Just another WordPress site

गुजरात मॉडेलचा बुरखा फाटला; स्थानिक वृत्तपत्रे भरली शोकसंदेशाने

गुजरात मॉडेल म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर उभं राहते ते म्हणजे गुजरातचा विकास, गुजरातच उद्योग, गुजरातचे रस्ते आणि गुजरातचं आर्थिक चित्रं. यामुळंच गुजरात मॉडेलची देशभरात चर्चा सुरू असते. मात्र, देशातील इतर भागांप्रमाणंच गुजरातमध्येही कोरोनाचा प्रकोप दिसून येतोय. गुजरातमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असून मृतांच्या आकडेवारीतही चांगलीच वाढ होते. मात्र, येथील भाजप सरकार कोरोना रूग्णांची आकडेवारी जाहीर न करता लोकांपासून वस्तुस्थिती लपवीत आहे. गुजरात मॉडेलचा कितीही ढोल गुजरात सरकारनं पिटला तरी तेथील रुग्णालयाबाहेरची आणि स्मशानभूमीतली गर्दी काही वेगळंच सांगते. या कोरोना काळात सोशल मीडियावर शेअर झालेल्या अनेक व्हिडिओमुळे गुजरात मॉडेलचं पितळ चांगलचं उघडं पडलं.




हाईलाईट्स

१. नाही, गुजरातमध्ये सगळं आलबेल नाही

२. गुजरातमध्ये कोरोनाचं प्रकोप वाढला

३. गुजरात मॉडेल गेलं सपशेल फेल!

४. राज्यात कोरोनामुळं वाढलं मृताचं प्रमाण


दरम्यान, आता गुजरातमधील स्थानिक वृत्तपत्रांनीही राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर मांडलाय. गुजरातमध्ये कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस किती वाढतेय, याचा अंदाज घ्यायचा असेल तर फक्त एकच करा. गुजरातमधील स्थानिक वृत्तपत्रे उघडून त्यातील शोकसंदेशाच्या जाहिराती बघा. 


दिवसेंदिवस या स्तंभातील जाहिराती आणि त्याचबरोबर त्यासाठीच्या पानांची संख्याही वाढत आहे. यावरून मृतांची आणि प्रामुख्यानं कोरोना रुग्णांच्या बळींची संख्या वेगवेगळ्या कारणांमुळे नोंदली जात नसल्याचे स्पष्ट होते. यावरून गुजरातमध्ये कोरोनाची भयंकर परिस्थिती समोर येतेय. गुजरातमध्ये प्रत्येक मिनिटाला चारहून अधिक रुग्ण आढळत आहेत तर प्रत्येक तासाला तीन रुग्ण आपला जीव गमावताहेत. कुणाला ऑक्सिजन न मिळाल्यानं जीव गमवावा लागतो. तर, काही जण रुग्णालयात बेड न मिळाल्यानं अंबुलन्समध्ये तास न तास पडून राहिलेले दिसून येताहेत. त्यामुळे अनेकांची गैरसोय होते. स्मशानभूमीतही अंत्यसंस्काराला अनेक जण रांगेत उभे असलेले आढळताहेत. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानं गुजरात उच्च न्यायालयानं विजय रुपाणी सरकारला जोरदार खडे बोल सुनावले. आरोग्य व्यवस्थेवर चांगलेच ताशेरे ओढत कोरोना निर्मूलनासाठी सरकार करीत असलेली उपाययोजना पुरेशी नाही. लोकांच्या कल्याणासाठी आणखी निर्बंध लादण्याची गरज आहे, असं न्यायालयानं कडक शब्दात सुनावलं. यामुळं गुजरात मॉडेल केवळ एक पोकळ आभास असून सत्य यापेक्षा निराळं आहे, याची कल्पना येईल. आता गुजरात सरकारं गुजरात मॉडेलच्या नागड्या रूपाची लाज कशी राखते? आणि कोरोना परिस्थिती नियंत्रणात कशी आणते, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!