Just another WordPress site

भारतातील पहिल्या लोकसभा निवडणूकी विषयीच्या ‘या’ गोष्टी जाणून घ्या

तुम्हाला स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याविषयी ठाऊक असेल. पण पहिल्या लोकसभा निवडणूकीविषयी काही ठाऊक आहे का? नाहीये ना. भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या १९५१ मध्ये  झाल्या. त्यानंतर पहिली लोकसभा  १७  एप्रिल १९५२ मध्ये म्हणजेच आजच्या दिवशी गठीत झाली होती. आज या घटनेला ६९ वर्ष पुर्ण होत आहे. आणि म्हणूनच आज आपण  स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेविषयी जाणून घेणार आहोत.



कधी झाली पहिली निवडणूक?

भारतात १९५० मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. त्यावेळी सुकुमार जैन हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त ठरले. त्यांच्या काळात  प्रथमच मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. यामध्ये १७ कोटी ६० लाख मतदारांची नोंदणी झाली होती. जैन यांच्या काळातच देशातील पहिली निवडणूक २५ ऑक्टोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२ या चार महिन्यांच्या दरम्यान झालीय. ही निवडणूक  ६८ टप्प्यांत झाली.  त्यावेळी एकूण ५३ पक्ष मैदानात होते. लोकसभेच्या ४८९ जागांसाठी ४०१ मतदारसंघात ही निवडणूक घेण्यात आली. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २१ वर्षे वयाची अट होती. पाच महिने चाललेल्या या निवडणुकीत १ हजार ८७४ उमेदवार रिंगणात होते. या निवडणूकीत ३६ कोटी लोकसंख्येमध्ये १७.३ कोटी मतदार होते. त्यातील ४५.७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुका पार पाडण्याचे खडतर आव्हान तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांनी समर्थपणे पेललं होतं.


पहिल्या निवडणुकीत कसं झालं मतदान?


तत्कालीन भारतातील अशिक्षितांचे  प्रमाण पाहता निवडणूका घेणं इतकं सोपं काम नव्हतं. देशात जऴळ जवळ ८५ टक्के जनता अशिक्षित होती. त्यामुळे पाश्चिमात्य देशात लोक पक्षाचे नाव वाचुन मतदान करत असत, तर भारतात मात्र याच्या अगदी उलट होतं. आपल्या देशात पक्षाचे नाव न पाहता लोकांनी पक्षाचे चिन्ह  पाहून मतदान केलं. राजकीय पक्षांची चिन्ह जनतेच्या दररोजच्या व्यवहारातील होती. जसं की बैलांची जोडी, दिवा, झोपडी, हत्ती. या निवडणूकीत आजच्या प्रमाणे त्यावेळी मतपत्रिका नव्हती. प्रत्येक उमेदवाराची वेगळी पेटी असे त्या पेटीवर निवडणुक चिन्ह लावलेलं असे. ते पाहून लोक मतदान करत असत. 


त्यावेळचा देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे निवडणुकीतील चिन्ह बैलं होते.


कॉंग्रेस समोर विरोधी पक्ष कोणता होता?

भारतासारख्या विशाल देशात सुरुवातीलाच जवळ – जवळ ४५०० जागांसाठी मतदान होणार होते. या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस समोर जे. बी. कृपलानी यांचा कृषक मजदूर पक्ष आणि भारत छोडो आंदोलनाचे मुख्य नेते जयप्रकाश नारायण यांची सोशालिस्ट पार्टी यासारखे पक्ष होते. यामध्ये पंडीत नेहरुंचे सुरुवातीचे सहकारी राहिलेल्या श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी भारतीय़ जनसंघांची स्थापना करत नेहरु यांना आव्हान दिले होते. तर दुसरीकडे होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाचे नेतृत्व करत होते.


निवडणुक प्रचार करण्याची पद्धत कशी होती?

निवडणुकी संदर्भात लोकांना माहिती व्हावी म्हणून AIR अर्थात ऑल इंडिया रेडियोवर या निवडणुकी संदर्भात विविध कार्यक्रम प्रसारीत करण्यात आले. 


सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले. नेत्यांनी प्रत्येक घरात पोहोचत प्रचार केला, प्रचार करण्यासाठी सभा घेतल्या. 



भींतीवर, जनावरांच्या पाठीवर राजकीय पक्षाच्या घोषणा, पोस्टर चिटकवले होते. निवडणुकांचे वातावरण तयार झाले होते. कारण जनावरं आणि भिंतींचा राजकीय पक्षांनी या निवडणुकीच्या उत्सवात प्रचारासाठी वापर केला होता.

देशातील पहिलं मतदान


देशात २५ ऑक्टोबर १९५१ ला हिमाचल प्रदेशात चीनी तहसीलमध्ये स्वतंत्र भारताचं पहिलं मतदान पार पडलं. इथं हवामानाचा विचार करता देशात पहिल्यादांच निवडणुका घेण्यात आल्या होत्या. कारण बर्फ पडल्यानंतर या ठिकाणी निवडणुका घेणं शक्य नव्हतं. तर दुसरीकडे देशातील इतर राज्यामधील निवडणुका जानेवारी आणि फेब्रुवारी १९५२ पर्यंत पूर्ण झाल्या. पहिल्या निवडणुकात साधारण ४५ टक्के मतदान झालं.


निवडणूकीत कोणत्या पक्षाने बाजी मारली? 


निवडणुकीत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला. ४८९ जागांपैकी ३६४  जागा काँग्रेसने जिंकल्या. 


बहुमतासाठी २४५ जागांची गरज होती. सीपीआय हा १६  जागा मिळवून दुसऱ्या स्थानावर होता. तर १२ जागा मिळवणारी जयप्रकाश आणि डॉ लोहिया यांची सोशलिस्ट पार्टी तिसऱ्या स्थानावर होती.  तर आचार्य कृपलानी यांच्या नेतृत्वाखालील कृषक मजदूर पार्टीला ९, हिंदू महासभेला ४, श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जनसंघाला ३, रिवोल्यूशनरी सोशालिस्ट पार्टीला ३ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनला २ जागा मिळाल्या. विशेष म्हणजे या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी १६ टक्के मते मिळवली होती.


डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव 


राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस पक्षाशी फारकत घेऊन आपला शेल्ड्यूल्ड कास्ट फेडरेशन पक्ष स्थापन केला. त्याची झळ त्यांना पहिल्याच निवडणूकीत बसली. या पहिल्याच निवडणूकीत त्यांना दूध विक्रते  नारायण काजरोलकर यांनी हरवले. काजरोलकर यांना देशात असलेल्या कॉंग्रेसच्या वातावरणाचा फायदा झाला होता. विशेष बाब म्हणजे काजरोलकर यांच्यासाठी नेहरुंनी सभा देखील घेतल्या होत्या. 


या निवडणुकीतील आव्हाने

– समाजात निवडणुकीबाबत जागरुकता नव्हती.

– अशिक्षितांचे प्रमाण जास्त.

– २१ वर्षांवरील मतदारांची नोंदणी करण्याचे मोठे आव्हान होते.

– मतदारांची माहिती मिळवताना अधिकाऱ्यांना अनेक अडचणी आल्या.

– महिला स्वतःची ओळख न सांगता अमक्याची मुलगी, अमक्याची बायको अशी ओळख देत.

– जनतेला निवडणूक प्रक्रिया समजावणं  मोठं  आव्हाण होतं. 

– मर्यादीत साधने असल्याने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणणे कठीण होते.

पहिल्या निवडणुकीत  या आहेत खास गोष्टी

– प्रत्येक मतदान केंद्रांसाठी स्वतंत्र बॅलेट पेपर बॉक्सची सुविधा उपलब्ध होती.

– मतदाराला कोणत्याही मतदान केंद्रावर आपलं मत बॉक्समध्ये टाकण्याचं स्वातंत्र्य होतं.

या निवडणूकीमुळे स्वतंत्र झालेल्या देशातील जनतेनं आपल्या लोक प्रतिनिधींना निवडून दिलं आणि लोकशाही पर्वाचा उदय झाला. आता ही लोकशाही टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!