Just another WordPress site

दोन मिनिटाला एक बळी घेणाऱ्या रोगाबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का?

मलेरिया या साथीच्या आजारानं आजवर जगभरात अनेकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे अवघ्या जगानं एकत्र येत मलेरिया आजाराचं पूर्ण उच्चाटन करण्याचा निर्णय घेतला. मलेरिया या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २५ एप्रिल हा दिवस जगभरामध्ये जागतिक मलेरिया दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, अद्यापही या आजाराबद्दल पुरेशी जनजागृती झाली नसल्याचं तज्ञांचं मत आहे. त्यामुळं मलेरिया नेमका कशानं होतो? मलेरियाची लक्षणं काय आहेत? त्याच्यावर काय उपाय आहेत? याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.



खरंतर मलेरिया हा टाळता येण्याजोगा आणि पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार आहे. मात्र, मलेरिया असं नुसतं नाव जरी उच्चारलं तरी अनेकांना आजही धडकी भरते. त्याला कारणंही तशीच आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दर दुसऱ्या मिनिटाला मलेरियानं एका मुलाचा मृत्यू होतो तर जगात दरवर्षी  ३० ते ५० कोटी नागरिकांना मलेरिया होतो. हा आजार विषाणूंपासून संक्रमित होतो. या जीवघेण्या आजारासाठी कारणीभूत असणाऱ्या डासांच्या उत्पत्तीस उष्ण वातावरण आणि भरपूर पर्जन्यमान अनुकूल असते. त्यामुळे उष्णकटीबंधातील देशांत मलेरियाचा प्रादुर्भाव अधिक असतो. भारतातही मलेरियाचा प्रादूर्भाव अधिक आहे. त्यामुळं आपण या आजारापासून वाचण्यासाठी काळजी घेतली पाहीजे. 


काय आहे जागतिक मलेरिया दिनाचा इतिहास?



जागतिक मलेरिया दिन हा २५ एप्रिल रोजी साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने २००८ मध्ये सर्वप्रथम जागतिक मलेरिया दिन साजरा केला होता. त्यापूर्वी २५ एप्रिल हा दिवस केवळ ‘आफ्रिकन हिवताप दिवस’ म्हणून ओळखला जायचा. मलेरिया या साथीच्या आजारानं आजवर जगभरात अनेकांचा बळी घेतला. त्यामुळे अवघ्या जगानं एकत्र येत मलेरिया आजाराचं संपूर्ण उच्चाटन करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळें जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो.  २००७ या वर्षाच्या मे महिन्यात भरलेल्या ६० व्या जागतिक आरोग्य परिषदेत हा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती. या परिषदेला उपस्थित असलेल्या ४४ देशांनी एकमुखाने ही घोषणा केली होती.

जागतिक मलेरिया दिन २०२१ ची थीम काय आहे?

मागच्या वर्षी मलेरिया दिना निमित्त Zero malaria starts with me अशी थीम घेण्यात आली. तर यावर्षी zero maleria target अशी थीम असून मलेरिया संपविण्यासाठी Zero malaria starts with me या विचाराला चालना देणं हा या संकल्पनेचा हेतू आहे. मलेरिया उच्चाटनासाठी राजकीय, सामाजिक पातळीवर येकत्र येणं, त्यासाठी अजेंडा तयार करणं हा या संकल्पनेचा हेतू आहे.


मलेरियाचा काय लक्षणं आहेत ?

ताप, डोकेदुखी आणि थंडी वाजणे, ही मलेरियाची प्राथमिक लक्षणं आहेत. मलेरियाचा डास चावल्यानंतर १०-१५ दिवसात ही लक्षणं दिसतात. ही लक्षणं कधीकधी सुप्त किंवा कमी तीव्रतेची असतात आणि चटकन लक्षात येत नाही. मात्र, त्यावर २४ तासात उपचार घेतले नाही जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. याशिवाय घाम येणं, मळमळणे व उलट्या होणे ही सगळी मलेरियाची लक्षणं आहेत.


मलेरिया कोणत्या डासामुळे होतो?



मलेरिया हा आजार एका विषाणूच्या संक्रमणानं होत असून हा प्लाझमोडीयम नावाच्या पॅरासाईटमुळे होतो. एनाफिलीस या डासाची मादी या पॅरासाईटची वाहक म्हणून काम करते. अॅहनोफिलिस (मादी) या जातीचा डास चावल्याने, त्यांच्याद्वारा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात आणि मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. ‘प्लाझमोडीयम फाल्सिपेरम’, ‘प्लाझमोडीयम वायवॅक्स’, ‘प्लाझमोडीयम ओवेल’ आणि ‘प्लाझमोडीयम मलेरिये’ हे चार प्रकारचे पॅरासाईट मलेरियास कारणीभूत असतात. यातील ‘प्लाझमोडीयम वायवॅक्स’ हा प्रकार सर्वाधिक प्रमाणात आढळतो. मात्र ‘प्लाझमोडीयम फाल्सिपेरम’ सर्वाधिक मृत्युस कारणीभूत असतो.


मलेरियाचा सर्वाधिक धोका कुणाला?

पाच वर्षांखालील मुलांना मलेरिया होण्याचा सर्वाधिक धोका असतो. २०१७ साली जगभरात मलेरियानं झालेल्या मृत्यूंमध्ये तब्बल जवळपास ६१ टक्के प्रमाण हे पाच वर्षांखालच्या मुलांचं होतं. याशिवाय गरोदर महिला आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांनाही मलेरिया होण्याची शक्यता अधिक असते.


मलेरियाचं निदान कसं करता येईल?

मलेरियावर उपचार करून तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. मायक्रोस्कोप किंवा रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट या दोन पद्धतीने पॅरासाईटवर आधारित निदान करता येतं. या पद्धतीने अर्धा तास किंवा त्याहूनही कमी वेळेत एखाद्याला मलेरिया आहे किंवा नाही, याचं खात्रीशीर निदान करता येतं. मलेरियाच्या उपचारासाठी आरटेमिसिनिन या औषधा किंवा त्याच्या संयुगाचा सर्वाधिक वापर होतो.


प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण काय करू शकतो?

मलेरियापासून संरक्षणाचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे डासांपासून बचाव करणाऱ्या जाळीचा  वापर आणि घरात डासांसाठीचा स्प्रे वापरणे. जाळीमुळे डांसाचा थेट संपर्क टाळता येतो. 



तर IRS मध्ये घरात किंवा इमारतीत कीटकनाशकांची फवारणी केली जाते. वर्षातून एक किंवा दोन वेळा अशी फवारणी करता येते. 



शिवाय, डास चावू नये यासाठी अंगाला वेगवेगळ्या क्रीम लावणे, घरातील डासांचा नायनाट व्हावा यासाठी लिक्वीड, उदबती यांचा वापर करणे, मच्छरदाणी वापरणं, याला प्राधान्य दिलं पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!