Just another WordPress site

ऐन हंगामात सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच, यंदा सोयाबीनला नक्की काय दर मिळणार? बळीराजाला चिंता

सोयाबीन हे शेतकऱ्यांचं हक्काचं नगदी पिक आहे. खरीपातील पिकांमध्ये शेतकऱ्यांना उडीद-मुगानंतर हमखास पैसे देणारं दुसरं नगदी पिक म्हणजे सोयाबीन. मात्र, आता सोयाबीन काढणीला प्रारंभ झाला असतानाच शेतकरी चिंतेत आहेत. कारण सध्या बाजारात सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. सध्या अनेक भागात सोयाबीनच्या काढणीची तयारी सुरू बाजारात सोयाबीनला ४ हजार ५०० रुपयांचा दर मिळतोय. हंगामाच्या सुरुवातीलाच सोयाबीनचे भाव पडल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

गेल्या वर्षीचा सोयाबीन हंगाम संपताना सोयाबीननं विक्रमी भाववाढ नोंदवली होती. मात्र, या भाववाढीचा सर्वाधिक फायदा हा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना झाला होता. यंदा मात्र, सुरुवातीलाच सोयाबीनच्या दरात मोठी घट झाली आहे. खरीप हंगामात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीनं सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागात झालेल्या जोरदार पावसानं फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेतील हे पीक पार उध्वस्त झालं आहे. काही भागात आता सध्या शेतात राहिलेल्या सोयाबीनच्या पीक काढणीला प्रारंभ झाला आहे. गतवर्षी सोयाबीनला विक्रमी दर प्राप्त झाले होते. त्यामुळं यंदाही चांगले भाव मिळतील, या आशेपोटी शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. मात्र, सध्याचे भाव पाहता शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणीच फिरल्याचं चित्र दिसून येत आहे. सध्या शेतमाल घरात असताना सोयाबीन ५००० च्या खाली पोहोचल्यानं सोयाबीन लागवडीचा खर्चही वसूल होतो की नाही? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. गेल्या ३० ऑगस्टला ते ७ हजार २०० रुपये इतके होते. गेल्या वर्षी याच काळात सोयाबीनला सरासरी ८ हजार २६४ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. नवीन सोयाबीन बाजारात आल्यानंतर सध्याचे भाव तरी टिकून राहतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सध्या बाजारात सोयाबीन पिकांची स्थिती आणि उत्पादनाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. प्रक्रिया उद्योगांच्या मते पिकांची स्थिती चांगली आहे, तर दुसरीकडे, अतिपावसामुळे यंदा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता शेतीतज्‍ज्ञांनी वर्तवली आहे. देशात आवकेचा हंगाम संपल्यानंतर सोयाबीनचे भाव वधारतात. मात्र सरत्या हंगामात आवक संपल्यानंतर बाजार दबावात आला. सोयाबीनचे भाव सरासरी ७ हजार रुपयांवरून ५ हजार रुपयांपर्यंत आले आहेत. त्यातच यंदा उत्पादन वाढीच्या बातम्या पसरल्याने बाजारात काहीसे चढ-उतार सुरू आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये ऑक्टोबरमध्ये पाऊस होत आहे, त्यामुळे नुकसान वाढण्याची शक्यता असते. जाणकारांच्या मते पुढील महिनाभर सोयाबीनला किमान ५ हजार रुपये दर मिळू शकतो.

देशात तेलाची होणारी आयात आणि सोयापेंडीच्या विक्रीच्या दरावरून सोयाबीनचा भाव ठरणार आहे. सध्या देशातून ५५० डॉलर प्रतिटन या दराने सोयापेंडीची निर्यात करता येते. त्यामुळे सोयाबीनला ५ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळू शकतो असे तज्‍ज्ञांचे मत आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये सोयाबीनला सरासरी ८ हजार २६४ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याचे निरीक्षण ‘द सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने नोंदविले आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनच्या भावामध्ये तब्बल ४० टक्क्यांनी घट झाली आहे.

पेरणीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांना केवळ मेहनतच करावी लागलेली आहे. सोयाबीन बहरात असताना किडीचा प्रादुर्भाव आणि काढणीच्या प्रसंगी पावसाने सोयाबीन झोडपले यामुळे शेतकरी मेटाकूटीला आला आहे. आता समाधानकारक दर मिळतील अशी आशा होती तर सोयाबीनचे दर घसरल्यान बळीराजा हवालदिल आहे. खरंतर शेतमालाचे भाव पडणं शेतकऱ्यांसाठी नवं नाही. मात्र दरवर्षीच हीच परिस्थिती नशिबात असणं, हे मात्र आपल्या व्यवस्थेचा आणि सरकारचं अपयश म्हणावे लागेल. त्यामुळे शेतकरी हिताच्या गोष्टी करणारं सरकार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद पेरण्यासाठी काही पावलं उचलणार का? आणि त्यांच्या घामाचं, त्यांच्या मेहनतीचं खऱ्या अर्थाने ‘मोल’ करणार का?, हाच खरा प्रश्न आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!