महत्त्वाचे काम असते. पारंपरिक पद्धतीमध्ये हाताने झोडून, बैलाद्वारे किंवा पारंपरिक पद्धतीने लोंब्या, ओंब्या किंवा शेंगांतून दाणे वेगळे केले जात. मात्र अलीकडे या कामासाठी यंत्रांचा वापर वाढला आहे. यंत्रामुळे माणसांचे श्रम कमी झाले असून, वेळही वाचत आहे. पूर्वी ज्या कामांना महिन्यांचा कालावधी लागत असे, ती आता काही दिवसांत पूर्ण होत आहे. मळणी यंत्राची (थ्रेशर) कार्यक्षमताही वाढत चालली आहे. अशा वेळी यंत्रांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही वाढलेले दिसते. कोणताही अपघात हा माणसांच्या जीवितहानी (मृत्यू) किंवा जीवितावर कायमस्वरूपी परिणाम करणारा (कायमचे अपंगत्व) असू शकतो. त्यामुळे मळणी यंत्रासोबत काम करताना प्रत्येकाने जागरूक राहून काही खबरदारी घेतली पाहिजे.

 

पीक टाकताना घ्यावयाची काळजी

मळणी यंत्राचा वेग अधिकचा असल्याने त्याला लागलीच पीक हे टाकावे लागते. यंत्रात पीक कमी पडू नये म्हणून शेतकरी अधिक वेगाने पीक टाकण्याचा प्रयत्न करतो आणि तेथेच अडचणी निर्माण होतात. घाईगडबड केली की चूक होते अपघाताचा धोका संभावतो. त्यामुळे यंत्रामध्ये पीक टाकण्यासाठी दोन व्यक्ती नेमायच्या. जेणे करुन अपघात होणार नाही. एका व्यक्तीने खालून पीक उचलून द्यावे आणि दुसऱ्या व्यक्तीने ते मशिनमध्ये टाकावे.

 

नको ते धाडस करु नकात

काही व्यक्ती अधिक उंचीवर उभी राहून किंवा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून थेट यंत्रात पीक टाकण्याचा प्रयत्न करतात. हातांचा वापर करण्याऐवजी पायाने ढकलून पीक ढकलण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी तोल जाण्याचा धोका जास्त असते. पिकासोबत हात किंवा पाय आत खेचला जाऊन अपघात होऊ शकतो. सोयाबीन, हरभरा, मसूर, बाजरी इ. झुडपी पिके मळताना विशेष काळजी घ्यावी. पीकाची मळणी सुरु असताना अनेकदा शेतकरी हाताला जुन्या कापडाचा तुकडा किंवा पोते गुंडाळतात. हे देखील तेवढेच धोक्याचे आहे. कारण यामध्ये कापड, पोते यांचे धागे, पट्टी किंवा लोंबणारे भाग हे यंत्राच्या धुराकडे खेचले जाऊ शकतात. त्यामुळे हात आत जाऊन अपघात होऊ शकतो. हातात रबरी किंवा चामड्याचे हातमोजे घालावेत.

 

कामाचे नियोजन गरजेचे

हंगाम उरकता घेण्याच्य गडबडीत मशिन ऑपरेटर हा सलग काम करतो. त्यामुळे थकवा आलेला असतो. रात्रीच्या वेळी काम सुरु राहिले तर याचा अधिकचा त्रास सहन करावा लागतो. कोणत्याही स्थितीमध्ये थकल्यावर काही काळ तरी विश्रांती घ्यावी. शक्य असल्यास यंत्रावर काम करणाऱ्या व्यक्ती दर काही काळानंतर बदलून आराम देण्याची आवश्यकता असते.

 

यंत्राची योग्य तपासणी आवश्यक

यंत्र सुरू करण्यापूर्वी त्याची तपासणी करून घ्यावी. विशेषतः थ्रेशरच्या आत फिरणारे लोखंडी भाग, ड्रममधील भाग सैल नाहीत, त्यांचे आवाज येत नाहीत ना, घासले जात नाहीत ना, हे लक्षपूर्वक पाहावे. अनेक वेळा सतत होणाऱ्या घर्षणामुळे आग लागू शकते. विजेवर चालणाऱ्या यंत्रा संदर्भात विद्युत तारा, जोड उघडे राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी. या वायरी फार ताणू नयेत. त्यातून अपघात होऊन विजेचा धक्का बसणे किंवा आग लागणे अशा घटना उद्‌भवू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!