Just another WordPress site

जागतिक पुस्तक दिन कसा आणि का साजरा केला जातो? जाणून घ्या…

जगप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, कवी विल्यम शेक्सपिअर यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस युनेस्को आणि अन्य संस्था जगभरात वाचक दिन, पुस्तक दिन आणि कॉपीराइट दिन म्हणून साजरा करतात. या दिवसाचं महत्व आणि इतिहास काय? जगभरात हा दिन कशा पध्दतीने साजरा केला जातो? वाचन संस्कृती रूजावी यासाठी आपण काय करायलं हवं, कॉपीराईट म्हणजे काय? याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.



जर तुमच्याकडं दोन रूपये असतील तर एक रूपयाची रोटी घ्या आणि एक रूपयाचं पुस्तक घ्या. रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला जगावं कसं ते शिकवेल, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. 


यावरून वाचनाची ताकद आपल्या लक्षात येते. शिक्षणातूनही कळत नाहीत अशा अनेक जीवनोपयोगी गोष्टी वाचनातून कळतात. आपल्याला जगणं शिकवून जातात. वाचनानं ज्ञानप्राप्ती, मनोरंजन, बौध्दिक आणि मानसिक विकास अशा अनेक गोष्टी साध्य होतात. एकदा वाचनाची गोडी लागली की ही वाचनाची भूक दिवसेंदिवस वाढत जाते. आणि मग वाचनाचं व्यसन लागत जातं.  वाचनाचं व्यसन लागणं कधीही चांगलंच. आज इंटरनेटच्या युगात कोणतीही माहिती एका क्लिकवर आपल्याला उपलब्ध होतेय. पण आजच्या युगातही पुस्तकांचं योगदान हे अमूल्य असून पुस्तकांचं स्थानही अबाधित आहे.


जागतिक पुस्तक दिनाचा इतिहास काय आहे?

UNESCO ने १९९५ मध्ये २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केला. तेव्हापासून जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन दरवर्षी २३ एप्रिल रोजी साजरा केला जातो. महान लेखक शेक्सपिअर तसेच इतरही अनेक नामवंत लेखकांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी हा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.


 UNESCO तर्फे नामांकन करून, ठराव मांडून एक शहर एका वर्षासाठी  ‘World Book Capital म्हणजेच ‘जागतिक पुस्तक राजधानी’ म्हणून निवडण्यात येत असते. आणि त्यानिमित्ताने वर्षभर तेथे अनेक उपक्रम राबवण्यात येतात. २०२० साठी मलेशियाची राजधानी असलेलं क्वालालंपूर शहराची ‘जागतिक पुस्तक राजधानी’ म्हणून निवड झाली होती. तर, दिल्ली शहर २००३ साली ‘जागतिक पुस्तक राजधानी’ होते.


२३ एप्रिललाच का साजरा होतो पुस्तक दिन?

विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हंटिस आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, युनेस्कोने २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केला. हा दिवस पहिल्यांदा २३ एप्रिल १९२३ रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला. स्पेनमध्ये मिगेल डे सर्व्हांटिसच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोची सर्वसाधारण सभा झाली, ज्यात जगभरातील लेखकांना आदर आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पुस्तकांमध्ये रस निर्माण करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला.

जागतिक पुस्तक दिवस २०२१ थीम काय आहे?

दरवर्षी, जागतिक पुस्तक दिनाची एक विशिष्ट थीम असते. २०२० साली ‘ज्ञान देण्याबरोबर पुस्तकांमध्ये मनोरंजन करण्याची अद्वितीय क्षमता आहे’ हा विषय मध्यवर्ती होता. पुस्तके आपल्याला ज्ञान देतात, यात शंकाच नाही, परंतु पुस्तकांमध्ये बर्‍याच मनोरंजक गोष्टी देखील वाचायला मिळतात. ती आपले मनोरंजन देखील करतात. आपली भाषा देखील पुस्तकाद्वारे सुधारते, हे या थीम मधून सुचित करण्यात आलं होतं. तर, यंदाची थीम आहे, शेअर अ स्टोरी… जागतिक पुस्तक दिनाचं निमित्त साधून आपण आपली गोष्ट इतरांना सांगायची आहे.


कॉपीराइट म्हणजे काय?



कॉपीराइट कायदेशीर बाब असून एखाद्या रचनेचा मूळ लेखक किंवा निर्मात्याचे त्या रचनेवर मर्यादित काळासाठी विशिष्ट हक्क असतात. ज्या कंपनीस किंवा ज्यास तो ते वापरण्याचे अधिकार देतो, ती व्यक्ती ही रचना व्यावसायिक किंवा इतर कारणांसाठी वापरू शकते. कधीकधी निर्माता प्रकाशन संस्थेशी करार करतो. नंतर कॉपीराइटचा अधिकार एका विशिष्ट प्रकाशनाकडे जातो. त्या प्रकाशनाव्यतिरिक्त अन्य कोणी ती रचना वा साहित्य वापरू शकत नाही. जर कोणी याचे उल्लंघन केले तर त्याच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.


जगभरात कसा साजरा केला जातो हा दिवस?

हा दिवस जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये विविध पद्धतींनी साजरा केला जातो. काहीजण पुस्तके विनामूल्य वितरित करतात.


तर कुठे स्पर्धा आयोजित केली जातेय. स्पेनमध्ये दोन दिवस रीडिंग मॅरेथॉनचं आयोजन केलं जाते. या मॅरेथॉन अखेरीस एका लेखकाला प्रतिष्ठित मिगेल डे सर्व्हांटिस पुरस्कार दिला जाते. 



स्वीडनमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लेखन स्पर्धा घेतल्या जातात.


हा दिवस साजरा करण्यामागील प्रमुख हेतू काय आहे?

– पुस्तकांबद्दल प्रेम वाढावं, जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

– लेखक, प्रकाशक आणि प्रताधिकार यांचे महत्व अधोरेखित करण हा या दिनाचा उद्देश आहे.

– ज्या लोकांनी लेखनाद्वारे मानवजातीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी अमूल्य योगदान दिलेले आहे, त्यांच्याप्रति आपला आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

– नवीन लेखकांनाही प्रोत्साहन मिळावं या हेतूनही आजचा हा पुस्तक दिन साजरा होतोय.


पुस्तक वाचन का करावं?

– ग्रंथ वाचनानं आपलं विश्वही अनुभवसंपन्न होत जाते.

– वाचनाने आपल्या जाणिवा समृद्ध होतात.


नव्या तंत्रज्ञानाने पुस्तकं वाचणं सोपं केलं असलं तरी नव्याकोऱ्या पुस्तकांचा वास, त्याच्या कागदांचा स्पर्श अनुभवणं हा आनंद काही औरच असतो… त्यामुळे पुस्तकं विकत घेऊ, पुस्तकं वाचू, पुस्तकं भेट देऊ…. तुम्हा सगळ्यांना जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा..!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!