Just another WordPress site

फ्लाइटला विलंब होत असल्यास किंवा फ्लाइट रद्द झाल्यास प्रवाशांचे कायदेशीर अधिकार काय?

जर तुम्ही विमानानं प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बऱ्याचदा विमानाचं तिकीट काढल्यानंतर काही तांत्रिक कारणं देऊन विमानांची उड्डाणं ठराविक वेळेपेक्षा उशीरा होतात. तर काही प्रकरणांमध्ये विमानं रद्द देखील केले जातात. अशा परिस्थितीत प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. दरम्यान, कोणत्याही प्रवाशाचं विमान रद्द झालं किंवा विमानाला उशीर झाला, तर अशा स्थितीत त्याला नेमके काय अधिकार आहेत? याच विषयी जाणून घेऊ.

आजकाल विमान प्रवासाची सुविधा सहज आवाक्यात आल्यानं अनेकांचा कल विमान प्रवासाकडे आहे. आपण मोठ्या हौसेनं विमानाची तिकीटे काढतो. मात्र, बऱ्याचदा आपल्याला आपले अधिकार माहिती नसल्याने सोईऐवजी गैरसोय आणि पर्यायाने मनस्ताप सोसण्याची पाळी आपल्यावर येते. अनेकदा विमान कंपन्यांकडून विमानं रद्द केली जातात. असंच काही दिवसांपुर्वी ऐनवेळी विमान रद्द केल्यानं एका प्रवासी दाम्पत्यानं विमान कंपनीला चांगलाच धडा शिकवला होता. विमान रद्द केल्यानं गैरसोय झाली म्हणून त्या दाम्पत्यानं विमान कंपनीच्या विरोधात ग्राहक न्याय मंचात धाव घेतली होती. प्रवाशाच्या बाजूनं ग्राहक न्याय मंचानं निकाल दिला. त्यावेळी न्याय मंचाने विमान कंपनीला आदेश दिला की, प्रवाशाला नुकसान भरपाई म्हणून अडीच लाख रुपये द्यावे.

दरम्यान, तुम्हालाही विमानांचं उड्डान रद्द झाल्याचा किंवा विमानाला उशीर झाल्यानं काही महत्त्वाचे काम चुकण्याचा निराशाजनक अनुभव असू शकतो. २०१९ मध्ये नागरी उड्डान मंत्रालयाने या संदर्भात एक चार्टर जारी केला. त्यात विमानाला विलंब झाल्यास प्रवाशांचे अधिकार काय असतील याबाबत सांगितलं होतं. अनेकदा काही ना काही कारणानं विमान वेळेवर उडत नाही. डीजीसीएच्या नियमानुसार, ठराविक वेळेपेक्षा विमान उड्डाणाला उशीर झाल्यास, कंपनीला प्रवाशांना जेवण आणि अल्पोपाहार द्यावा लागतो. आणि १ तासात जर विमान प्रवास सुविधा दिली गेली नाही तर कंपनीला प्रवाशांच्या तिकीटाचे पैसेही प्रवाशाला परत करावे लागतात. शिवाय, एखाद्या विमानाच्या उड्डाणाला ६ तासांपेक्षा जास्त उशीर होत असल्यास, प्रवाशांना २४ तास आधी पुनर्निर्धारित वेळेची माहिती द्यावी लागेल. तसेच प्रवासी एवढा वेळ थांबायला तयार नसतील तर त्यांना दुसऱ्या विमानामध्ये पाठण्याची व्यवस्था करावी लागते. किंवा तिकीटाचे संपूर्ण पैसे हे प्रवाशाला परत करावे लागतात.

दुसरं असं की, जर विमानाला २४ तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास, विमान कंपनीला प्रवाशांसाठी मोफत थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करावी लागते. तसंच हॉटेलपर्यंत नेणं आणि परत विमानतळावर आणणं याचा पूर्ण खर्च कंपनीला करावा लागतो. या प्रकरणात विमान कंपनीने हात वर केले तर त्याची तक्रार २४ तासात डीजीसीएच्या वेबसाईटवर करावी लागते. तेथून काही प्रतिसाद मिळाला नाही तर एअरपोर्ट डायरेक्टरला लेखी स्वरूपात किंवा एसएमएस करून ही माहिती देता येते. ही माहिती दिल्यावर संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई होते.

साधारणपणे, विमान कंपन्या प्रत्यक्ष उड्डाणाच्या २ आठवडे आधी प्रवाशांना विमान रद्द झाल्याची माहिती देतात. अशा परिस्थितीत, एकतर विमान कंपनीला तुमच्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करावी लागते. २४ तास अगोदरही विमान रद्द झाल्याची माहिती एअरलाइन कंपनीने प्रवाशांना दिली नाही किंवा विमान रद्द केल्यामुळं त्याच तिकिटावर सूचीबद्ध केलेली कनेक्टिंग फ्लाइट चुकली, तर कंपनीकडून प्रवाशांना भरपाई मिळते. ही भरपाई पाच ते दहा हजाराच्या दरम्यान असू शकते. जर तुम्ही रोखीने पेमेंट केले असेल, तर एअरलाइनला लगेच पैसे परत करावे लागतात. आणि तुम्ही जर क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे बुकिंग केल्यास ही रक्कम एका आठवड्याच्या आत तुमच्या बँक खात्यात जमा करावी लागते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!