Just another WordPress site

बौद्धिक संपदा म्हणजे काय; बौद्धिक संपदेचं पेटंट कसं मिळवायचं?

दिवसेंदिवस जगासह भारतातही वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवीन संशोधन होत आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत आपण केलेल्या संशोधनाचा बौध्दीक संपदा अधिकार म्हणजेच इंटलेक्‍च्युअल प्रॉपर्टी राईट्स मिळवण्यात मागे पडतो. अगदी गाव पातळीवरील संशोधन वृत्तीची सामान्य माणसं देखील कुठलं तरी संशोधन केल्याची बातमी तुम्ही वृत्तपत्रात वाचली असेल. पण, त्या संबंधित व्यक्ती त्याचं पेटंट घेतात का, तर बहुतेकदा त्याचं उत्तर हे नकारात्मकचं असते. याची अनेक कारणं आहेत. तर इंटलेक्‍च्युअल प्रॉपर्टी म्हणजे काय? पेटंट कसं मिळवलं पाहीजे ? इंटलेक्‍च्युअल प्रॉपर्टी राईट्सचा नेमका हेतू काय? याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.



बौद्धिक संपदा अधिकार म्हणजे काय?


इंटलेक्‍च्युअल प्रॉपर्टी अर्थात, बौद्धिक संपदा म्हणजे बुद्धिरूपातील संपत्ती. जसा आपला आपल्या वस्तूंवर, मालमत्तेवर हक्क असतो, तसाच हक्क हा बुद्धिमत्तेने निर्मिलेल्या गोष्टींवर देखील असतो. यासाठी जगभरात बौद्धिक संपदा आणि तिचे स्वामित्व याची चळवळ निर्माण झाली. जेंव्हा एखादी व्यक्ती किंवा संस्था आपल्या बुद्धीचा वापर करून एखादी निर्मिती करते, तेंव्हा त्यानिर्मितीवर मर्यादित काळापुरती तिला प्राप्त झालेली मक्तेदारी म्हणजे बौद्धिक संपदा अधिकार. आज अनेक हस्तलिखिते, डिझाईन्स, नव्याने निर्मिलेले तंत्रज्ञान, वस्तूंचे आकार, नवं संशोधन, कल्पना अशा अनेक गोष्टी या बौद्धिक संपदेच्या आधारावर तयार झालेल्या गोष्टी म्हणून ओळखल्या जातात. त्या निर्मितीच्या प्रकारावरून बौद्धिक संपदा हक्क वेगवेगळ्या प्रकारचे असतात.  


बौद्धिक संपत्ती अधिकारांमध्ये पेटंट, कॉपीराइट, औद्योगिक डिझाइन अधिकार, ट्रेडमार्क, पिकांच्या वाणांवरील अधिकार, व्यावसायिक दृश्यमानं, भौगोलिक निर्देशांक तसेच व्यावसायिक गुपिते यांचा समावेश होतो.


पेटंट कशाला असते?


एखाद्या उत्पादनाच्या शोधासाठी शोधकर्त्यांना ठरावीक कालावधीसाठी त्याच्या उत्पाद, विक्री, आयातीस प्रतिबंध किंवा वगळण्याचा अधिकार देण्यात येतो. पेटंट प्राप्त करण्यासाठी लावलेल्या शोधातून औद्योगिक उत्पादन करण्याची क्षमता असणे आवश्यक असते.


कॉपीराइट कशाला असते?



कला क्षेत्रातल्या एखाद्या केलेल्या सुंदर कलाकृतीच्या निर्मितीवर यात साहित्य, चित्र, शिल्प, संगीत, नाट्य किंवा चलचित्र यावर त्यांच्या निर्मात्याला, लेखकाला कॉपीराईट  मिळत असतो. भारत सरकारच्या 1962 च्या कॉपीराइट  ऍक्ट नुसार त्यांंना कायदेेेशीर हक्क प्राप्त होत असतात. अर्थात,  हा अधिकार सर्जनशील, बौद्धिक किंवा कलात्मक स्वरूपाच्या नवनिर्मितीस लागू होतात. पण कोणतीही संकल्पना किंवा माहिती यांवर नव्हे तर त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण मांडणीसाठी हे अधिकार देण्यात येतात.


औद्योगिक डिझाइन कशाला असते 

औद्योगिक डिझाइनला रचना अधिकार असं देखील म्हणतात. औद्योगिक डिझाइनमध्ये सौंदर्यमूल्य असलेली रंग, रंगांची व आकारांची वैशिष्टय़पूर्ण रचना, आकार, कॉन्फिगरेशन, त्रिमितीय रचना असते. एक उत्पादन, औद्योगिक वस्तू किंवा हस्तकला निर्मितीसाठी दोन व त्रिमितीय रचना उत्पादन आकर्षक करण्यासाठी वापरण्यात येते. या डीझाईनची कॉपी किंवा नक्कल कुणालाही करता येत नाही. आणि कुणी चोरी किंवा नक्कल केल्यास कायदेशीररित्या त्यावर दावा ठोकता येतो.


ट्रेडमार्क कसा असतो?

विशिष्ट व्यावसायिक, उत्पादक किंवा सेवांची इतर उत्पादनांपेक्षा वेगळी ओळख निर्माण करणारं एक ओळखण्यायोग्य चिन्ह म्हणजे ट्रेडमार्क. उत्पादनाची ओळख पटवणारे एखादं व्यापार चिन्ह, ब्रॅण्डनेम किंवा उत्पादनाची ओळख बनलेलं एखादं घोषवाक्य असेल तर यावर त्या उत्पादनाला ट्रेडमार्क मिळत असतो. या ट्रेड मार्कला दुसऱ्या कुणालाही वापरता येत नाही.  


पिकांच्या वाणांवरील अधिकार

पिकांच्या वाणांवरील अधिकारांना पीक संवर्धकांचा अधिकार असंही म्हणतात. पिकांचं नवं वाण शोधणाऱ्या संशोधकास त्याच्या वाणावर आणि उत्पादनावर काही कालावधीसाठी अनन्य अधिकार देण्यात येतो. यामध्ये पिकाचे बियाणे, टिश्यू कल्चर, फळे, फुले, इतर भाग या सर्वावर शोधकर्त्यांचा अनन्य अधिकार असतो.


व्यावसायिक दृश्यमाने यांनाही बौध्दीक संपदाचे अधिकार मिळतात

एखाद्या उत्पादनाच्या दृश्य स्वरूप, बांधणी, रचना, वेष्टने ज्यावरून त्या उत्पादनाची ओळख पटते अशा दृश्य वैशिष्टय़ांचा यामध्ये समावेश होतो. समान दृश्यमानामुळे मूळ उत्पादनाऐवजी नकली उत्पादन विकले जाऊ नये यासाठीही हे अधिकार देण्यात येतात.


बौद्धिक संपदा अधिकार कायद्यांचे हेतू

–  बौद्धिक संपदा निर्मात्यांच्या निर्मितीवरील नैतिक आणि आर्थिक हक्कांना कायदेशीर अभिव्यक्ती प्रदान करते.

–  सर्जनशीलता आणि प्रयोगशीलतेचे संरक्षण करणं हा देखील बौद्धिक संपदा अधिकार कायद्यांचा हेतू आहे.

–  बौद्धिक संपदांची निर्मिती करण्यास प्रोत्साहन देणं आणि त्यांचा वापर, प्रसार आणि योग्य व्यापार यांच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न करणे.


बौद्धिक संपदा अधिकारांचे फायदे काय?

बौद्धिक संपदेच्या मालकाने तिच्या वापराचे नियंत्रित हक्क घेऊन एखाद्या व्यक्तीला दिले तर तिच्या प्रस्तावित उत्पादनासाठी तिला गुंतवणूकदार मिळतो. तर गुंतवणूकदारास एक नावीन्यपूर्ण उत्पादन बाजारात आणून त्यातून नफा कमावता येतो. अशा प्रकारे त्याचा दोघांनाही यातून आर्थिक फायदा होतो. शिवाय, नवं संशोधन, नवी उत्पादने आणि नव्या प्रणाली यांच्या माध्यमातून आर्थिक विकासास चालना मिळत असते. त्या दृष्टीने बौद्धिक संपदेचे देशांच्या आर्थिक विकासातही फायदा होतो.


पेटंट कसं मिळवायचं?

तुम्ही एखादं संशोधन केलं की त्याची नोंदणी तुम्हाला ipindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन करता येतेय. वेबसाईटवर फॉर्म नंबर १,२ व ३ मध्ये आपल्या संशोधनाची संपूर्ण माहिती भरावी लागते. माहीती भरल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळतो. हा रेफरन्स मिळाल्यानंतर तुम्ही सादर केलेल्या माहितीचे परीक्षण करण्याची प्रकिया सुरू होते. संस्थेचे परीक्षक त्याचे ऑनलाईन परीक्षण करतात. त्यात काही त्रुटी असतील, अडचणी असतील तर आपल्याला ऑनलाईन कळवण्यात येतात. त्या त्रुटी पूर्ण करण्याची संधी दिली जाते. ही सर्व प्रक्रिया तीन ते चार वर्षे चालते. यासाठी फक्त ५,६०० रुपये शुल्क आकारले जाते. एखाद्याला ही प्रकिया कमी वेळात करायची असेल तर त्यासाठी मात्र विशेष शुल्क भरावे लागतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!