Just another WordPress site

व्हेंटिलेटर्स म्हणजे काय? कोरोना रुग्णांवर ते कसं काम करतं?

देशात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा प्रसार झपाट्याने होत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढतोय असून कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या बहुतांश रूग्णांच्या शरीरातील ऑक्सीजनची पातळी कमी होऊन त्यांना रूग्णांना श्वास घ्यायला त्रास झाला होतोय. अशावेळी रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा द्यायचा की थेट व्हेंटीलेटरवर ठेवायचं याचा निर्णय डॉक्टर घेतात. तर व्हेंटिलेटर्स म्हणजे काय आणि ते कोरोना रुग्णांवर कसं काम करतं? व्हेंटिलेटर्स ऐवजी दुसरा पर्याय असू शकतो ? याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. 

सध्या देशात कोरोना व्हायरसं सगळीकडे धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी हॉस्पिटल्समध्ये बेड्सची, रेमडेसिवीर इंजेक्शनची तर काही ठिकाणी व्हेंटिलेटर्सची कमतरता भासत असल्याच्या बातम्या येताहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळीही व्हेंटिलेटर्सची कमतरता अनेक ठिकाणी जाणवत होती. हे जीवरक्षक उपकरण कोरोनाच्या रुग्णांना कशा प्रकारे उपयुक्त ठरतं ते पाहूयात.


व्हेंटिलेटर्स म्हणजे काय?


व्हेंटिलेटरचा अर्थ आहे, एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर श्वास घेण्यासाठी मदत करणारं उपकरण. जेव्हा फुफ्फुसांना काही संसर्ग होतो त्यामुळे पेशंटला श्वास घेता येत नाही, तेव्हा त्या व्यक्तीला व्हेंटिलेटर लावलं जातं. म्हणजेच त्या व्यक्तीचं श्वास घेण्याचं काम व्हेंटिलेटर सोपं करतं. व्हेंटिलेटर हे दोन प्रकारचे आहेत. एक म्हणजे, मेकॅनिकल व्हेंटिलेटर तर दुसरं म्हणजे नॉन इन्व्हॅसिव्ह व्हेंटिलेटर. हॉस्पिटलमध्ये आपण अतिदक्षता विभागात जो व्हेंटिलेटर पाहतो, तो सहसा मेकॅनिकल व्हेंटिलेटर असतो. ते एका ट्यूबद्वारे श्वास नलिकेशी जोडल्या जातेय. हे व्हेंटिलेटर माणसाच्या फुप्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं. तसंच, ते कार्बन डाय ऑक्साइड शरीराबाहेर काढण्याचं कामही करतं. दुसऱ्या प्रकारचं जे  नॉन इव्हॅसिव्ह व्हेंटिलेटर आहे ते श्वासनलिकेशी जोडल्या जात नाही. त्यात तोंड आणि नाक झाकून ऑक्सिजन फुप्फुसांपर्यंत पोहोचवला जातो.


व्हेंटिलेटरचा वापर कधीपासून होतोय?

व्हेंटिलेटरचा इतिहास १९३० च्या दशकाच्या आसपास सुरू होतो. त्या वेळी व्हेंटिलेटरला आयर्न लंग असं नाव देण्यात आलं होतं. तेव्हा पोलिओमुळे जगभरात अनेकांचे प्राण गेले होते. तेव्हा त्यात फार सुविधांचा अंतर्भाव नव्हता. काळानुसार व्हेंटिलेटरमध्ये सुधारणा होत गेल्या आणि अधिकाधिक सुविधा त्यात उपलब्ध होत  गेल्या.


व्हेंटिलेटरची कोणत्या रुग्णांना आवश्यकता असते?



व्हेंटिलेटर आवश्यकता त्या रूग्णांना असते जे रुग्ण स्वतःहून श्वास घेऊ शकत नाहीत. शक्यतो अतिदक्षता विभागात असतात असणाऱ्या रूग्णांना व्हेंटिलेटरच्या साह्याने ऑक्सीजन पुरवला जातो. महत्वाचं म्हणजे, या प्रक्रियेदरम्यान रुग्णाला आधी भूल दिली जाते. त्यानंतरच गळ्यात एक ट्यूब टाकली जाते. त्या ट्यूबच्या साह्यानेच ऑक्सिजन आत जातो आणि कार्बन डाय ऑक्साइड बाहेर येतो. हे उपकरण लावल्यानंतर रुग्णाला श्वास घेण्यासाठी स्वतःला काही प्रयत्न करावे लागत नाहीत. साधारणतः व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या ४० ते ५० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो.  मात्र कोरोनाच्या बाबतीत शास्त्रज्ञ अद्याप काही ठोस निष्कर्ष काढू शकले नाहीत.


व्हेंटिलेटर्सचं काम कसं होतं?

पेशंटची तब्येत जर आणखी खराब झाली तर व्हायरस फुफ्फुसांचं नुकसान करू शकतात. जेव्हा व्हायरस शरीरात घुसतो तेव्हा शरीरातली रोगप्रतिकारक यंत्रणा त्या व्हायरसला ओळखते. रक्तवाहिन्यांचं प्रसरण होतं आणि जास्त प्रमाणात इम्युन सेल्स रीलिज होतात. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये पाणी तयार होतं. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि शरीरातला ऑक्सिजनचा लेव्हल कमी होते. व्हेंटिलेटरमधून फुफ्फुसांमध्ये हवा भरली जाते आणि ऑक्सिजनची लेव्हल वाढायला लागते.

या काळात पेशंटला अशी औषधं दिली जातात. ज्यामुळे शरीरातल्या रेस्पिरेटरी मसल्स शिथील केल्या जातात. म्हणजेच पेशंटचं श्वास घ्यायचं काम ते व्हेंटिलेटर करतं.


व्हेंटिलेटरमुळे रुग्णांना त्रास होतो का?

असं मानलं जातं, की काही विशिष्ट कालावधीनंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेल्या रुग्णाला त्रास होतो. कारण या प्रक्रियेत फुप्फुसात एका छोट्या छिद्रातून खूप शक्तीने ऑक्सिजन आत पाठवला जात असतो. तसंच, व्हेंटिलेटर लावण्याच्या प्रक्रिये दरम्यान न्यूरोमस्क्युलर ब्लॉकरही दिला जातो. त्याचे दुष्परिणाम वेगळेच आहेत. त्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवलेलं असतानाच रुग्णाला औषधंही दिली जातात, जेणे करून शरीरातल्या विषाणूचं प्रमाण कमी होऊ शकेल आणि रुग्णाची फुप्फुसं व्हेंटिलेटरशिवाय काम करू शकतील.


व्हेंटिलेटरला दुसरा पर्याय का?

एका वृत्तानुसार भारतात ४८ हजार व्हेंटिलेटर्स आहेत. खरंतर कोणत्याही देशात किंवा हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर मर्यादित संख्येतच असतात. त्यामुळे २०२० मध्ये जेव्हा व्हेंटिलेटर्सचा तुटवडा भासू लागला, तेव्हापासूनच शास्त्रज्ञ पर्यायी व्यवस्थेबद्दल विचार करत आहेत. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजच्या शास्त्रज्ञांनी श्वास घेण्यास मदत होण्यासाठी एक नवं उपकरण तयार केलं असून, त्याला सी-पॅप डिव्हाइस असं नाव देण्यात आलं आहे.


सी-पॅपचं काम कसं चालतं?



हे ऑक्सिजन मास्क आणि व्हेंटिलेटर यांच्या मधलं उपकरण असून या मशीनच्या माध्यमातून रुग्णाच्या ऑक्सिजन मास्कमध्ये ऑक्सिजन आणि हवा यांचं मिश्रण पोहोचतंय. तोंडातूनच फुप्फुसांपर्यंत ऑक्सिजनची आवश्यक तेवढी मात्रा पोहोचवली जाते. त्यानंतर रुग्ण स्वतःच कार्बन डाय ऑक्साइड बाहेर सोडू शकतो. त्यासाठी रूग्णाला प्रयत्न करावे लागतात. त्यामुळं सी-पॅप हे उपकरण तब्येत प्रकृती बरी असलेल्या आणि त्यातल्या त्यात तरुण रुग्णांसाठी वापरता येऊ शकतं. अर्थात, सध्यातरी याचे प्रयोगच सुरू असून, तेही दुसऱ्या देशांत सुरू आहेत. भारतातल्या त्याच्या वापराबद्दल अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!