Just another WordPress site

कोरोना रुग्णांसाठी गरजेचा असलेला मेडिकल ऑक्सिजन कसा तयार करतात?

जगभरासह देशात कोरोनाचं संक्रमण वेगानं वाढत असून दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागत असल्यानं ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे आणि परिणामी ऑक्सीजन अभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागताहेत. त्यामुळं प्राणवायू हा किती महत्त्वाचा आहे, हे आपल्या लक्षात येतंय. अनेक राज्यांमधून मेडिकल ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याच्या तक्रारी माध्यमांमधून समोर येताहेत… त्यामुळं रुग्णांना ऑक्सिजनचा नियमित पुरवठा करणं, हे सध्या भारतात आरोग्य व्यवस्थेसमोरचं मोठं आव्हान आहे. मात्र, या मेडीकल ऑक्सीजनची नेमकी कोणाला गरज भासते? ऑक्सिजनचा कोव्हिडच्या रुग्णांना काय फायदा होतो? आणि  हा ऑक्सीजन कसा तयार केला जातो, याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.खरं पाहिलं तर निसर्गातही ऑक्सिजन हा मुबलक आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर रुग्णांच्या फुफ्फुसांवर परिणाम होतोय. अशा वेळी हवेतील ऑक्सिजनऐवजी मेडिकल ऑक्सिजनची रूग्णाला गरज भासतेय. त्यामुळे सध्या ऑक्सिजन तुटवड्यावर उपाय म्हणून  हवेतुन ऑक्सिजन घेवून तो रुग्णापर्यंत पोहचवण्याच्या प्रयोगाच्या चर्चा आहेत. मात्र त्याआधी आजपर्यंत हा मेडिकल ऑक्सिजन रुग्णापर्यंत कसा पोहचतो हे समजून घेणं देखील गरजेचं आहे.


राज्यात किती टन ऑक्सिजनचं उत्पादन घेतलं जातं?

सध्या राज्यात दररोज साधारण १२०० मेट्रीक टन ऑक्सिजनचं उत्पादन केलं जातं. वैद्यकीय तसंच औद्योगिक कारणांसाठी हा ऑक्सिजन वापरला जातो. सध्या कोव्हिडची साथ बघता राज्यातला १०० टक्के ऑक्सिजन आरोग्य सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आल्याचं  सांगण्यात आलं. सध्या दिवसाला ९५० ते १००० टन ऑक्सिजन राज्यात वापरला जात असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असूनही ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागलाय, याचं महत्वाचं कारणं म्हणजे, राज्यातली कोरोना रूग्णांची वाढती संख्या.


कोव्हिड रुग्णांना ऑक्सिजनची गरज का भासते?एरवी आपण हवेतून श्वासावाटे ऑक्सिजन आत घेतो. हा ऑक्सिजन फुप्फुसातून रक्तात प्रवेश करतो आणि रक्तावाटे पेशींपर्यंत पोहोचतो. तर काही आजारांत जसं की,  अस्थमा, क्रॉनिक ब्राँकायटिस, कन्जेस्टिव हार्ट फेल, सिस्टीक फायब्रोसिस, फुफ्फुसाचा कॅन्सर,  स्लिप एप्निया यांसारखे आजार  किंवा एखाद्या सूक्ष्मजीवाचा संसर्ग फुप्फुसात वाढला, तर रक्तात ऑक्सिजन मिसळण्याच्या प्रक्रियेतच अडथळे निर्माण होतात. अशा वेळी नेहमीसारखा श्वासावाटे घेतला जाणारा ऑक्सिजन पुरेसा ठरत नाही.  त्यामुळं रुग्णांना  शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. हेच कोरोना रूग्णांच्या बाबतीत होतं, कोरोना हा रुग्णांच्या फुफुसावर अटॅक करतो आणि त्यामुळंच रुग्णांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होतो, म्हणून रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते.


ऑक्सिजनची निर्मिती कशी होते?


नैसर्गिक वातावरणातील हवेत इतके सगळे घटक असतांना ऑक्सीजनची निर्मिती कशी केली जाते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर मेडिकल ऑक्सिजन बनवण्याच्या पहिल्या टप्यात प्लांटमधील हवेतुन सगळ्या गॅसमधून ऑक्सिजन बाजूला काढला जातो. त्यासाठी हवेला प्रेशर देऊन त्याचं  द्रवात रुपांतर केलं जातं. त्यासाठी एअर सेप्रेशपन तंत्रज्ञानाचा वापर करतात. एअर सेप्रेशपन म्हणजे काय तर हवेला कॉंप्रेस केलं जातं, आणि फिल्टर करुन त्यातील नको असलेले घटक बाजूला काढून टाकले जातात. पुढे या फिल्टर झालेल्या हवेला थंड केलं जातं. यानंतर या हवेला ऑक्सिजन सिलिंडरमध्ये किंवा टॅंकमध्ये भरलं जातं…


भारतात कोण-कोणत्या ठिकाणी ऑक्सिजन तयार केला जातो?

भारतात मेडिकल ऑक्सिजनच्या १० ते १२ मोठ्या कंपन्या आहेत. आणि ५०० पेक्षा जास्त छोटे गॅस प्लांट कार्यरत आहेत. गुजरातमधील रामा नावाची कंपनी सर्वात मोठी ऑक्सिजन सिलेंडर बनवणारी कंपनी आहे.  तर दिल्लीतील गोयल एमजी गॅसेस, कोलकत्यामधील  लिंडे इंडिया आणि चेन्नईमधील नॅशनल ऑक्सिजन लिमिटेड या कंपन्याही ऑक्सिजन सिलेंडर तयार करतात. या एका सिलेंडरचा व्हॉल्युम ७ क्युबिक मीटर असतो तसंच त्याचं प्रेशर  १४० किलो एवढं असतं.


स्टॅण्डर्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणजे काय?

सध्या ऑक्सिजनच्या विविध पर्यायांवर चर्चा होते.  त्याचं एक उदाहरण म्हणजे  स्टॅण्डर्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर.  या मशीनमध्ये एक मोटार असते, जी विजेवर चालते. वेळप्रसंगी ही मोटार बॅटरीवर देखील चालवली जाते. ती हवेतून ऑक्सिजन घेते आणि बाकी गॅसेस बाहेर काढून टाकते. रुग्णाच्या नाकावर कॅन्युला किंवा मास्क लावून त्याला यातून ऑक्सिजन दिला जातो. ही मशीन जवळपास ५० पौडांची असते आणि ने-आण करण्यासाठी या मशीन खाली चाके लावलेली असतात. 


भारतात सध्या कोरोना परिस्थितीमुळं रुग्णांना जरी मेडिकल ऑक्सिजनची गरज भासत असली तरी, येणाऱ्या काळात आपल्याला पर्यावरणातल्या ऑक्सिजनची सुद्धा मोठी गरज असणार आहे. म्हणून प्रत्येकांन एक तरी झाडं लावणं गरजेचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!